शिक्षकांना करावी लागतात १५६ प्रकारची अशैक्षणिक कामे अध्यापनावर परिणाम; शैक्षणिक दर्जा घसरत असल्याची चर्चा educational work
कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी अनेक वर्षापासून शासनस्तरावर प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे शिक्षकांना कराव्या लागणाऱ्या अशैक्षणिक कामांची यादी मात्र दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. अध्यापनाबरोबर सध्या शिक्षकांना १५६ प्रकारची अशैक्षणिक कामे करावे लागत असल्यामुळे त्याचा परिणाम शैक्षणिक दर्जा घसरण्यावर होऊ लागल्याचे बोलले जात आहे.
सध्या राज्यामध्ये प्राथमिक आणि माध्यमिक या दोन्ही विभागांतील शिक्षकांची सुमारे ३० टक्के पदे रिक्त आहेत. शासकीय शाळांमध्ये सुविधांचा वाणवा जाणवत असल्यामुळे तसेच शैक्षणिक दर्जाबाबत पालकांमध्ये असणारे संशयाचे वातावरण याचा परिणाम या विद्यार्थी संख्या घटण्यावरही होऊ लागला आहे. त्यामुळे शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी शासनस्तरावर विशेष उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याच प्रमाणे शाळांना सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. असे असताना शिक्षकांना करावी लागणारी अशैक्षणिक कामे मात्र त्यांचा पिछा सोडण्यास तयार नाही. यासंदर्भात शिक्षक संघटनांच्या वतीने अनेकवेळा शासन दरबारी प्रयत्न केले आहेत; परंतु त्याकडे दुर्लक्ष केले जाते.
यासंदर्भात शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या सोबत विविध शिक्षक • संघटनांच्या प्रतिनिधींनी भेट घेतली.
आणि अशैक्षणिक कामांची यादी दिली. मंत्री भुसे यांनी यासंदर्भात चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे सांगत असतानाच त्यांनी शिक्षक संघटनांची मते जाणून घेऊन अहवाल सादर करण्याच्या सूचना शिक्षण उपसंचालकांना दिल्या. त्यामुळे शिक्षकांना अशैक्षणिक कामांतून सुटका होण्याबाबत आशेचा किरण दिसू लागला आहे.
शासनाने चतुर्थ श्रेणी
कर्मचाऱ्यांची भरती बंद केल्यामुळे अगोदरच शाळा उघडण्यापासून बंद करेपर्यंत सर्व जबाबदारी शिक्षकांना पार पाडावी लागते. यामध्ये शाळेचा परिसर स्वच्छ ठेवण्यापासून शाळेत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था शिक्षकांना करावी लागते. याशिवाय निवडणुकीसंदर्भातील १०, बांधकामसंदर्भातील ५, शाळा स्तरावरील सर्वेक्षणाची ८, विविध समित्यांसंदर्भात १६ कामे, शालेय पोषण आहार योजनेची १०, आरोग्याशी संबंधित १०,
शिष्यवृत्तीसंदर्भात १५, जमा, खर्च नोंद १० व ऑनलाईनची अशैक्षणिक कामे करावी लागतात.
शिक्षकांना करावी लागणारी अशैक्षणिक कामे
• निवडणुकीसंदर्भातील कामे
• बांधकामसंदर्भातील कामे
• शाळा स्तरावरील सर्वेक्षण
• विविध समित्यांच्या कामकाजाची पाहणी
• शालेय पोषण आहार समितीची बैठक घेणे
• जंतनाशक गोळ्या देणे
• सर्व शिक्षा अभियानातील खर्चाचे लेखापरीक्षण करून घेणे
शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी
शिक्षकांना लावण्यात येणारी अशैक्षणिक कामे थांबविली पाहिजेत, तरच शासकीय शाळांमधील मुलांची गुणवत्ता सुधारेल.
– भरत रसाळे, राज्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य खासगी प्राथमिक शिक्षक समिती
शिक्षकांचे किमान ४० ते ५० तास अशैक्षणिक कामांत गेल्यामुळे तितका वेळ विद्यार्थी अध्ययनाच्या कार्यापासून वंचित राहतात. विद्यार्थ्यांवरही अन्याय होत असल्यामुळे सर्व अशैक्षणिक कामे बंद करून त्याला शिकवू द्या. – प्रसाद पाटील, राज्याध्यक्ष, पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना