शासकीय कर्मचाऱ्याच्या / निवृत्तीवेतनधारकाच्या मृत्यूनंतर त्याच्या अपत्यास कुटुंब निवृत्तीवेतन प्रदान करण्याबाबत family pension
शासकीय कर्मचाऱ्याच्या / निवृत्तीवेतनधारकाच्या मृत्यूनंतर त्याच्या अपत्यास कुटुंब निवृत्तीवेतन प्रदान करण्याबाबत मार्गदर्शक सूचना शासन आदेश दिनांक – ७/१/२०२५
शासकीय कर्मचाऱ्याच्या / निवृत्तिवेतनधारकाच्या मृत्युनंतर अविवाहित, घटस्फोटित किंवा विधवा मुलीला व मनोविकृती किंवा मानसिक दुर्बलता असलेल्या किंवा शारीरिकदृष्ट्या पांगळेपण किंवा विकलांगता असलेल्या अपत्यास कुटुंब निवृत्तिवेतन प्रदान करणेबाबत मार्गदर्शक सूचना
संदर्भ : १) शासन निर्णय, वित्त विभाग क्रमांक संकीर्ण-२०१५/प्र.क्र.८३/कोषा प्रशा-५. दि.३०.१२.२०१५.
२) शासन निर्णय, वित्त विभाग क्रमांक: संकीर्ण-२०१८/प्र.क्र.५०/सेवा-४, दि.०८.१०.२०१८.
३) शासन निर्णय, वित्त विभाग क्रमांक: रोनिवे-२०१९/प्र.क्र.२०८/सेवा-४, दि.०७.०५.२०१९.
४) शासन अधिसूचना, वित्त विभाग क्रमांक सेनिवे-२०१८/प्र.क्र.४४/सेवा-४,
प्रस्तावना :
दि.०८.०२.२०२४.
महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, १९८२ मधील नियम ११६ अन्वये कुटुंब निवृत्तिवेतनाबाबत तरतूदी नमूद करण्यात आलेल्या आहेत. सध्याच्या प्रचलित कार्यपध्दतीनुसार शासकीय कर्मचाऱ्याच्या व त्याच्या प्रथम वारस (पती / पत्नी) यांच्या मृत्युनंतर अविवाहित मुलीच्याबाबतीत ती २४ वर्षे वयाची होईपर्यंत अथवा तिचा विवाह होईपर्यंत यापैकी जी घटना अगोदर घडेल तोपर्यंत तिला कुटुंब निवृत्तिवेतन प्रदान करण्यात येते. तसेच मानसिक अथवा शारिरीक विकलांगता असलेल्या पाल्याला हयातभर कुटुंब निवृत्तिवेतन मिळण्याची तरतूद आहे.
शासकीय कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर ते हयात असताना त्यांची मुलगी अविवाहित, घटस्फोटित किंवा विधवा असेल व अशी मुलगी स्वतःचा उदरनिर्वाह करण्यास असमर्थ असेल तर अशा प्रकरणी केंद्र शासनाने शासकीय कर्मचाऱ्याच्या व त्याच्या प्रथम वारस (पती / पत्नी) यांच्या मृत्युनंतर कुटुंब निवृत्तिवेतन प्रदान करणेबाबत निवृत्तिवेतनाबाबत सुधारणा केलेली आहे. (कार्यालयीन ज्ञापन दि.३०.०८.२००४ व तद्नंतर वेळोवेळी केलेल्या सुधारणा)
केंद्र शासनाने केलेल्या सुधारणेच्या अनुषंगाने अशा प्रकरणी महाराष्ट्र राज्य शासनाच्या कुटुंब निवृत्तिवेतन प्रदान करण्याच्या कार्यपध्दतीमध्ये सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन परिपत्रक :
अविवाहित, घटस्फोटित किंवा विधवा मुलीच्या बाबतीत मुलीला २४ वर्षे वय पूर्ण झाल्यानंतर हयातभर, तिचा विवाह / पुनर्विवाह होईपर्यंत किंवा तिने उपजिविकेची सुरुवात करेपर्यंत यापैकी जे अगोदर घडेल तोपर्यंत पुढील अटींच्या अधिन राहून कुटुंब निवृत्तिवेतन मंजूर करण्यात येईल.
(१) शासकीय कर्मचारी ज्यावेळी सेवानिवृत्त होईल त्यावेळी त्याच्या मूळ निवृत्तिवेतन प्रकरणामध्ये त्याच्या अन्य पात्र कुटुंब निवृत्तिवेतनधारक, वारसदारांसह प्रदान आदेशामध्ये त्याच्या अविवाहित, घटस्फोटीत किंवा विधवा मुलीच्या नावाचा समावेश करण्यात यावा. कार्यालय प्रमुखाने शासकीय कर्मचाऱ्याचे निवृत्तिवेतनाचे प्रकरण तयार करतानाच नमुना ३ मध्ये कुटुंबाचा तपशील, अपत्याचा जन्म दाखला तसेच इतर आवश्यक कागदपत्रांसह निवृत्तिवेतन प्रकरण महालेखापाल कार्यालयाकडे मंजुरीकरीता पाठवावे.
(२) विधवा मुलीच्या बाबतीत, तिच्या पत्तीचा मृत्यू आणि घटस्फोटीत मुलीच्या बाबतीत कायदेशीर घटस्फोट, शासकीय कर्मचाऱ्याच्या किंवा निवृत्तिवेतनधारकाच्या किंवा त्याच्या किंवा तिच्या जोडीदाराच्या हयातीत झाला असणे आवश्यक आहे. तसेच घटस्फोटाची कार्यवाही, शासकीय कर्मचाऱ्याच्या किंवा निवृत्तिवेतनधारकाच्या / कुटुंब निवृत्तिवेतनधारकाच्या हयातीत सक्षम न्यायालयात दाखल केली असेल, परंतु त्यांच्या मृत्यूनंतर घटस्फोट झाला असेल तर, घटस्फोटीत मुलीला, घटस्फोटाच्या दिनांकापासून कुटुंब निवृत्तिवेतन प्रदेय ठरेल.
(३) जे निवृत्तिवेतनधारक / कुटुंब निवृत्तिवेतनधारक अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई जिल्हा कोषागार कार्यालयातून निवृत्तिवेतन / कुटुंब निवृत्तिवेतन घेत होते आणि मृत झालेले आहेत, त्यांच्या अविवाहित किंवा विधवा किंवा घटस्फोटीत मुलीस कुटुंब निवृत्तिवेतन अनुज्ञेय होण्यासाठी निवृत्तिवेतनधारक ज्या कार्यालयातून सेवानिवृत्त किंवा मृत झालेले आहेत त्या कार्यालयामार्फत कुटुंब निवृत्तिवेतनाचा प्रस्ताव नमुना १२ मध्ये तपशील भरून निवृत्तिवेतन / कुटुंब निवृत्तिवेतनधारकाचे मृत्यू प्रमाणपत्र, इतर भावंडांचे ना-हरकत प्रमाणपत्र आणि कुटुंब निवृत्तिवेतन देय असलेल्या मुलीचे आधार कार्ड, पॅन कार्ड, बैंक पासबूकचे प्रथम पृष्ठ, शिधापत्रिका इत्यादीच्या सांक्षाकित केलेल्या छायांकित प्रतीसह कुटुंब निवृत्तिवेतन प्रकरण मंजूरीकरीता महालेखापाल कार्यालयाकडे पाठविण्यात यावे. सदर प्रकरण अर्जदाराने परिपूर्ण अर्ज व अन्य सहपत्रे सादर केल्यानंतर कार्यालयीन कामकाजाच्या १५ दिवसांच्या आत महालेखापाल कार्यालयास सादर करण्याची जबाबदारी संबंधित कार्यालय प्रमुखाची राहील.
