मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेच्या प्रचार व प्रसिद्धीकरीता माध्यम आराखड्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत cm yuva karyprashikshan 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेच्या प्रचार व प्रसिद्धीकरीता माध्यम आराखड्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत cm yuva karyprashikshan 

वाचा:-१) कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, शासन निर्णय क्र: संकीर्ण-२०२४/प्र.क्र.९०/व्यशि-३, दि. ०९.०७.२०२४

२) माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या माध्यम आराखडा नियोजन व अंमलबजावणी समितीच्या दि. २९.०७.२०२४ च्या बैठकीचे इतिवृत्त.

प्रस्तावना:-

राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची रोजगार मिळण्याची क्षमता वाढविण्याकरीता संदर्भाधीन दि. ०९.०७.२०२४ च्या शासन निर्णयान्वये “मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. सदर योजनेची माहिती अधिकाधिक युवकांपर्यंत पोहचून सदर योजनेचा लाभ जास्तीत जास्त उमेदवारांना होण्यासाठी योजनेचा व्यापक प्रचार व प्रसिद्धी होणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने सदर योजनेची प्रसिध्दी विविध माध्यमातून करण्याकरीता माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांच्याद्वारे माध्यम आराखडा तयार करण्यात आला आहे. सदर माध्यम आराखड्यास माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या माध्यम आराखडा नियोजन व अंमलबजावणी समितीच्या दि. २९.०७.२०२४ च्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. विभागाच्या विनंतीनुसार सदर आराखड्यात अंशतः बदल करुन सुधारीत माध्यम आराखडयास समितीच्या दि. ०६.०८.२०२४ च्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. सदर सुधारीत आराखड्यास व सदर आराखडा राबविण्याकरीता आवश्यक खर्चास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय:-

सन २०२४-२५ या आर्थिक वर्षामध्ये मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेच्या प्रचार व प्रसिद्धीसाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या माध्यम आराखडा नियोजन व अंमलबजावणी समितीने मान्यता दिलेल्या माध्यम आराखडयास व सदर आराखडा राबविण्याकरीता १ १,९५,२१,१००/- (अक्षरीर एक कोटी पंचाण्णव लक्ष एकवीस हजार शंभर फक्त) इतक्या खर्चास याद्वारे प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे. मान्यताप्राप्त माध्यम आराखड्यास येणाऱ्या अंदाजित खर्चाच्या तपशीलाबाबतचे परिशिष्ट-अ सोबत जोडले आहे.

२. माहिती व जनसंपर्क संचालनालयाने संबंधित जाहिरात एजन्सी/आस्थापनांना कार्यादेश देण्याच्या अनुषंगाने प्रस्तुत प्रयोजनाकरिता पुढील कार्यवाही करावी.

३. जाहिरात खर्चाची देयके आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालय यांना थेट सादर करण्यात यावीत. सदर देयके सन २०२४-२५ या चालू आर्थिक वर्षात कोणत्याही प्रकारचा विलंब न करता देय होतील याची दक्षता आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालय, नवी मुंबई यांनी घ्यावी.

४. प्रस्तुत योजनेचा प्रचार व प्रसिद्धी कार्यक्रम राबविण्यासाठी खर्च करताना शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय/आदेश / परिपत्रके तसेच वित्त विभागाच्या शासन निर्णय क्र. विअप्र- २०१३/प्र.क्र.३०/२०१३/विनियम, भाग-२, दिनांक १७ एप्रिल, २०१५ अन्वये निर्गमित केलेल्या वित्तिय अधिकार नियम पुस्तिका, १९७८ मधील तरतूदी/अटी व शर्तीचे पालन करावे.

५. प्रस्तुत प्रयोजनासाठी येणारा खर्च लेखाशिर्ष, मागणी क्र. झेडए-०२, २२३०-कामगार व सेवायोजन, ०२ सेवायोजन, ००४ संशोधन, सर्वेक्षण व सांख्यिकी, (०१) (०१) सेवायोजन रोजगार उपलब्धताविषयक माहिती व युवक रोजगार विषयक सेवा (२२३० ११०७), २६ जाहिरात व प्रसिद्धी या लेखाशिर्षाखाली सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाकरीता मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा.

 

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२४०९०२१११६०००५०३ असा आहे.

हा निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.