इंग्रजी शाळांबाबतचे आकर्षण आत्मघाती सरकारी शाळांमध्ये उत्कृष्ट शिक्षण : सकलानी english school
लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली: इंग्रजी माध्यमाच्या शाळांबद्दल पालकांमध्ये असलेले आकर्षण हे आत्मघात करण्यासारखे आहे. आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखा हा प्रकार आहे, असे राष्ट्रीय शैक्षणिक अनुसंधान व प्रशिक्षण परिषदेचे (एनसीईआरटी) संचालक डी. पी. सकलानी यांनी सांगितले. सरकारी शाळांमध्ये उत्तम दर्जाचे शिक्षण देण्यात येते, हे पालकांनी लक्षात घेतले पाहिजे, असेही ते म्हणाले.
डी. पी. सकलानी यांनी सांगितले की, इंग्रजी माध्यमातून अभ्यास करताना घोकंपट्टी करण्याची विद्यार्थ्यांना सवय लागते. मात्र, त्यामुळे त्यांच्या ज्ञानग्रहणात कमतरता राहते. आपली संस्कृती, मूल्ये यांपासून ही मुले दूर जातात.
आई-वडील आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पाठविणे पसंत करतात. भलेही त्या शाळेत पुरेसे तसेच प्रशिक्षित शिक्षक असोत वा नसोत, मुलांना तिथे पाठविले जाते.
ही कृती म्हणजे एक प्रकारचा आत्मघात आहे. त्यामुळेच नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात मातृभाषेतून शिक्षण देण्यास प्राधान्य दिले आहे.
१२१ भाषांमधून पाठ्यपुस्तके
• सकलानी म्हणाले की, आपली मातृभाषा, पाळेमुळे नीट समजून घेतली नाही तर आपल्याला अनेक गोष्टींचे आकलन होणार नाही. केवळ एकाच भाषेमध्ये शिक्षण घेण्यावर जोर न देता विविध भाषांतून शिक्षण घेता येणे, त्या भाषा शिकता येणे आवश्यक आहे. बहुभाषी शिक्षणाचा तोच मुख्य हेतू आहे.
ओडिशामध्ये दोन आदिवासी • भाषांमध्ये पाठ्यपुस्तके तयार करण्यावर केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी भर दिला होता. तेथील विद्यार्थ्यांना स्थानिक संस्कृती, मूल्ये आदी गोष्टी चित्रे, गोष्टी, गाण्यांच्या माध्यमातून शिकविता येतील, हा त्यामागे उद्देश आहे. सध्या आम्ही १२१ भाषांमधून पाठ्यपुस्तके तयार करत आहोत.
