HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी काय प्रक्रिया आहे? फसवणूक टाळण्यासाठी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा High Security Registration Plate

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी काय प्रक्रिया आहे? फसवणूक टाळण्यासाठी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा High Security Registration Plate

1 एप्रिल 2019 पूर्वीच्या सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) बसविण्याची सक्ती करण्यात आली आहे.

ही नंबर प्लेट 31 मार्चपर्यंत बसवायची आहे. मुदतीच्या आत नंबर प्लेट बसवली नाही, तर मोटर वाहन कायदा 1988 नुसार 1000 रुपयांचा दंड आकारला जाईल, असं परिवहन विभागाकडून सांगण्यात आलंय. त्यासाठी जुन्या वाहनांना नवीन नंबर प्लेट बसविण्यासाठी वाहनधारकांची लगबग सुरू आहे.

पण नवीन नंबर प्लेट बसवून घेताना काहीजण सायबर फसवणुकीचे बळी सुद्धा ठरत आहेत. काही बनावट वेबसाईट तयार झाल्या असून त्यावरून वाहनधारकांची फसवणूक होत आहे. ही सायबर फसवणूक कशी टाळायची? नंबर प्लेट मिळवण्याची अधिकृत प्रक्रिया काय आहे? हे सविस्तर जाणून घेऊया.

तत्पूर्वी, हाय सिक्युरिटी नंबर प्लेट म्हणजे काय? हे समजून घेऊ

हाय सिक्युरीट रजिस्ट्रेशन प्लेट्स (HSRP) ही अल्युमिनियमपासून बनवलेली नंबर प्लेट असून या प्लेटच्या डाव्या कोपऱ्यात एक युनिक लेसरने कोरलेला 10 अंकी पीन असतो. यावर स्टीकरप्रमाणे दिसणारा होलोग्राम असून त्यावर वाहनांच्या सर्व तपशीलाची ऑनलाइन नोंद असते.

तसेच, रात्रीच्या वेळी नंबर प्लेट व्यवस्थित दिसावी, यासाठी रेट्रो-रिफ्लेक्टीव्ह फिल्म देखील या नंबर प्लेटवर असते. ही नंबर प्लेट सुरक्षेच्या दृष्टीनं महत्वाची असून बनावट नंबर प्लेट तयार करून फसवणूक करणाऱ्यांना ही प्लेट तयार करता येत नाही.

तसेच, बनावट नंबर प्लेट तयार करून फसवणूक करणे, फॅन्सी नंबर प्लेट तयार करणे, नंबर प्लेटवर खाडाखोड करणे यामुळे चोरीच्या वाहनांना शोधण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे एचएसआरपी या नंबर प्लेट बसविणे बंधनकारक करण्यात आलं आहे.

आता या प्लेटमुळे वाहनाच्या रजिस्ट्रेशन डिटेल्ससोबत ही प्लेट लिंक असल्यानं वाहन चोरीला गेलं तर सहजरित्या ट्रेस करता येणार आहे.

नवीन नंबर प्लेटसाठी रजिस्ट्रेशन करताना सायबर फसवणूक

ही नंबर प्लेट लावताना बनावट वेबसाईटवरून नागरिकांची फसवणूक होत आहे. अशा काही तक्रारी परिवहन आयुक्त कार्यालयात आल्याचं नागपूरचे प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण यांनी सांगितलं.

असाच फसवणुकीचा प्रकार भंडारा इथल्या बीएड महाविद्यालयाच्या प्राध्यापिका मुंडासे यांच्यासोबत घडला आहे. त्या बीबीसी मराठीसोबत बोलताना म्हणाल्या, “आता जुन्या गाड्यांची नंबर प्लेट बदलावी लागणार असा मेसेज व्हॉट्सअपवर आला होता.

“आमची एक दुचाकी जुनी असल्यानं त्यासाठी मी नंबर प्लेटसाठी रजिस्ट्रेशन करायला गुगलवर एचएसआरपी नंबर प्लेट असं सर्च केलं. तिथं एक वेबसाईट दिसली त्यावर क्लिक करून विचारलेली माहिती पूर्ण भरली.

“दुचाकीसाठी एक हजार रुपये शुल्क भरलं. पण, शेवटी मला पावती पण मिळाली नाही आणि नंबर प्लेट कधी, कुठे लावायची याचा सुद्धा काहीच मेसेज आला नाही. त्यामुळे मी भंडारा परिवहन विभागाच्या कार्यालयात गेले तर तुमच्या वाहनासाठी कुठलंही रजिस्ट्रेशन झाल्याची माहिती आमच्याकडे आली नाही असं सांगण्यात आलं. त्याचवेळी आपली फसवणूक झाल्याचं समजलं.”

फक्त एक हजार रुपये असल्यानं त्यांनी पोलिसांत तक्रार करणं टाळलं आणि पुन्हा दुसऱ्यांदा रजिस्टर केलं. त्या म्हणतात मला आधी माहिती नव्हतं की कुठली वेबसाईट अधिकृत आहे त्यामुळे माझी फसवणूक झाली. पण, त्यानंतर मी सावध झाले आणि फक्त 531 रुपयांत मला नवीन नंबर प्लेट मिळाली.”

सायबर गुन्हेगारांकडून होणारी फसवणूक कशी टाळायची?

मुंडासे यांच्यासोबत घडलेला प्रकार तुमच्यासोबतही घडू शकतो. कारण अनेक बनावट वेबसाईट सक्रीय झाल्या आहेत. त्यामुळे तुमचं बँक खातंही रिकामं होऊ शकतं. कारण, नंबर प्लेटसाठी शुल्क सुद्धा भरावं लागतं. त्यामुळे नवीन नंबर प्लेटसाठी रजिस्ट्रेशन करताना काळजी घ्या.

