शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवताना कर्मचाऱ्यांकडून पैसे वसूल करू नका;कर्मचाऱ्यांच्या तक्रारी वाढल्या cctv camera in school
शिक्षक भारती संघटनेची मागणी; कर्मचाऱ्यांच्या तक्रारी वाढल्या
लोकमत न्यूज नेटवर्क सोलापूर : बदलापूर येथे शालेय विद्यार्थ्यांच्या बाबतीत घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे राज्यातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. या घटनेमुळे सोलापूर शिक्षण विभाग अलर्ट मोडवर आला असून, जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये एका महिन्याच्या आत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे आदेश शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहेत. मात्र यासाठी काही शाळा कर्मचाऱ्यांकडून आर्थिक वसुली करीत आहेत. त्याबाबत शिक्षक भारती संघटनेकडे तक्रारी आल्या असून, ‘सीसीटीव्ही कॅमेरे बसवा; मात्र कर्मचाऱ्यांकडून आर्थिक वसुली करू नका,’ असे आवाहन शिक्षक भारती संघटनेने केले आहे. याबाबतचे
निवेदन शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांना दिले आहे.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून शाळा व शाळा परिसर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीखाली असणे अत्यंत गरजेचे आहे.
वसुली थांबविण्यासाठी पत्र काढण्याची विनंती
शासनाच्या धोरणानुसार खासगी व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये संस्थांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवायचे आहेत; परंतु संस्थाचालक, मुख्याध्यापक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याकरिता शिक्षकांकडून आर्थिक मागणी करीत असल्याच्या तक्रारी संघटनेकडे आल्याने संघटनेने शिक्षणाधिकारी यांना निवेदनातून या प्रकारची बेकायदेशीर आर्थिक वसुली करण्यात येऊ नये, असे पत्राद्वारे
माध्यमिक शाळांना आदेशित करण्याची मागणी केलेली आहे.
बदलापूरसारख्या घटना मानवतेस काळिमा फासणाऱ्या आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे बसलेच पाहिजेत, कॅमेरे बसवण्यासाठी संस्थाचालक, मुख्याध्यापक यांनी शासन धोरणाप्रमाणे वेतनेतर अनुदान, लोकसहभाग यांतून निधी वापरावा. सीसीटीव्ही कॅमेयांसाठी शाळेतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून आर्थिक वसुली करू नये.
विजयकुमार गुंड, जिल्हा प्रवक्ता, शिक्षक भारती, सोलापूर