बदलीपात्र संवर्गासाठी शिक्षकांनी धरला अपंगत्वाच्या प्रमाणपत्राचा ‘बायपास’ मार्ग disability‘ certificate for transfer
देशोन्नती वृत्तसंकलन…
नांदेड जिल्हा परिषद शिक्षकांच्या सार्वत्रिक बदल्या ह्या शासन निर्णयातील तरतुदीच्या अधिन राहून संवर्ग -१,२ अशा करण्यात येतात. या संवर्गामध्ये समाविष्ट जिल्हा होणाऱ्या बदलीपात्र शिक्षकांना सोयीचे ठिकाण मिळत असते. नेमका हाच हेतू डोळ्यासमोर ठेवून जिल्ह्यातील शेकडो शिक्षकांनी अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळविले आहे. ज्यांनी अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळविले अशा सर्वच शिक्षकांची चौकशी केल्यास यातील मोठ्या रॅकेटचे पितळ उघडे पडणार आहे. बहुतांशी शिक्षकांनी प्रशासनाची दिशाभूल करून अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळविले आहे.
शाळेतील विद्यार्थ्यांची बोगस पटसंख्या शोधण्यासाठी पटपडताळणी मोहिम राबविली गेली होती. यामध्ये अनेक शाळा दोषी आढळून आल्या होत्या. त्यांच्यावर कारवाईचा बडगाही उगारला गेला. आता त्याच धर्तीवर ज्या-ज्या शिक्षकांनी अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळविले त्या प्रमाणपत्राची फेरपडताळणी होण्याची गरज प्रतिपादित होत आहे. मुदखेड तालुक्यात कार्यरत असलेल्या ३६१ पैकी तब्बल १०२ शिक्षक अपंग असल्याचे त्यांनी परिषद नांदेड मिळविलेल्या अपंगत्वाच्या प्रमाणपपत्रावरून दिसून येत आहे. अर्थात त्यांना सार्वत्रिक बदली प्रक्रियेत संवर्ग -१ चा लाभ मिळून सोयीचे ठिकाण मिळू शकणार आहे. मुदखेड तालुक्यातीलच शेंबोली जि.प. शाळेतील सर्वच्या सर्व शिक्षक अपंग असल्याचे या यादीमधून निदर्शनास आले आहे. नांदेड तालुक्यात ५५० शिक्षक कार्यरत असल्याचे कळते. त्यापैकी ३५० शिक्षकांनी अपंगत्वाचे प्रमाणपत्र काढले आहे. अर्धापूर तालुक्यात ४५० शिक्षकांपैकी तब्बल २०० शिक्षकांनी आपण अपंग असल्याचे दर्शविले आहे. अपंगत्वाच्या अशा बोगस प्रमाणपत्रामुळे खऱ्याखुऱ्या शिक्षकांना बदली प्रक्रियेतील लाभापासून वंचित रहावे लागणार असल्याने जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर- घुगे यांनी या प्रकरणाकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार-साहेबराव धनगे
बदली प्रक्रियेतील संवर्ग-१, २ व अन्य संवर्गाचा लाभ मिळविण्याच्या हेतूने बहुतांशी शिक्षकांनी अपंगत्वाचे बोगस प्रमाणपत्र मिळविल्याची बाब अतिशय गंभीर आहे. या प्रकारामुळे खरेखुरे बदलीपात्र शिक्षक बदलीपासून वंचित राहणार आहेत. या प्रकरणी न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार असल्याची प्रतिक्रिया जि.प. सदस्य साहेबराव धनगे यांनी दिली. येत्या १७
फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत या प्रश्नावरून रान उठविणार असल्याचेही जि. प. सदस्य धनगे यांनी सांगितले.