भारतीय ध्वजाची ध्वजसंहिता काय आहे indian tricolour Flag
भारतीय ध्वज संहिता भारताचा राष्ट्रध्वज हा भारतीय लोकांच्या आशा आणि आकांक्षांचे प्रतिनिधीत्व करतो. भारतीय राष्ट्रध्वज आपल्या राष्ट्राबद्दलच्या अभिमानाचं प्रतीक आहे.
हा तिरंगा गेल्या पाच दशकांहून अधिक काळ पूर्ण तेजाने फडकत राहण्यासाठी सशस्त्र बलांच्या जवानांसह अनेक लोकांनी त्याचे रक्षण करण्याकरिता उदारपणाने आपले प्राण पणाला लावले आहेत.
डॉ. एस. राधाकृष्णन यांनी संविधान सभेमध्ये राष्ट्रध्वजामधील रंगांच्या व चक्राच्या अर्थसूचकतेबद्दल विस्तृतपणे वर्णन केलेले होते. संविधान सभेने एकमताने राष्ट्रीय ध्वज स्वीकृत केला.
डॉ. एस. राधाकृष्णन यांनी असे स्पष्ट केले की “भगवा किंवा केशरी रंग हा स्वार्थनिरपेक्ष त्यागाचा दर्शक आहे.
आपल्या नेत्यांनी देखील भौतिक लाभांपासून तटस्थ राहिले पाहिजे आणि आपल्या कामामध्ये स्वतःला वाहून घेतले पाहिजे.
मध्यभागी असलेला पांढरा रंग हा प्रकाशाचा, आपल्या आचरणात मार्गदर्शन करणा-या सत्याचा मार्ग आहे. हिरवा रंग हा आपले मातीशी असलेले नाते व ज्यावर इतर सर्वांचे जीवन अवलंबून आहे अशा वनस्पती जीवनाशी असलेले आपले नाते दर्शवितो.
पांढऱ्या रंगाच्या मध्यभागी असलेले अशोक चक्र हे धर्म नियमांचे चक्र आहे. जे या ध्वजाखाली काम करतात त्यांची सत्य, धर्म किंवा सदाचार ही नियंत्रक तत्त्वे असली पाहिजेत.
तसेच चक्र हे गतीचे दर्शक आहे. तेथे कुंठिततेत मृत्यू आहे. गतिमानतेत जीवन आहे. भारताने परिवर्तनाला कसलाही प्रतिरोध करू नये, त्याने गतिमान बनले पाहिजे व पुढे गेले पाहिजे. चक्र हे शांततापूर्ण परिवर्तनाच्या गतिशीलतेचे निदर्शक आहे.”
राष्ट्रध्वजाबद्दल सार्वत्रिक प्रेम व आदर आहे आणि त्याच्याप्रती सर्वांची निष्ठा आहे.
तरीसुद्धा राष्ट्रध्वज लावण्याकरिता लागू असलेले कायदे, प्रथा व संकेत यासंबंधात केवळ लोकांमध्येच नव्हे, तर शासकीय संघटना /अभिकरणे यांमध्येसुद्धा कित्येकदा जाणिवेचा स्पष्ट अभाव दिसून आलेला आहे.
राष्ट्रध्वज लावण्याबाबत शासनाने, वेळोवेळी जारी केलेल्या असांविधिक सूचनांव्यतिरिक्त बोधचिन्हे व नावे (अनुचित वापरास प्रतिबंध) अधिनियम, १९५० (१९५० चा अधिनियम क्रमांक १२) आणि राष्ट्र प्रतिष्ठा अपमान प्रतिबंध अधिनियम, १९७१ (१९७१ चा अधिनियम क्रमांक ६९) यांच्या तरतुदींद्वारे राष्ट्रध्वज लावण्याचे नियमन केले जात आहे.
सर्व संबंधितांच्या मार्गदर्शनासाठी व हितासाठी, भारतीय ध्वज संहिता, २००२ मध्ये याबाबतचे सर्व कायदे, संकेत, प्रथा व सूचना एकत्रित करण्याचा एक प्रयत्न केला आहे.
सोयीसाठी भारतीय ध्वज संहिता, २००२ ची तीन भागांमध्ये विभागणी करण्यात आली आहे.
संहितेच्या भाग एक मध्ये राष्ट्रध्वजाच्या सर्वसाधारण वर्णनाचा समावेश आहे.
संहितेच्या भाग दोनमध्ये जनतेतील कोणतीही व्यक्ती, खाजगी संघटना, शैक्षणिक संस्था, इत्यादींना राष्ट्रध्वज लावण्याबाबत माहिती दिलेली आहे.
संहितेचा भाग तीन हा केंद्र सरकार व राज्य सरकारे आणि त्यांच्या संघटना व अभिकरणे यांनी राष्ट्रध्वज लावण्यासंबंधातील आहे.
भारतीय ध्वज संहिता, २००२ ही २६ जानेवारी २००२ पासून अंमलात येत आहे आणि ती विद्यमान भारतीय ध्वज संहितेची जागा घेईल.
भाग एक सर्वसाधारण
१.१. राष्ट्रध्वज तीन रंगांच्या पट्टयांचा असून तो समान रुंदीच्या तीन आयताकृती पट्ट्या किंवा जोड-पट्ट्या यांचा मिळून बनलेला असेल.
सर्वांत वरची पट्टी भारतीय केशरी रंगाची असेल तर खालची पट्टी भारतीय हिरव्या रंगाची असेल. मधली पट्टी पांढ-या रंगाची असेल व तिच्या मध्यभागी समान अंतराच्या २४ आन्यांचे नेव्ही ब्ल्यू रंगाचे (Navy Blue) अशोक चक्राचे चिन्ह असेल.
अशोक चक्र हे विशेषकरून स्क्रिन प्रिंट केलेले किंवा अन्य प्रकारे प्रिंट केलेले किंवा स्टेन्सिल केलेले अथवा योग्यरीतीने भरतकाम केलेले असेल आणि ते ध्वजाच्या दोन्ही बाजूंनी पांढ-या पट्टीच्या मध्यभागी पूर्णतः दिसेल असे असेल.
१.२. भारताचा राष्ट्रध्वज, हाताने कातलेल्या व हाताने विणलेल्या लोकर/सूत/सिल्क/खादी कापडापासून बनविलेला असेल.
१.३. राष्ट्रध्वज आयताकृती आकाराचा असेल. ध्वजाची लांबी व उंची (रूंदी) याचे प्रमाण ३ : २ इतके असेल.
१.४. राष्ट्रध्वजाचे प्रमाणित आकार पुढीलप्रमाणे असतील
१.५. ध्वज लावण्यासाठी, त्याचा योग्य तो आकार निवडण्यात यावा. ४५० x ३०० मि.मी. आकाराचे ध्वज अति विशेष मान्यवर व्यक्तींच्या विमानांकरिता आहेत, २२५ x १५० मि.मी. आकाराचे ध्वज मोटारगाड्यांवर लावण्याकरिता आहेत व १५० x १०० मि.मी. आकाराचे ध्वज टेबलावर लावण्याकरिता आहेत.
भाग दोन
जनतेतील कोणत्याही व्यक्ती, खाजगी संघटना, शैक्षणिक संस्था, इत्यादींनी ध्वजारोहण करणे/राष्ट्रध्वज लावणे / राष्ट्रध्वजाचा उपयोग करणे.
कलम एक
२.१. बोधचिन्हे व नावे (अनुचित वापरास प्रतिबंध) अधिनियम, १९५०* आणि राष्ट्र प्रतिष्ठा, अपमान प्रतिबंध अधिनियम, १९७१** आणि या विषयावर अधिनियमित केलेला इतर कोणताही कायदा यांत तरतूद केलेल्या मर्यादांव्यतिरिक्त सर्वसाधारण जनतेतील कोणत्याही व्यक्तीं, खाजगी संघटना, शैक्षणिक संस्था इत्यादींना राष्ट्रध्वज लावण्यावर कोणतेही निर्बंध असणार नाहीत. उपरोक्त अधिनियमाच्या तरतुदी विचारात घेता,–
(एक) बोधचिन्हे व नावे (अनुचित वापरास प्रतिबंध) अधिनियम, १९५० चा भंग करून वाणिज्यिक प्रयोजनासाठी ध्वजाचा वापर करता येणार नाही.
(दोन) कोणत्याही व्यक्तीस किंवा वस्तुस मानवंदना देण्यासाठी ध्वज खाली आणता येणार नाही.
‘बोधचिन्हे व नावे (अनुचित वापरास प्रतिबंध) अधिनियम, १९५०
कलम २ः या अधिनियमामध्ये, संदर्भानुसार दुसरा अर्थ अपेक्षित नसेल तर :– (क) ” बोधचिन्ह” याचा अर्थ अनुसूचीमध्ये विनिर्दिष्ट केलेले असे कोणतेही बोधचिन्ह, मुद्रा, ध्वज, अधिचिन्ह, कुलचिन्ह किंवा चित्र प्रतिरुपण असा आहे.
कलम ३ : त्या त्या काळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्यात काहीही अंतर्भूत असले तरी, केंद्र शासन विहित करील अशी प्रकरणे व अशी परिस्थिती खेरीजकरून एरव्ही, कोणत्याही व्यक्तीला अनुसूचीमध्ये विनिर्दिष्ट केलेले कोणतेही नाव किंवा बोधचिन्ह किंवा त्याची कोणतीही आभासी प्रतिकृती यांचा, केंद्र शासनाच्या किंवा शासनाने यासंबंधात प्राधिकृत केलेल्या कोणत्याही शासकीय अधिका-याच्या पूर्वपरवागीशिवाय, कोणताही व्यापार, व्यवसाय, आजिविका किंवा पेशा यांच्या प्रयोजनार्थ, अथवा कोणत्याही स्वामित्व हक्काच्या शीर्षकात, अथवा कोणत्याही व्यापार चिन्हात किंवा चिन्हाकृतीत वापर करता येणार नाही किंवा वापर चालू ठेवता येणार नाही.
टीप : भारताचा राष्ट्रीय ध्वज हा या अधिनियमाच्या अनुसूचीमध्ये बोधचिन्ह म्हणून विनिर्दिष्ट करण्यात आला आहे. ** राष्ट्र प्रतिष्ठा अवमान प्रतिबंध अधिनियम, १९७१
कलम २ : जो कोणी, कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी किंवा कोणत्याही अन्य ठिकाणी लोकांच्या देखत भारतीय राष्ट्रध्वज किंवा त्याचा कोणताही भाग जाळील, छिन्नविच्छिन्न करील, विरुप करील, त्याचे पावित्र्य विटाळील, तो विद्रुप करील, नष्ट करील, पायांखाली तुडवील किंवा अन्यथा त्याची बेअदबी करील (मग ती तोंडी किंवा लेखी शब्दाद्वारे असो या कृतीद्वारे असो) त्याला तीन वर्षांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीचा कारावास किंवा द्रव्यदंड, किंवा दोन्ही शिक्षा होतील. स्पष्टीकरण १.- कायदेशीर मार्गाने भारतीय राष्ट्रध्वजात बदल घडवून आणण्याच्या हेतूने, भारतीय राष्ट्रध्वजाबाबत किंवा शासनाच्या कोणत्याही उपाययोजनांबाबत नापसंती दर्शविणारे अभिप्राय व्यक्त करण्याने किवा त्यावर टीकाटिप्पणी करण्याने या कलमान्वये कोणताही अपराध घडणार नाही. स्पष्टीकरण २.–” भारतीय राष्ट्रध्वज” या शब्दप्रयोगात, कोणत्याही पदार्थापासून तयार केलेले किंवा कोणत्याही पदार्थावर चितारलेले भारतीय राष्ट्रध्वजाचे किंवा त्याच्या कोणत्याही भागाचे अगर भागांचे चित्र, रंगीत
चित्र, रेखाटन किंवा छायाचित्र, अथवा अन्य दृश्य प्रतिरुपण अंतर्भूत आहे. स्पष्टीकरण ३. सार्वजनिक ठिकाण” या शब्दप्रयोगाचा अर्थ, जनतेने वापरावी हा हेतू असलेली किंवा जेथे त्यांना प्रवेश असेल अशी कोणतीही जागा असा आहे, व त्यात कोणत्याही सार्वजनिक वाहनाचा अंतर्भाव आहे.
४
(तीन) ज्या प्रसंगी, शासनाने दिलेल्या निदेशांनुसार सरकारी इमारतींवरील ध्वज अर्ध्यावर उत्तरविण्यात येतो त्या प्रसंगाखेरीज ध्वज अर्ध्यावर उतरविण्यात येणार नाही;
(चार) खाजगी अंत्यसंस्कारासह जे कोणतेही असेल अशा कोणत्याही स्वरूपातील आच्छादन म्हणून ध्वजाचा वापर करता येणार नाही;
(पाच) ध्वजाचा कोणत्याही प्रकारच्या पोशाखाचा अथवा गणवेशाचा भाग म्हणून वापर करता येणार नाही किंवा त्याचे उशा, हातरुमाल, हातपुसणे यांवर किंवा कोणत्याही पोषाख साहित्यावर भरतकाम करता येणार नाही किंवा छपाई करता येणार नाही;
(सहा) ध्वजावर कोणत्याही प्रकारची अक्षरे लिहिता येणार नाहीत;
(सात) ध्वजाचा कोणतीही वस्तू घेण्याचे, देण्याचे, बांधण्याचे किंवा वाहून नेण्याचे साधन म्हणून वापर करता येणार नाही;
परंतु, विशेष प्रसंगी आणि प्रजासत्ताक दिन व स्वातंत्र्य दिन यांसारख्या राष्ट्रीय दिनी तो साजरे करण्याचा एक भाग म्हणून ध्वज फडकविण्यापूर्वी ध्वजाच्या आतील भागात फुलांच्या पाकळ्या ठेवण्यास कोणतीही हरकत असणार नाही;
(आठ) एखाद्या पुतळ्याचे अनावरण करण्यासारख्या प्रसंगी, ध्वजाचा वापर करण्यात येईल तेव्हा तो सुस्पष्टपणे व वेगळा दिसेल अशाप्रकारे लावण्यात यावा आणि त्याचा पुतळा किंवा स्मारकाचे आवरण म्हणून वापर करता येणार नाही:
(नऊ) ध्वजाचा वक्त्याचा टेबल (डेस्क) झाकण्यासाठी वापर करता येणार नाही किंवा वक्त्याच्या व्यासपीठावर आच्छादता येणार नाही;
(दहा) ध्वजाचा जाणीवपूर्वक भूमिशी किंवा जमिनीशी स्पर्श होऊ देऊ नये किंवा तो पाण्यावरून फरफटत नेऊ नये;
(अकरा) ध्वज मोटार वाहन, रेल्वे गाडी, जहाज किंवा विमान यांच्या झडपावर, छतावर, बाजूंवर
किंवा पाठीमागच्या बाजूस आच्छादता येणार नाही;
(बारा) ध्वजाचा एखाद्या इमारतीचे आच्छादन म्हणून वापर करता येणार नाही; आणि
(तेरा) ध्वजाचा” केशरी ” रंगाचा पट्टा खालच्या बाजूस येईल अशाप्रकारे जाणीवपूर्वक ध्वज लावता येणार नाही.
