शिक्षक आंतरजिल्हा बदली नविन बदली धोरण २३ मे २०२३ चा शासन निर्णय inter district transfer 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Inter district transfer
Inter district transfer

शिक्षक आंतरजिल्हा बदली नविन बदली धोरण २३ मे २०२३ चा शासन निर्णय inter district transfer 

प्रस्तावना :-

जिल्हा परिषद शिक्षक संवर्गाचे नव्याने बदली धोरण निश्चित करताना विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता, जिल्हा परिषद शाळांमधील घटणारी पटसंख्या, अध्यापनातील स्थैर्य, शिक्षकांना काम करित असताना उद्भवणाऱ्या अडी-अडचणी विचारात घेऊन वाचा क्र.१ येथील दि.०७.०४.२०२१ च्या शासन निर्णयान्वये शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्यांबाबतचे सुधारित बदली धोरण निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार सन २०२२ ची ऑनलाईन बदली प्रक्रिया पार पडल्यानंतर काही शिक्षक संघटनांकडून सूचना/निवदने शासनास प्राप्त झाले आहेत. तसेच शासन निर्णय दि.०७.०४.२०२१ मधील काही तरतूदी आव्हानित करणाऱ्या रिट याचिका मा. उच्च न्यायालयाच्या विविध खंडपीठांमध्ये दाखल करण्यात आलेल्या आहेत. यासंदर्भातील गांभीर्य विचारात घेवून रिट याचिका क्र. ६७७/२०२३ मध्ये संदर्भ क्र.२ येथील दि.१३.०१.२०२३ रोजीच्या पत्रान्वये मा. उच्च न्यायालयासमोर शासनाने मांडलेल्या भूमिकेस अनुसरुन जिल्हा परिषद शिक्षकांच्या संगणकीय ऑनलाईन पध्दतीने होणाऱ्या आंतरजिल्हा व जिल्हांतर्गत बदल्यांबाबत शासन निर्णय दि.०७.०४.२०२१ मधील तरतूदी व त्याअनुषंगाने प्राप्त सूचना/निवेदने याबाबत शिफारशी करण्यासाठी वाचा क्र.३ येथील शासन निर्णयान्वये अभ्यासगट नेमण्यात आला आहे. सदर अभ्यासगटाने केलेल्या शिफारशींना अनुसरून जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन आंतरजिल्हा बदलीबाबतच्या धोरणामध्ये अधिक सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णयः-

उपरोक्त बाबींचा विचार करून शासनाने शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली धोरणाबाबत नव्याने विचार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने वरील संदर्भ क्र.१ येथील शासन निर्णय अधिक्रमित करुन आता जिल्हा परिषदेंतर्गत कार्यरत शिक्षक संवर्गाच्या आंतरजिल्हा बदलीसाठी या शासन निर्णयान्वये खालीलप्रमाणे सुधारित धोरण निश्चित करण्यात येत आहे.

१) महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा (सेवा प्रवेश), नियम १९६७ मधील xi(C) मधील तरतुदीनुसार जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना आंतरजिल्हा बदलीने अन्य जिल्हा परिषदेमध्ये नेमणूक देण्यास व बदलीच्या ठिकाणी रुजू होण्यासाठी कार्यमुक्त करण्यासही संबंधित जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे सक्षम प्राधिकारी आहेत.

२) आंतरजिल्हा बदलीसाठी विचारात घ्यावयाच्या बाबी :-

२.१ ज्या शिक्षक कर्मचाऱ्याला आंतर जिल्हा बदली हवी आहे, अशा शिक्षकांची संबंधित जिल्हा परिषदेमध्ये त्या वर्षाच्या ३१ मे अखेर किमान ५ वर्ष सलग सेवा होणे आवश्यक आहे. तसेच तो शिक्षक त्या पदावर कायम असणे आवश्यक आहे. या ५ वर्षाच्या कालावधीत संबंधित शिक्षकाच्या शिक्षण सेवक या पदावर असलेला कालावधी विचारात घेतला जाईल. विशेष संवर्ग भाग १ व भाग २ मधील कर्मचाऱ्यांना सेवेची मर्यादा ३ वर्षाची असेल.

२.२ मात्र आंतरजिल्हा बदली हा संबंधित शिक्षकांचा हक्क असणार नाही.

२.३ जे शिक्षक पदोन्नत झालेले आहेत/किंवा प्राथमिक पदवीधर पदावर पदस्थापना झाल्याने वेतनोन्नती झाली असल्यास अशा शिक्षकांना आंतरजिल्हा बदली हवी असल्यास स्वखुशीने पदावनत करण्याबाबत तसेच वेतनोन्नती परत करण्याबाबत संमतीपत्र दिल्यानंतरच त्या शिक्षकांचा आंतरजिल्हा बदल्यांसाठी विचार केला जाईल.

२.४ ज्या जिल्हा परिषदेचे रोस्टर (बिंदू नामावली) विभागीय आयुक्त, मागासवर्गीय कक्ष यांनी तपासून दिले आहे, अशा जिल्हा परिषदेमध्ये शिक्षकांची आंतरजिल्हा बदली होईल.

२.५ आंतरजिल्हा बदली प्रकरणांत ज्या जिल्हा परिषदेचे रोस्टर (बिंदू नामावली) विभागीय आयुक्त, मागासवर्गीय कक्ष यांनी तपासून दिली नाहीत, अशा जिल्हा परिषदेमध्ये फक्त शिक्षकांची आंतरजिल्हा बदली साखळी पद्धतीने होईल.

२.६ यासंदर्भात आंतरजिल्हा बदलीस इच्छुक असलेल्या शिक्षकांनी अर्ज करतांना जास्तीत जास्त चार जिल्हा परिषदांची निवड करण्याची मुभा राहील. याकरिता त्यांनी सोबत जोडलेल्या

परिशिष्टामध्ये अर्ज करणे आवश्यक आहे.

२.७ प्रत्येक वर्षी आंतरजिल्हा बदलीसाठी इच्छुक असलेल्या शिक्षकांनी शासनाद्वारे निर्देशित केलेल्या विशिष्ट कालावधीत संबंधित गट शिक्षणाधिकारी कार्यालयात ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. सदर अर्जाचा नमुना सोबतच्या परिशिष्टामध्ये जोडलेला आहे. या अर्जासोबत खालील कागदपत्रे जोडावीत.

“संबंधित शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीस अनुसरून काही न्यायालयीन / लोकायुक्त / अन्य न्यायाधिकरण/सक्षम प्राधिकरण यांचे स्वयंस्पष्ट आदेश असल्यास त्या आदेशाची प्रत अर्ज भरताना गट शिक्षणाधिकाऱ्यांकडे उपलब्ध करून देण्यात यावी व त्यावर मुळ याचिकेची प्रत देखील उपलब्ध करून देण्यात यावी.”

२.८ सदरच्या बदल्या ह्यापूर्वी निश्चित केलेल्या धोरणानुसार १०% पेक्षा जास्त जागा रिक्त असल्यास त्या जिल्हा परिषदांमधून शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीने बाहेर जाता येणार नाही. जिल्ह्यातुन बाहेर जाण्याकरीता रिक्त पदांची टक्केवारी १०% पेक्षा कमी असणे गरजेचे आहे.

२.९ सदरची आंतरजिल्हा बदली करताना संबंधित शिक्षकांच्या नियुक्ती प्रवर्गानुसार बदलीने जाण्याच्या जिल्हा परिषदेत रिक्त पद असल्यास, त्या रिक्त पदावर बदली करण्यात येईल.

३) न्यायालयीन/लोकायुक्त/अन्य प्राधिकरण/सक्षम प्राधिकरण यांच्या आदेशाची प्रत मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद एकत्रित करून पुढील कार्यवाहीसाठी शासनाकडे पाठवतील. ज्या आदेशाची अंमलबजावणी झालेली आहे अशा आदेशाच्या प्रती शासनास पाठवू नयेत.

४) वरील प्रकरणांबाबत सर्व कागदपत्र प्राप्त झाल्यानंतर न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार आंतरजिल्हा बदलीची प्रकरणे निकाली काढण्यात येतील.

५) नवीन धोरणानुसार ना हरकत दाखल्याची आवश्यकता नसल्याने, आंतरजिल्हा बदलीसाठी यापुढे जिल्हा परिषदांकडून ना हरकत दाखला देण्यात येणार नाही.

६) आंतरजिल्हा बदलीने अन्य जिल्हा परिषदेतून सामावून घेतलेल्या कर्मचाऱ्याची सेवाज्येष्ठता अशा बदलीनंतर जिल्हा परिषदेत हजर झाल्याच्या दिनांकानुसार निश्चित करण्यात येईल. एकाच दिवशी एकापेक्षा अधिक शिक्षकांना सामावून घेताना त्यांची जेष्ठता त्यांच्या जन्मदिनांकानुसार ठरविण्यात यावी.