सायबर गुन्हेगारांकडून आपली फसवणूक होऊ नये यासाठी काय काळजी घ्यायला हवी? याबद्दल सायबर गुन्हे शाखा नागपूरचे पोलीस उपायुक्त लोहित मतानी सांगतात, “नवीन नंबर प्लेट लवकर बूक करून घरपोहोच मिळेल असा व्हॉट्सअपवर मेसेज येतो.

“नंबर प्लेट लवकर मिळविण्यासाठी लोक त्या लिंकवर क्लिक करतात. पण, त्या वेबसाईट बनावट असल्यानं नागरिकांची आर्थिक फसवणूक होते. तसेच गुगलवर देखील काही बनावट वेबसाईट आहेत त्यावरून देखील नंबर प्लेटसाठी फसवणूक होत आहे. त्यामुळे तिसऱ्या व्यक्तीद्वारे नंबर प्लेटसाठी रजिस्टर करू नका. थेट आरटीओच्या अधिकृत वेबसाईटवरून नागरिकांनी नवीन नंबर प्लेटसाठी अर्ज करावा.”

नवीन नंबर प्लेटच्या रजिस्ट्रेशनसाठी अधिकृत प्रक्रिया काय आहे?

नवीन नंबर प्लेटसाठी या फसव्या वेबसाईटला बळी पडू नका असं आवाहन नागपूर प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण यांनी केलं आहे. तसेच नंबर प्लेटसाठी रजिस्ट्रेशन करताना फसवणूक टाळण्यासाठी नेमकी अधिकृत प्रक्रिया काय आहे हे देखील समजावून सांगितलं आहे.

1. https://transport.maharashtra.gov.in ही शासकीय वेबसाईट आहे. ज्या वेबसाईटवर gov.in असं दिसतं ती शासकीय वेबसाईट आहे हे लक्षात ठेवायला हवं.

2. शासकीय वेबसाईटवर गेल्यानंतर उजव्या बाजूला एचएसआरपी नावाचा ब्लॉक दिसतो. त्यावर क्लिक केल्यानंतर एक लहान विंडो येतो. यामध्ये सर्व कार्यालयाची नावं दिसतात.

3. आपली गाडी ज्या ठिकाणी आहे ते परिवहन विभागाचं कार्यालय निवडायचं. तुमची गाडी ग्रामीणची असेल आणि सध्या गाडी शहरी भागात असेल तरी शहरातलं कार्यालय निवडून नंबर प्लेटसाठी अप्लाय करता येतं.

4. त्यानंतर आपल्याजवळ असलेल्या आरसीवरून रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा, चेसिस नंबर, इंजिन नंबरचे शेवटचे पाच पाच आकडे टाकायचे आणि मोबाईल नंबर टाकायचा.

5. त्यानंतर कॅपचा टाकून विंडो पुढे सरकते. याठिकाणी वाहन ज्या व्यक्तीच्या नावावर आहे त्या मालकाचं नाव दिसतं.

6. यानंतर शुल्क भरण्यासाठी एक विंडो येते. त्यावर दिलेला क्यूआर कोड स्कॅन करून पेमेंट करता येतो. त्यासाठीही वाहनानुसार शुल्क निर्धारित केलं आहे.

7. दुचाकीसाठी 450+18 टक्के जीएसटी म्हणजे 531 रुपये, चारचाकी आणि जड वाहनांसाठी 745+18 ट्क्के जीएसटी आणि तीनचाकी वाहनांसाठी 500 +18 टक्के जीएसटी असं शुल्क निर्धारित करण्यात आलं आहे. यात नंबर प्लेटची होम डिलिव्हरी हवी असेल तर त्याचं वेगळं शुल्क भरावं लागतं. पण, सेंटरवर जाऊन नंबर प्लेट बसवायची असेल तर कुठलंही शुल्क आकारलं जात नाही. यापेक्षा कोणी जास्त शुल्क घेत असेल तर ती फसवणूक असू शकते. कोणी अशी फसवणूक करत असेल तक्रार करण्याचं आवाहन विजय चव्हाण यांनी केलं आहे.

8. शुल्क भरल्यावर वाहनधारकाच्या मोबाईलवर ओटीपी येईल. तो टाकल्यानंतर होम डिलिव्हरी पाहिजे की सेंटरवर जाऊन नंबर प्लेट बसवायची आहे हे पर्याय विचारले जातील. आपल्या सोयीनुसार पर्याय निवडायचा आहे.

9. यानंतर नंबर प्लेट बसविण्याची तारीख, वेळ दिली जाते.

10. त्याची पावती तयार होऊन आपल्या रजिस्टर मोबाईल नंबरवर ही पावती पाठवली जाते.

11. कोणाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करता येत नसेल किंवा काही अडचणी येत असतील तर अशा वाहनधारकांसाठी परिवहन विभागात हेल्प डेस्क तयार करण्यात आला आहे. तिथं जाऊन वाहनधारकांना रजिस्ट्रेशन करता येईल. पण, यावेळी रजिस्ट्रेशन नंबर गरजेचा असतो त्यामुळे वाहनाची आरसी सोबत ठेवणं गरजेचं आहे. पण, परिवहन विभागाच्या बाहेर असणाऱ्या दलालाकडून देखील फसवणूक होऊ शकते. त्यामुळे दलालांकडे न जाता थेट परिवहन विभागात यावं असं आवाहनही विजय चव्हाण यांनी केलं आहे.

 

 

Join Now