(४) महालेखापाल कार्यालयाने मृत झालेल्या निवृत्तिवेतनधारक / कुटुंब निवृत्तिवेतनधारकांचे निवृत्तिवेतन प्रदान आदेश (PPO) ची मागणी संबंधित अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई अथवा जिल्हा कोषागार कार्यालय यांच्याकडे करावी, अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई व जिल्हा कोषागार कार्यालय यांनी त्यांच्याकडील निवृत्तिवेतन प्रदान आदेश (PPO) अंतिम निवृत्तिवेतन प्रमाणपत्र नोंदवून महालेखापाल कार्यालयास परत करावे. महालेखापाल कार्यालयाने जुने निवृत्तिवेतन प्रदान आदेश (PPO) रद्द करून सुधारित निवृत्तिवेतन प्रदान आदेश (PPO) मंजूर करण्याची कार्यवाही करावी.
(५) शासकीय कर्मचाऱ्याच्या दोन किंवा अधिक अपत्यांपैकी एक असेल तर शेवटचे अज्ञान अपत्य यथास्थिती २१ किंवा २४ वर्षे वयाचे होईपर्यंत कुटुंब निवृत्तिवेतन प्रथमतः अज्ञान अपत्यांना प्रदान होईल आणि त्यानंतर
कुटुंब निवृत्तिवेतन मनोविकृती किंवा मानसिक दुर्बलता असलेल्या किंवा शारिरीकदृष्ट्या पांगळेपण किंवा विकलांगता आणि अविवाहित किंवा विधवा किवा घटस्फोटीत मुलगी अशी दोनही अपत्ये असतील तर मानसिक दुर्बलता असलेल्या किंवा शारिरीकदृष्ट्या पांगळेपण किंवा विकलांगता असलेल्या अपत्यास प्रथम कुटुंब निवृत्तिवेतन मंजूर करण्यात येईल. जेव्हा मोठे असलेले अपत्य अपात्र होईल, त्यानंतर त्याच्या पुढील लहान अपत्यास कुटुंब निवृत्तिवेतन देय ठरेल.
(६) मृत शासकीय कर्मचाऱ्याच्या किंवा निवृत्तिवेतनधारकाच्या मागे मानसिक दुर्बलता असलेली किंवा शारिरीकदृष्ट्या पांगळेपण किंवा विकलांगता असलेली एकापेक्षा जास्त अपत्ये असतील अशा प्रकरणी त्यांच्या जन्मक्रमानुसार कुटुंब निवृत्तिवेतन मंजूर करण्यात येईल.
(७) मृत शासकीय कर्मचाऱ्याच्या किंवा निवृत्तिवेतनधारकाच्या / कुटुंब निवृत्तिवेतनधारकाच्या मागे २४ वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या एकापेक्षा जास्त अविवाहित किंवा विधवा किया घटस्फोटीत मुली असतील अशा प्रकरणी त्यांच्या जन्मक्रमानुसार कुटुंब निवृत्तिवेतन मंजूर करण्यात येईल.
(८) शासकीय कर्मचाऱ्याच्या किंवा निवृत्तिवेतनधारकाच्या / कुटुंब निवृत्तिवेतनधारकाच्या हयातीत / मृत्यूपूर्वीच अपत्यास मनोविकृती किवा मानसिक दुर्बलता किंवा शारिरीकदृष्ट्या पांगळेपण किंवा विकलांगता अस्तित्वात असणे आवश्यक आहे.
