करिअर कसे निवडावे? करिअर निवडण्यासाठी काय करावे? पालक आणि विद्यार्थ्यांसाठी महत्वाचा लेख how to selected carrier
मूल जन्माला आल्यापासून पालकांनी मुलांचे आयुष्य पुढे भविष्यात तो कोण होणार? या प्रश्ना समोर घुटमळत राहते आणि त्याची उत्तरे वयानुरूप बदलत राहतात म्हणजे एखाद मूल आकाशाकडे बघत म्हणते मी वैमानिक होणार, थोडे मोठे झाल्यावर म्हणते मी डॉक्टर होणार अजून थोडे मोठे झाल्यावर म्हणते मी खेळाडू होणार तर काही पालक स्वतः आपल्या पाल्याचे करियर ठरवून मोकळे होतात अशा सगळ्या अनिश्चिततेच्या वातावरणात एक गोष्ट प्रामुख्याने आपण विसरतो ती म्हणजे मुलांची आवड, क्षमता, कल, व्यक्तिमत्व, आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे त्यांच्यात असलेली नैसर्गिक प्रतिभा यापैकी कुठलेच पैलू लक्षात न घेता करीअर ठरवणे म्हणजे वाळवंटात पाणी शोधण्यासारखे आहे!!
भारतीय पालक करिअर निवडताना 3P मध्ये जास्त अडकलेली मला दिसतात हे 3P म्हणजे परदेस, पॅकेज, आणि पोझिशन. परंतु या 3P मध्ये न अडकता आवड, अनुभव व कामातील आनंद या तीन शब्दावरून वर लक्ष केंद्रित केल्यास हळूहळू का होईना प्रथम पॅकेजचा लाभ मिळणे शक्य होते, पोझिशन यथावकाश हमखास मिळतेच, कामाच्या गरजेनुसार कदाचित परदेशवारी सुद्धा करू शकते. मुळात कोण व्हायचे? यापेक्षा मला ते का व्हायचे? प्रश्नातून उत्तरे सापडत जातात,हे मुलांना समजावणे अधिक महत्त्वाचे आहे.
काही सुशिक्षित पालक ज्यांचे आपल्या पाल्यावर बारकाईने लक्ष असते किंवा जे मुलांचा गृहपाठ नियमितपणे घेत असतात त्यांना आपल्या पाल्याची विषया निहाय शैक्षणिक गुणवत्ता माहीत असते जसे की आमच्या पिंकी ला सायन्स मध्ये पैकीच्या पैकी गुण मिळतात म्हणून आम्ही तिला डॉक्टर बनवणार आहोत किंवा आमचा मोठा मुलगा कौस्तुभ गणितात खूप हुशार आहे तर तो इंजिनिअरिंग करेल अशी वरचेवर फक्त एकाच विषयानुसार करियर निवडून मोकळे होतात पण तसं करिअर निवडणे इतकं सोपं असतं का? म्हणजे बघा डॉक्टर होण्यासाठी सायन्स मधील बायोलॉजी या विषयाची आवड असणे ही फक्त आपल्या अभ्यासापुरती ठीक आहे पण एक यशस्वी डॉक्टर होण्याकरता आपल्या पाल्याची सेवाभावी वृत्ती आहे का? किंवा आपला पाल्य कुठल्याही परिस्थितीत मनाचा समतोल राखण्याची वृत्ती किंवा लोकांमध्ये मिसळायला त्याला जमते का? यावर अधिक विचार करून निर्णय घ्यायला हवा तर इंजिनिअरिंग म्हणजे नवनिर्मिती तर आपला पाल्य नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी उत्सुक असतो का? किंवा स्वतःला परिपूर्ण ठेवण्यासाठी धडपडत असतो का? किंवा त्याला कुठल्याही समस्येवर स्वतःच्या कल्पकतेतून उत्तरे शोधता येतात का? अशा प्रश्नांची उत्तरे जर सकारात्मक असतील तरच इंजिनीरिंग साठी विचार व्हायला हवा.