७) संबंधित कर्मचाऱ्याविरूद्ध विभागीय चौकशी प्रस्तावित अथवा चालू असल्यास सदर कर्मचारी आंतरजिल्हा बदलीस अपात्र समजण्यात येईल.

८) वरील प्रमाणे कार्यवाही झाल्यानंतर आंतरजिल्हा बदलीकरीता राज्यातील सर्व जिल्हा परिषदांतील इच्छुक शिक्षकांची राज्यस्तरावर प्रवर्ग निहाय संगणकीय पद्धतीने खालील प्राधान्यक्रमाप्रमाणे एकत्रित ज्येष्ठतासुची तयार करण्यात येईल.

८.१ ज्या शिक्षकांना दोन्ही जिल्हा परिषदांकडून ना-हरकत प्रमाणपत्र मिळालेले आहे असे शिक्षक (सदर तरतूद केवळ सन २०२३ च्या आंतरजिल्हा प्रक्रियेसाठी मर्यादित राहील. सन २०२४ पासून ना-हरकत प्रमाणपत्र प्राप्त शिक्षक हा संवर्ग आंतरजिल्हा बदली प्रक्रियेतून वगळण्यात येईल.)

टीप – १ : काही जिल्हा परिषदांनी भविष्यात संबंधित बिंदू नामावलीमधील संबंधित बिंदूवरील पद उपलब्ध होईल या अटीवर ना-हरकत दाखले निर्गमीत केलेले असून, सदरचा शासन निर्णय

बिंदूनामावलीप्रमाणे आंतरजिल्हा बदली मान्य करीत असल्याने सदर ना-हरकत दाखले प्राप्त केलेले शिक्षक या प्राधान्यक्रमात बसतील.

८.२ : विशेष संवर्ग शिक्षक भाग १ :- या संवर्गांतर्गत खालील शिक्षकांचा समावेश होईल.

क. पक्षाघाताने आजारी कर्मचारी (Paralysis).

ख. दिव्यांग कर्मचारी (सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णय दिनांक १४.०१.२०११ मधील नमूद प्रारूपाप्रमाणे सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र आवश्यक), मानसिक विकलांग व दिव्यांग मुलांचे पालक. (पालक म्हणजे आई वडील किंवा ते नसल्यास बहिण भाऊ). तसेच ज्या शिक्षकांचे जोडीदार मानसिक विकलांग व दिव्यांग आहेत, असे शिक्षक.

ग. हृदय शस्त्रक्रिया झालेले कर्मचारी.

घ. एकच मुत्रपिंड (किडनी) असलेले / मुत्रपिंड रोपण केलेले कर्मचारी / डायलिसीस सुरु असलेले कर्मचारी.

च. यकृत प्रत्यारोपण झालेले शिक्षक.

छ. कॅन्सरने (कर्करोग) आजारी कर्मचारी.

ज. मेंदूचा आजार झालेले कर्मचारी.

झ. थैलेसेमिया/कॅन्सर विकारग्रस्त मुलांचे पालक/जन्मजात गुणसुत्रांच्या दोषांमुळे उद्भवणारे आजार (उदा. Methyl Malonic Acidemia (MMA) Classical type (Mutase defiency व

इतर आजार)} (पालक म्हणजे आई वडील किंवा ते नसल्यास बहिण भाऊ).

ट. माजी सैनिक तसेच आजी / माजी सैनिक व अर्धसैनिक जवानांच्या पत्नी / विधवा.

ठ. विधवा कर्मचारी.

ड. कुमारिका कर्मचारी.

ढ. परित्यक्ता / घटस्फोटीत महिला कर्मचारी.

प. वयाने त्रेपन्न वर्षे पूर्ण झालेले कर्मचारी.

फ. स्वांतत्र्य सैनिकांचा मुलगा / मुलगी / नातू / नात (स्वातंत्र्य सैनिक हयात असेपर्यंत)

वरील एखाद्या संवर्गात एकापेक्षा जास्त शिक्षकांनी बदलीसाठी अर्ज केल्यास बदलीसाठी त्यांच्या सेवाज्येष्ठतेप्रमाणे ज्येष्ठता विचारात घेण्यात येईल. तसेच वरीलप्रमाणे कार्यवाही करताना दोघांची सेवाज्येष्ठता एक असल्यास वयाने ज्येष्ठ असलेल्या कर्मचाऱ्याचा प्राथम्याने विचार करावयाचा आहे. अशा प्रकरणात जन्मदिनांक देखील एकच असल्यास इंग्रजी आद्याक्षराप्रमाणे आडनाव प्रथम येईल, अशा शिक्षकांची प्राधान्याने बदली करण्यात यावी.