(९) शासकीय कर्मचारी, निवृत्तिवेतनधारक किंवा कुटुंब निवृत्तिवेतनधारक हयात असताना अविवाहित किंवा विधवा किंवा घटस्फोटीत मुलगी तिच्या पालकावर किंवा पालकांवर अवलंबून असणे आवश्यक असून शासकीय कर्मचारी, निवृत्तिवेतनधारक किंवा कुटुंब निवृत्तिवेतनधारक हयात असताना त्यांच्यावर अवलंबून असल्याबाबतचे समुचित मुद्रांक पत्रावर साक्षांकित (Notarised) केलेले मूळ स्व-घोषणापत्र, संबंधित मुलीचे वास्तव्य असलेल्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी / तहसिलदार कार्यालयातील सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले सर्व मार्गांनी मिळणारे एकूण कौटुंबिक मासिक उत्पन्न (रु.७५००+ प्रचलित महागाई मता) यापेक्षा जास्त नसल्याचा उत्पन्नाचा दाखला निवृत्तिवेतन प्रकरण मंजूर करण्यासाठी आवश्यक असलेल्या इत्तर नमुन्यांसोबत कुटुंब निवृत्तिवेतन प्रकरण सादर करताना देणे आवश्यक आहे,
(१०) महालेखापाल कार्यालयाकडून निवृत्तिवेतन प्रकरण मंजूर झाल्यानंतर व कुटुंब निवृत्तिवेतन प्रदान सुरू झाल्यानंतर या प्रकरणी जिल्हाधिकारी / तहसिलदार कार्यालयाचा उत्पन्नाचा दाखला, हयातीचा दाखल प्रतिवर्षी माहे नोव्हेंबर अखेर तसेच पुनर्विवाह न केल्याबाबतचे व उपजिविकेची सुरुवात न केल्याबाबतचे स्व-घोषणापत्र प्रतिमाह अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई/ जिल्हा कोषागार कार्यालयास सादर करणे आवश्यक आहे.
(११) अविवाहित किंवा विधवा किंवा घटस्फोटीत मुलीने पुनर्विवाह केल्यास किंवा तिने उपजिविकेची सुरुवात केल्यास याबाबत तिने स्वतः कुटुंब निवृत्तिवेतन घेत असलेल्या संबंधित जिल्हा कोषागार कार्यालय / उपकोषागार कार्यालयास तात्काळ कळविणे आवश्यक आहे.
(१२) ज्या कुटुंब निवृत्तिवेतनधारक अविवाहित किंवा विधवा किंवा घटस्फोटीत मुलीला अधिसूचनेच्या दिनांकापासून म्हणजे दि.०८.०२.२०२४ पासून कुटुंब निवृत्तिवेतन अनुज्ञेय राहील. तथापि त्यांना दि.०८.०२.२०२४ पूर्वीची थकबाकी अनुज्ञेय राहणार नाही. त्यांना दि.०८.०२.२०२४ ते कुटुंब निवृत्तिवेतन प्रत्यक्ष अदा करे पर्यंतच्या कालावधीची थकबाकी अनुज्ञेय राहील,
(१३) कोषागार कार्यालयाने कुटुंब निवृत्तिवेतनाच्या अनुषंगाने निवृत्तिवेतनधारकाच्या ओळख तपासणीबाबतच्या तरतूदी संदर्भ क्र.१ वरील शासन निर्णयानुसार राहतील.
(१४) मनोविकृती किवा मानसिक दुर्बलता असलेल्या किवा शारिरीकदृष्ट्या पांगळेपण किंवा विकलांगता आलेल्या अपत्यास अथवा अविवाहित किंवा विधवा किंवा घटस्फोटीत मुलगी म्हणून कुटुंब निवृत्तिवेतन घेणाऱ्या कुटुंब निवृत्तिवेतनधारकांची माहिती निवृत्तिवेतनवाहिनी प्रणालीत संकलीत करण्यात यावी. यासाठी संचालक, लेखा व कोषागारे, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी निवृत्तीवेतनवाहिनी प्रणालीत समूचित सुविधा विकसित करून घ्यावी.
२. जिल्हा परिषदा, मान्यता प्राप्त व अनुदानित अशासकीय प्राथमिक व माध्यमिक शाळा, कृषितर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित मान्यता प्राप्त व अनुदानित अशासकीय विद्यालये तसेच कृषि विद्यापीठे व तत्सम अनुदानित संस्थांमधील कर्मचाऱ्यांना वरील परिपत्रक योग्य त्या फेरफारांसह लागू राहील.
३. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संकेतांक २०२५०१०७१५३५०६८००५ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने