जिल्हा परिषदेत आजपासून ‘ई-ऑफिस’ प्रणाली सुरु काम गतीने होणार : ऑफलाईन आवक,जावक बंद e-office pranali
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जिल्हा परिषदेत आज,शनिवारपासून ई- ऑफिस म्हणजे पेपरलेस प्रणाली कार्यान्वित होत आहे. यामुळे खाते प्रमुखांकडे ४८ तासांपेक्षा अधिक वेळ फाईल थांबली तर त्याचा मेसेज मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओं) यांना जाणार आहे. सीईओंना फाईल थांबल्याचा जाब विचारता येणार आहे. यामुळे जिल्हा परिषद कामकाजाला गती येणार आहे.
ऑफलाईन पद्धतीने फायलींची आवक, जावक स्वीकारणे बंद केले आहे. पुढील एक महिन्यात जुन्या फाईल्स आणि सर्व कागदपत्रे स्कॅन करण्यात येणार आहेत. त्यानंतर पुढील टप्यात गटविकास कार्यालयही ई- ऑफीस होणार आहे. परिणामी शासकीय काम आणि सहा महिने थांब,
असा अनुभव येण्याचे प्रमाण कमी होणार आहे.
जिल्ह्यात १०२५ ग्रामपंचायती आणि १९०० प्राथमिक शाळा, अंगणवाड्या आहेत. त्यामुळे रोज पंचायत समिती, जिल्हा परिषदेत सामान्य नागरिक तक्रारींसाठी मोठ्या संख्येने आहेत पण तक्रार केली तर त्यांना वर्षानुवर्षे न्याय मिळत नाही. दप्तर दिरंगाईमुळे त्यांच्यावर हेलपाटे
मारावे लागते.
अनेक अधिकारी तर जाणीवपूर्वक फायली दाबून ठेवतात, असाही अनुभव अनेक तक्रारदारांना आला आहे. तक्रारदार हेलपाटे मारून कंटाळल्यानंतर तो आंदोलन करतो. यामध्ये तक्रारदारांची हेळसांड होते. हे चित्र बदलण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन यांनी १ जूनपासून ई ऑफिस प्रणाली प्रभावीपणे राबवण्याचा निर्णय घेतला.
सर्व विभागप्रमुखांकडे वेळोवेळी मार्गदर्शन करून त्याची
अंमलबजावणीही सुरू केली आहे.
राज्यातील दहामध्ये कोल्हापूर
गेल्या पंधरा दिवसांत प्रायोगिक तत्त्वावर ई ऑफिस प्रणाली राबविली. त्यात ४८२ फायली ऑनलाईन अपलोड झाल्या आहेत. ऑनलाईन फायली अपलोड करण्यात राज्यातील पहिल्या दहा जिल्ह्यांत कोल्हापूर जिल्हा परिषद आहे. आज, शनिवारपासून पूर्ण क्षमतेनी ही प्रणाली कार्यान्वित होणार आहे. यासाठीच्या सर्व अडचणी सोडवण्यात आल्या आहेत. या प्रणालीमुळे कोणत्या अधिकाऱ्यांकडे कोणती फाईल किती दिवस राहिली हे निश्चित होणार आहे. दप्तर दिरंगाईची जबाबदारी निश्चित होईल. परिणामी कामचुकार, पाट्या टाकणे, जाणीवपूर्वक दप्तर दिरंगाई करण्याला चाप लागणार आहे. प्रशासन गतीमान होणार आहे.