आपला स्वभाव आणि करिअर यांचे एकमेकांशी अतूट नाते असते ज्या क्षेत्रात करिअर यशस्वी घडवायचे आहे त्यासाठी आपल्याला आपल्या स्वभावाची योग्य जाणीव असायला हवी असे बरेच अनुभव मला रोज येत असतात. मंगेश नावाचा चोवीस वर्षांचा युवक एकदा माझ्याकडे कौन्सलिंगसाठी आला होता मंगेश लहानपणापासून अभ्यासू व्यक्तिमत्व.. शाळेतून पहिला येणारा म्हणून एका प्रतिष्ठित कॉलेज मधून इंजिनिअर झाला नंतर लगेच एमबीए करून एका नामांकित कंपनीच्या मार्केटिंग डिपार्टमेंट चा हेड म्हणून रुजू झाला पण मग पहिल्या सहा महिन्यातच त्याला आपल्या जॉब चा कंटाळा यायला लागला म्हणून माझ्याकडे सल्ला घ्यायला आला. मंगेश मधील नैसर्गिक गुणवत्ता तपासल्यानंतर माझ्या लक्षात आले की मुळात मंगेशा मितभाषी म्हणजे कमी बोलणारा ज्याला मानसशास्त्राच्या भाषेत Introvert/अंतर्मुखी असं व्यक्तिमत्व म्हणजे अशा लोकांना स्वतःबरोबर वेळ घालवणे अधिक पसंत असते ,अंतर्मुखी लोक गरजेपुरताच लोकांमध्ये मिसळायला आवडते परंतु त्याच्या कामानिमित्त रोज नवीन लोकांना भेटणे, आपल्या कल्पना त्यांना पटवून देणे,आपल्या सहकाऱ्यांना प्रोत्साहित करणे असा त्याचा नित्यक्रम होता पण मंगेशचा मूळ स्वभाव याच्या अगदी विरुद्ध असल्याने भरघोस पगार असून सुद्धा त्याला त्याचा जॉब नकोसा वाटायला लागला, हा आणि असे कितीतरी मंगेश आपल्या आजूबाजूला असतात. शिक्षण घेतले एक,काम दुसऱ्याच प्रकारचे आणि मग हे तर आपल्याला आवडतच नाहीये हे समजले की सुरू होते आयुष्यभराची घुसमट! हे सगळे टाळण्यासाठी आणि योग्य
करिअर निवडण्यासाठी स्वतःची ओळख असणे नितांत गरजेचे आहे आणि आता स्वतःची ओळख जाणून घेण्यासाठी विज्ञानाने खूप प्रगती केली आहे.
एकविसावं शतक हे स्पेशलायझेशनच आणि आपण निवडलेल्या क्षेत्रात उंच उंच जाण्याच तुम्ही त्याचं क्षेत्रात उंच जाऊ शकता ज्या क्षेत्रासाठी लागणारे विशिष्ट बुद्धिमत्तेचा कॉम्बो तुमच्यात निसर्गतः आहेत आणि म्हणूनच स्वतःसाठी योग्य करिअर निवडताना आपण आपल्या विशिष्ट बुद्धिमत्तेचा कॉम्बो लक्षात घ्यायला हवा कारण प्रत्येक मेंदूच्या डिझाईन वेगळं!! प्रत्येक मेंदूची संरचना वेगवेगळे असते.*”व्यक्ती तितक्या प्रकृती*” असे आपण म्हणतो हीच संकल्पना थोडी पुढे नेली तर मग आपल्याला म्हणावे लागेल *”व्यक्ती तितक्या मेंदूच्या संरचना.*”
मेंदूच्या या वेगवेगळ्या संरचनेविषयी आणि आपल्यातील नैसर्गिक गुणवत्ता शोधण्यासाठी *डॉ. हावर्ड गार्डनर या अमेरिकन मानसशास्त्रज्ञाने बहुआयामी बुद्धिमत्तेची संकल्पना मांडलेली आहे*. गार्डनर यांनी लिहिलेल्या *”फ्रेम्स ऑफ माईंड”* या पुस्तकाची सुरूवातच *”प्रत्येक मूल स्मार्ट असतेच”* अशा वाक्याने करतात पाठोपाठ प्रत्येक मूल वेगवेगळ्या आघाड्यांवर कमी अधिक स्मार्ट असते हेही ठासून सांगतात उदा. विराट कोहली हा क्रिकेटमध्ये कितीही ग्रेट असला तरी गायला सांगितल्यावर तो काही सोनू निगम होऊ शकणार नाही किंवा सोनू निगमने फलंदाजीची कितीही रात्रंदिवस प्रॅक्टिस केली तरी तो काही विराट कोहली होऊ शकणार नाही म्हणजेच शारीरिक कौशल्यांच्या आघाडीवर कोहली स्मार्ट आहे तर सोनू निगम सांगितिक बुद्धिमत्ता किंवा संगीतात स्मार्ट आहे. एखादे ए.पी.जे. अब्दुल कलाम असतात जे शास्त्रज्ञ आहेत, वीणा सुंदर वाजवतात, भारावून टाकणारे प्रेरणादायी लिखाणही करतात,लहान पोरांची सहज संवाद साधतात, आणि त्याच वेळेस राष्ट्रपती म्हणून राजकारण यांसोबत कामही करतात ही खरी बहुआयामी प्रतिमा पण प्रत्येक मूल सगळ्याच आघाड्यांवर स्मार्ट नसतात हेच प्रत्येक आई-वडिलांनी सर्वप्रथम लक्षात घेतले पाहिजे.
डॉ.हावर्ड गार्डनर यांनी बुद्धिमत्तेचे आठ वेगवेगळे पैलू मांडले आहेत आपल्याकडेही प्राचीन काळापासून अष्टपैलू सांगितलेले आहेच की!!
*१. भाषिक गुणवत्ता/Linguistic Intelligence*
अशा प्रकारची निसर्गदत्त गुणवत्ता लाभलेली मुले ही शब्दप्रभू असतात भाषेची चांगली जाण असते वेगवेगळ्या भाषा शिकण्याची आवड असते शब्दसंपत्ती चा खजिना भरून वाहत असतो म्हणजेच बघाना कवित्री बहिणाबाई चौधरी यांनी निरक्षर असून सुद्धा अनेक कवितांची रचना केली.
*२. तार्किक किंवा गणिती गुणवत्ता/ Logical Mathematical Intelligence*
क्रमबद्ध विचार करणे, आकड्यांशी सहज खेळणे, बुद्धिबळ,कोडी अशा गोष्टींची आवड असते. अशा प्रकारची नैसर्गिक गुणवत्ता असलेल्या मुलांना नफा-तोट्याचे गणित चटकन कळते.उदा. श्रीनिवास रामानुजन, विश्वनाथन आनंद, शकुंतलादेवी.
*३. निसर्गविषयक बुद्धिमत्ता/Naturalistic Intelligence*
या बुद्धिमत्ता चा डॉ. हावर्ड गार्डनर यांनी 1996 मध्ये प्रथम केला अशा प्रकारच्या मुलांना निसर्गाची आवड, जाणीव व ओढ असते, प्राणी-पक्षी-वृक्षांची ओळख पटकन पटते निसर्गाच्या सानिध्यात राहायला आवडते उदा. पक्षी तज्ञ डॉ. सलीम अली डॉ. प्रकाश आमटे.
*४. शारीरिक गतीबोधक/ Bodily Kinesthetic*
अशा प्रकारची मुले ही अत्यंत उत्साही, चपळ,मैदानावर न थकता खेळण्यात गती असणारी, शरीरावर नियंत्रण असणारी ही मुले नृत्य,खेळ यामध्ये चुणूक दाखवण्याची गुणवत्ता असते उदा. सचिन तेंडुलकर, प्रभुदेवा, मेरी कोम
*५. दृश्यात्मक-अवकाशीय/ Visual-Spatial Intelligence*
कल्पकता या मुलांची नैसर्गिक देणगी असते अशी मुले सर्जनशील असतात त्यांना जगावेगळे प्रश्न पडतात जसे की आकाश निळे च का? पाण्याला रंग का नसतो? असे आणि इतर अनेक प्रश्न अगदी लहान वयापासूनच पडायला लागतात आणि मोठे झाल्यावर सुद्धा अशा प्रश्नांचा शोध घेण्यात रस दाखवतात, असे विद्यार्थी संशोधन या क्षेत्रात उत्तम काम करू शकतात
उदा. ए.पी.जे अब्दुल कलाम, डॉ. रघुनाथ माशेलकर, एलोन मस्क
*६. सांगितिक गुणवत्ता/Musical Intelligence*
सूर-ताल-लय या मुलांच्या नसानसांत भिनलेली असते अशा प्रकारचे मुल हे भावनाप्रधान असते, गाणे गुणगुणणे, सहज सुंदर गाणे, ताल धरणे ही सांगितिक बुद्धिमत्तेचे वैशिष्ट्य आहे उदा. ए.आर.रहमान,
लता मंगेशकर.
*७. आंतरव्यक्ती बुद्धिमत्ता /Interpersonal Intelligence*
दुसऱ्यांच्या भावना समजून घेणे त्याप्रमाणे योग्य तो प्रतिसाद देणे, सगळ्यांशी जुळवून घेणे, म्हणजे आंतरव्यक्ती बुद्धिमत्ता थोडक्यात अशा विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व कौशल्य निसर्गतः असते उदा. नरेंद्र मोदी,सुभाष चंद्र बोस.