८.३ : विशेष संवर्ग शिक्षक भाग २ :- पती-पत्नी एकत्रिकरण

जर सध्या पती व पत्नी यांच्या नियुक्तीचे ठिकाण दोन वेगवेगळ्या जिल्ह्यात असल्यास अशा शिक्षकांना विशेष संवर्ग भाग-२ शिक्षकांचा दर्जा प्राप्त होईल. पती-पत्नी एकत्रीकरणांतर्गत संबंधित

दांपत्यापैकी एकाने त्याचा जोडीदार ज्या जिल्हयात कार्यरत असेल, त्या जिल्हयात बदली मिळण्यासाठी अर्ज करावयाचा आहे. जोडीदार कार्यरत असलेल्या जिल्ह्यामध्ये जागा उपलब्ध नसल्यास संबंधित शिक्षकांच्या जोडीदाराला शेजारी असलेले जिल्हे पर्याय म्हणून निवडता येतील. दोघांनी अर्ज करण्याची आवश्यकता नाही.

या विशेष संवर्गांतर्गत अर्ज करतांना दोघांनाही ते कार्यरत असलेल्या जिल्ह्यापेक्षा अन्य जिल्ह्यात बदली हवी असल्यास पती-पत्नीची जोडी एक युनिट म्हणून ग्राह्य धरण्यात येईल. त्या दोघांपैकी सेवाज्येष्ठ असणाऱ्या जोडीदाराची सेवाजेष्ठता ग्राह्य न धरता सेवेने कनिष्ठ असलेल्या जोडीदाराची सेवाज्येष्ठता ग्राह्य धरण्यात येईल व दोघे कार्यरत असलेल्या जिल्ह्यापेक्षा एकत्रित मागणी केलेल्या अन्य जिल्ह्यात त्यांचे निवड प्रवर्गानुसार बिंदू रिक्त असल्यास प्राधान्य मिळेल.

पती-पत्नी एकत्रीकरणांतर्गत असणारी वर्गवारी खालीलप्रमाणे आहे. तथापि, एखाद्या जिल्ह्यामध्ये पती-पत्नी एकत्रिकरणांतर्गत अर्ज सादर करणाऱ्या शिक्षकांचा जिल्ह्यातील प्राधान्यक्रम सेवाजेष्ठता विचारात घेऊन ठरविण्यात येईल.

क. पती-पत्नी दोघेही जिल्हा परिषद कर्मचारी असतील तर.

ख. पती-पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद कर्मचारी व दुसरा राज्य शासकीय कर्मचारी असेल तर.

ग. पती-पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद कर्मचारी व दुसरा केंद्र शासकीय कर्मचारी असेल तर.

घ. पती-पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद कर्मचारी व दुसरा राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेचा कर्मचारी असेल तर, उदा. महानगरपालिका / नगरपालिका.

च. पती-पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद कर्मचारी व दुसरा राज्य अथवा केंद्र शासनाच्या सार्वजनिक उपक्रमातील कर्मचारी.

छ. पती-पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद कर्मचारी व दुसरा अनुदानित संस्थेतील कर्मचारी असेल तर.

वरील एखाद्या संवर्गात एकापेक्षा जास्त शिक्षकांनी बदलीसाठी अर्ज केल्यास बदलीसाठी त्यांच्या सेवाज्येष्ठतेप्रमाणे ज्येष्ठता विचारात घेण्यात येईल. तसेच वरीलप्रमाणे कार्यवाही करतांना दोघांची सेवाज्येष्ठता एक असल्यास वयाने ज्येष्ठ असलेल्या कर्मचाऱ्याचा प्राथम्याने विचार करावयाचा आहे. अशा प्रकरणात जन्मदिनांक ही एक असल्यास इंग्रजी आद्याक्षराप्रमाणे आडनाव प्रथम येईल अशा शिक्षकांना प्राधान्यक्रम देण्यात येईल.

८.४ : सर्वसाधारण संवर्ग :- त्यानंतर सर्वसाधारण अर्जदारांची आंतरजिल्हा बदलीसाठी ज्येष्ठता त्यांच्या सेवाज्येष्ठतेच्या आधारे निश्चित करण्यात येईल. वरीलप्रमाणे ज्येष्ठता दिल्यानंतर सर्वसाधारण संवर्गातील अर्जदारांची सेवाज्येष्ठता विचारात घेण्यात येईल.

