गुरुजींना पहिल्यांदाच मिळाले महिना संपण्यापूर्वी वेतन ‘जि.प. अधिकारी व ई कुबेर’ प्रणालीला यश; शिक्षक वर्गात आनंदी आनंद E-kuber payment
• सकाळ वृत्तसेवा श्रीरामपूर पुसद, (जि. यवतमाळ), ता. ३० : जिल्हा परिषद शिक्षक व कर्मचाऱ्यांचे वेतन हे कधीच वेळेवर होत नसल्याची ओरड असली तरी यवतमाळ जिल्हा परिषदेतील अधिकारी व ई कुबेर प्रणालीमुळे मे महिन्याचे वेतन मे महिन्यातच दोन दिवस आधीच करून इतिहासात पहिल्यांदाच असे घडल्याने गुरुजींना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
जानेवारी २०२४ पासून सीएमपी प्रणाली द्वारे राज्यातील शिक्षक व कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्त्याचे प्रदान स्टेट बैंक ऑफ इंडियाच्या मार्फत थेट कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत होते. परंतु सीएमपी प्रणालीमुळे वेतन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही एक ते दोन दिवसाचा विलंब लागायचा यामुळे राज्याचे कोशागार संचालकांनी पाच एप्रिलला एक पत्र काढून आरबीआय बँकेचे ई-कुबेर प्रणालीने वेतन व भत्त्याचे प्रदान करण्याचे निर्देश राज्यातील सर्व जिल्हा परिषदांना दिले होते. त्यानुसार एप्रिल महिन्याचे वेतनाची
प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरही ई कुबेर प्रणालीतील अडथळ्यामुळे एप्रिल महिन्याचे वेतन शिक्षकांच्या खात्यात तीन दिवस विलंबाने ३ मे हा जमा करण्यात आले होते.
यवतमाळ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रकाश मिश्रा, वित्त व लेखा अधिकारी सीमा काळे, शिक्षण व वित्त विभागातील सर्व कर्मचारी तसेच शालार्थ टीमने विशेष प्रयत्न
करून ई कुबेर प्रणालीतील सर्व अडथळे दूर करून मे महिन्याची वेतनाची प्रक्रिया २० ते २२ मे दरम्यान पूर्ण केली.
त्यामुळे ई कुबेर प्रणालीने मे महिन्यातील जिल्ह्यातील शिक्षक व कर्मचाऱ्यांचे वेतन दोन दिवस आधीच (ता.३०) जमा झाल्याचे मेसेज सर्व शिक्षकांच्या भ्रमणध्वनीवर झळकल्याने जिल्ह्यातील सर्व गुरुजींना आश्चर्याचा धक्का बसला.