२.२. जनतेतील कोणतीही व्यक्ती, खाजगी संघटना किंवा शैक्षणिक संस्था यांना राष्ट्रध्वजाची प्रतिष्ठा व सन्मान राखून सर्व प्रसंगांच्या व समारंभाच्या दिवशी किंवा अन्यथा ध्वजारोहण करता येईल. राष्ट्रध्वज लावता येईल.
(एक) ज्या ज्या ठिकाणी राष्ट्रध्वज लावण्यात येईल अशा प्रत्येक ठिकाणी त्याची प्रतिष्ठा राखून आणि तो स्पष्टपणे दिसेल अशा रीतीने लावला पाहिजे;
(दोन) फाटलेला अथवा चुरगळलेला ध्वज लावण्यात येऊ नये;
(तीन) ध्वज अन्य कोणत्याही, ध्वजासोबत किंवा ध्वजांसोबत एकाच वेळी एकाच काठीवर फडकवू नये;
(चार) या संहितेच्या भाग तीनच्या कलम नऊ मध्ये अंतर्भूत केलेल्या तरतुदींव्यतिरिक्त कोणत्याही वाहनांवर ध्वज लावण्यात येऊ नये;
(पाच) जेव्हा एखाद्या वक्त्याच्या व्यासपीठावर ध्वज लावायचा असेल तेव्हा वक्त्याचे तोंड श्रोत्यांकडे असताना त्याच्या उजव्या बाजूकडे ध्वज लावण्यात यावा किंवा वक्त्याच्या पाठीमागे लावताना तो भिंतीवर वक्त्याच्या पाठीमागे वरच्या बाजूला लावावा;
(सहा) जेव्हा ध्वज भिंतीवर सपाट व आडया लावण्यात आला असेल तेव्हा ध्वजातील केशरी रंगाचा पट्टा सर्वांत वर असावा, आणि जेव्हा ध्वज उभा लावण्यात आला असेल तेव्हा ध्वजातील केशरी रंगाचा पट्टा त्याच्या (ध्वजाच्या) उजव्या बाजूस असावा (म्हणजे ध्वजाकडे तोंड करून उभ्या असलेल्या व्यक्तीच्या डाव्या बाजूस असावा);
(सात) राष्ट्रध्वज, या संहितेच्या भाग एक मध्ये विहित केलेल्या प्रमाण विनिर्देशांशी शक्य तेवढ्या प्रमाणात अनुरूप असावा;
(आठ) राष्ट्रध्वजापेक्षा ऊंच किंवा राष्ट्रध्वजाच्या वर किंवा त्याच्या बरोबरीने अन्य कोणताही ध्वज किंवा पताका लावू नये; तसेच ज्या काठीवर ध्वज फडकत ठेवला असेल त्या काठीवर किंवा त्या काठीच्या वरच्या टोकावर फुले किंवा हार यासह कोणतीही वस्तू ठेवू नये अथवा बोधचिन्ह लावू नये;
(नऊ) ध्वजाचा तोरण, गुच्छ अथवा पताका म्हणून किंवा अन्य कोणत्याही प्रकारे शोभेसाठी उपयोग करू नये :
(दहा) कागदापासून तयार केलेला ध्वज जनतेला महत्त्वपूर्ण अशा राष्ट्रीय, सांस्कृतिक व क्रीडा विषयक कार्यक्रमांच्या वेळी लावता येईल. तथापि, असे कागदी ध्वज अशा कार्यक्रमानंतर जमिनीवर टाकू नयेत किंवा फेकू नयेत. ध्वजाची प्रतिष्ठा राखून शक्यतोवर खाजगीरीत्या त्याची विल्हेवाट लावावी:
(अकरा) जेव्हा ध्वज मोकळ्या जागेत लावावयाचा असेल तेव्हा हवामानाची स्थिती विचारात न घेता शक्यतोवर तो सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत लावण्यात यावा :
(बारा) ध्वज फाटेल अशा कोणत्याही रीतीने तो लावू नये किंवा बांधू नये, आणि