सेवाज्येष्ठता दिनांक एक असल्यास वयाने ज्येष्ठ असलेल्या शिक्षकांना प्राधान्य देण्यात येईल. तसेच जन्मदिनांकही एकच असल्यास इंग्रजी आद्याक्षराप्रमाणे आडनाव विचारात घेऊन जे आद्याक्षर प्रथम येते त्याप्रमाणे प्राधान्यक्रम प्रदान करण्यात येईल.

९) उपरोक्त नमूद मुद्दा क्रमांक ८ प्रमाणे एकत्रित संवर्गनिहाय ज्येष्ठता सूची तयार झाल्यावर आंतरजिल्हा बदली प्रक्रिया संगणकीय प्रणालीद्वारे संवर्गनिहाय ज्येष्ठतेनुसार व विनंतीप्रमाणे करण्यात येईल. ज्या शिक्षकाची बदली करावयाची आहे, त्या शिक्षकाची बदली ज्या जिल्ह्यात होणे अपेक्षित आहे त्या जिल्हयात त्या प्रवर्गासाठी बदली वर्षामध्ये ३१ मे अखेर बिंदूनामावलीमधील सरळसेवेचे पद रिक्त असणे आवश्यक आहे. त्याच पदावर संबंधितांची बदली केली जाईल. कर्मचा-याने त्यांच्या अर्जात नमूद केलेल्या जिल्हयात बिंदूनामावलीप्रमाणे थेटपणे वा सकृतदर्शनी पद उपलब्ध नसल्यास बदल्यांकरिता साखळी पध्दतीचा अवलंब करण्यात येईल व त्याद्वारे मागणी केलेल्या जिल्ह्यात पद उपलब्ध झाल्यास त्या पदावर संबंधित शिक्षकाची आंतरजिल्हा बदली केली जाईल.

१०) आंतरजिल्हा बदली विनंतीनुसार बदली असल्यामुळे यासाठी कोणतेही भत्ते व पदग्रहण अवधी कर्मचा-यास अनुज्ञेय होणार नाही.

११) हा शासन निर्णय निर्गमित झाल्याच्या दिनांकापर्यंत नियुक्ती आदेश निर्गमित झालेल्या कर्मचा-यांच्या आंतरजिल्हा बदलीस या शासन निर्णयातील तरतुदीमुळे बाधा पोहोचणार नाही.

१२) आंतरजिल्हा बदली झाल्यानंतर संबंधित शिक्षकाने हजर झाल्यानंतर सहा महिन्याच्या कालावधीत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील.

१३) आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना पदस्थापना देताना संबंधित जिल्हा परिषदांनी खालीलप्रमाणे कार्यवाही करावी :

१३.१ दुसऱ्या जिल्ह्यातून आलेल्या सर्व शिक्षकांच्या नियुक्तीच्या दिनांकानुसार सर्वप्रथम जेष्ठता याद्या तयार करण्यात याव्यात.

१३.२ यानंतर या यादीतील इच्छुक असलेल्या, शिक्षकांना आदिवासी व नक्षलग्रस्त भागात नेमणूक देण्यात यावी. इच्छुक नसल्यास कनिष्ठतम शिक्षकांना त्या भागात नेमणूक देण्यात यावी. कोणत्याही परिस्थितीत आदिवासी व नक्षलग्रस्त भागातील सर्व जागा भरण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दक्षता घ्यावी.

१३.३ त्यानंतर वरील जेष्ठतायादीतील इच्छुक शिक्षकांना अवघड क्षेत्रात नियुक्ती देण्यात यावी. कोणीही इच्छुक नसल्यास वा इच्छुकांची संख्या कमी असल्यास, सेवा जेष्ठता यादीनुसार कनिष्ठतम शिक्षकांना अवघड क्षेत्रातील रिक्त जागी नेमणूक देण्यात यावी.

१३.४ वरीलप्रमाणे रिक्त जागा संपूर्णतः भरल्यानंतर जिल्ह्यातील ज्या तालुक्यात रिक्त जागांची टक्केवारी सर्वाधिक आहे, अशा तालुक्यातील रिक्त जागा भरण्यात याव्यात.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

शासन निर्णय येथे पहा

👉 pdf download 

 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

 

 

1 thought on “शिक्षक आंतरजिल्हा बदली नविन बदली धोरण २३ मे २०२३ चा शासन निर्णय inter district transfer ”

Leave a Comment