*८.व्यक्ती अंतर्गत बुद्धिमत्ता / Intrapersonal Intelligence*
स्वतःला स्वतःच्या भावनांची चांगली ओळख असणे,आपल्या व्यक्तिमत्त्वाची शक्ती ओळखून त्यानुसार निर्णय घेता येणे, स्वतःवर नियंत्रण ठेवणे,थोडक्यात सांगायचे झाल्यास तर परिपक्वता या कौशल्यांनाच व्यक्ती अंतर्गत बुद्धिमत्ता म्हणतात.उदा. शिवाजी महाराज,स्वामी विवेकानंद
आपला निसर्ग इतका निष्ठुर नक्कीच नाहीये की त्यांना फक्त लता मंगेशकर ,सचिन तेंडुलकर, अमिताभ बच्चन, धीरूभाई अंबानी, यांनाच फक्त गुणवत्ता बहाल केल्या परंतु निसर्गाने आपल्यातील प्रत्येकाला सुद्धा वरील आठ गुणवत्ता पैकी कुठल्यातरी एका नैसर्गिक गुणवत्तेचा धनी बनवलेला आहे थोडक्यात आपल्या प्रत्येकात एक राजहंस दडलेला आहे फक्त प्रश्न आहेत तो म्हणजे ती नैसर्गिक गुणवत्ता ओळखल्या जाण्याचा ते जेवढे आपल्याला लवकरात लवकर शोधता येईल तेवढे उत्तम!!
मी गेल्या ९ वर्षापासून विद्यार्थ्यांना करियर मार्गदर्शन करत आहे मानसशास्त्रीय बुद्धिमापन कसोटी आता झपाट्याने विकसित होत आहे. डॉ.हावर्ड गार्डनर यांनी मांडलेल्या बहुआयामी बुद्धिमत्ता प्रत्यक्षात मोजता येते. प्रत्येक व्यक्ती हा विशिष्ट बौद्धिक, भावनिक, सामाजिक, शारीरिक,बुद्धिमत्तेचा कॉम्बो असतो व प्रत्येक करियरला एका विशिष्ट कॉम्बो ची गरज असते या दोन्ही गोष्टी मॅच केल्या *की झालं तुम्ही त्या क्षेत्रातील हीरो होणारच*!! परंतु बहुतांश वेळा करिअर फक्त परीक्षेतील मिळालेल्या टक्केवारीनुसार निवडण्यात येते पण नंतर मात्र त्यात करिअर करण्याची इच्छा होत नाही.
प्रत्येक विद्यार्थ/विद्यार्थिनी हुशार असतेच फक्त ती हुशारी नेमकी कोणत्या क्षेत्रात आहे? याचा शोध घेऊन व विद्यार्थ्यांची नैसर्गिक उपजत-गुणवत्ता,कौशल्य कॅपॅसिटी,व्यक्तिमत्व,आवड यानुसार करिअर निवडणे अत्यंत महत्त्वाचे आहे. योग्य वेळी, योग्य पद्धतीने व योग्य मार्गदर्शन किंवा दिशा न मिळाल्यामुळे आयुष्यात फरपट झालेले अनेक लोक माझ्या पाहण्यात आहेत. नशीबाने जे घडेल ते सर्व दैवावर हवाला ठेवून स्वीकारत राहतात. क्षमता,पात्रता, कर्तृत्व,चिकाटी, श्रद्धा असून सुद्धा योग्य वेळी, योग्य पर्याय अथवा मार्ग न निवडल्यामुळे जीवन ढकलत असतात त्यातील काही अपघाताने यशस्वी होतातही परंतु बहुतेक जण वैफल्य आणि असमाधान यामुळे आयुष्यभर ग्रासलेले असतात
_*एक मोड गलत मुडा में राहे सफर मे*_
_*और तमाम उम्र मंजिल मुझे तलाशती रह गई*_
असे म्हणण्याची वेळ कुणावरही येऊ नये यासाठी ज्याप्रमाणे आपण वैद्यकीय सल्ला घेण्यासाठी डॉक्टर कडेच जातो किंवा कायदेविषयक सल्ला घेण्यासाठी वकिलाकडे जातो तसेच एखादी इमारत बांधण्यासाठी आर्किटेक चा सल्ला घेत असतो तसेच स्वतःचे करिअर घडवायचे असेल तर आपले नातेवाईक काय म्हणतायेत?किंवा माझे मित्र मैत्रिणी कुठल्या साईडला जात आहेत? असल्या फुटकळ गोष्टींचा विचार न करता एखाद्या अनुभवी करिअर कौन्सिलर चा सल्ला घेणे आयुष्यभर लाभदायी ठरते!!
✍