मृत्यू देणारी मौज….. Bhushi dam news 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मृत्यू देणारी मौज….. Bhushi dam news 

भारतात सरकारला, पोलिसांना, नोकरशाहीला, भारतात रेल्वेला, रुग्णालयांना माणसाच्या जिवाची किंमत नसते आणि त्यामुळे किड्यामुंग्यांप्रमाणे माणसे मरण पावतात, असे म्हटले जाते. ते खरेही आहे. मात्र, भारतीय नागरिकांना त्री परस्परांच्या आणि आपल्या जिवांची काही पर्वा असते का, असा प्रश्न दर वर्षी पावसाळ्यातील दुर्घटना पाहून पडतो. लोणावळा हे मुंबई-पुण्याच्या आणि इतरही ठिकाणच्या पर्यटकांच्या आवडीचे ठिकाण. मात्र, तेथे दर वर्षी अफाट गर्दीमुळे अनवस्था प्रसंग ओढवतो. कधी पोलिसांना सौम्य छडीमार करावा लागतो, तर कधी वाहतूक तासन्तास खोळंबून पडते. हे दर वर्षीचे चित्र असूनही पहिला बरा पाऊस झाला, ओढ्यांना पाणी आले, की हजारो लोक एकाच ठिकाणी जातात. त्यांना पाण्याचा अंदाज नसतो. त्या भागाची भौगोलिक माहिती नसते. अन्सारी आणि सय्यद कुटुंबांतील अनेकांचा भुशी धरणात येणाऱ्या ओढ्यात जो दुर्दैवी मृत्यू झाला आहे; तो केवळ बेपर्वाईचा परिपाक आहे. त्याच दिवशी ताम्हिणी घाटातही एक तरुण डोहात उडी मारण्याचे दुःसाहस करून बसला. व्यायामशाळेतील गटाबरोबर गेलेल्या या तरुणाला पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न घेता उडी मारण्याचे काहीच कारण नव्हते. अपरिचित पाण्याशी खेळ करू नये, इतकी साधी समज जर आपल्याला

येत नसेल, तर अशा ठिकाणी कोणत्या संत्रणा कसला प्रतिबंध करू शकणार ? लोणावळ्याजवळ भुशी धरणाच्या परिसरात प्रचंड गर्दी असल्याने अन्सारी कुटुंब आणि त्यांच्याकडच्या विवाहासाठी आग्रा येथून आलेले नातलग उलट्या बाजूने धबधब्यांजवळ पोहोचले. हे धबधबे जसे बारमाही नसतात, तसेच ते ऐन वेळच्या पावसाने काही मिनिटांत फुगतात आणि नंतर ओसरतात. त्यांच्या अशा वागण्याचा अंदाज कुणालाही नसतो. या बाजूला प्रशासनाने ‘धोका’ अशी पाटी लावली होती. इथून पाण्यात जाऊ नका, असे सांगणारी ती सूचना होती. मात्र, सरकार आणि प्रशासन यांना काय कळते आणि त्यांचे काय ऐकायचे, अशीच समाजाची धारणा असते, शिवाय, कोणतेही नियम कसे मोडून दाखविले, यातच आपल्याला शौर्य वाटते. आपण किमान समज असणारे नागरिकही नाही, हेच यातून सिद्ध होते.

पुण्याहून आलेल्या या कुटुंबासोबत चार वर्षांचा मुलगा आणि इतरही मुले होती. अशी मुले सोबत असताना तर अपरिचित डोंगरवाटांमध्ये पावसाळ्यात जाताच कामा नये. वाहत्या प्रवाहांमध्ये लहान मुलांना घेऊन जाण्यात कसली मौज आहे? ही दुर्घटना जिथे घडली तिथे कोणतीही मदत तातडीने मिळणे अशक्य होते. अशा वेळी जे वाचतात ते दैव बलवत्तर असल्याने आणि जे जातात, त्यांचे नशीब फुटके असल्याने, असा समज करून घेण्याचीही आप‌ली तयारी असते. असे एकदा म्हटले की सगळ्यांची सगळ्यांतूनच सुटका होते. आता, या परिसरात

सायंकाळी सहानंतर पर्यटक राहू देऊ नका, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. या परिसरात मागेही अनेकदा असे विविध निर्बंध घालण्यात आले होते. पण प्रतिबंधित भागात जाऊ नका, तलावाच्या पायऱ्यांवर झुंडीने जाऊ नका, निसरड्या अपरिचित वाटांमध्ये शिरू नका… इतक्या साध्या गोष्टी सांगायला पोलिस किंवा प्रशासन कशाला लागते ? इतकी किमान अक्कल पर्यटकांना का नसावी? यंदा नाशिकमध्ये चेहेडी बंधाऱ्यात काही दिवसांपूर्वीच दोन तरुणांचा मृत्यू झाला होता. त्या आधी निफाडजवळही बंधाऱ्यात दोन तरुण बुडाले होते. लोणावळ्याच्या बातम्या ताज्या असतानाच सोमवारी निपाणीजवळ काळम्मावाडी धरणातही दोन तरुण बुडाले. यातल्या बहुतेक दुर्घटनांमध्ये अनाठायी दाखविलेले शौर्य आणि बेफिकिरी हेच मुख्य कारण असते.

अलीकडे पाण्यात किंवा कुठेतरी धोक्याच्या काठावर उभे राहून काढलेले फोटो, व्हिडिओ, त्यांचे बनविलेले रील्स हे जीवघेणे ठरत आहेत. प्राण पणाला लावून समाजमाध्यमांमध्ये दाद मिळविण्याची ही कसली आसुरी हौस ? पुलाच्या कठड्यावरून खाली स्वतःला झोकून केवळ मित्राच्या हाताच्या पकडीवर लटकणे हे शौर्य नसून आत्मघाताचा झटका आहे. समाजमाध्यमांमध्ये असे काही दिसले, की त्याचे अनुकरण करणाऱ्या मूर्खाच्या फौजा तयारच असतात. जातिवंत गिर्यारोहक, जगप्रवासी किंवा साहसवीर सगळी काळजी घेऊन, सर्व उत्कृष्ट साधने वापरून आणि ती कला व शास्त्र बारकाईने शिकून धोका पत्करत असतात. निसर्गाला, धोक्यांना तोंड देण्याची ते कसून तयारी करतात. याउलट, भरेतीचा अंदाज न घेता समुद्रात चालणे किंवा पाट्यांकडे दुर्लक्ष करून सागरात खोल जाणेः हा निव्वळ मूर्खपणा असतो. अशा दुर्घटनांमधून समाज म्हणून आपण किती मागास व अप्रगत आहोत, हेच दिसते. इतरांचे जगणे आणि जीवन गंभीरपणे न घेण्याची वृत्ती भारतीयांच्या अंतर्मनात पिढ्यानपिढ्या खोलवर रुजून बसली आहे. तीच वृत्ती प्रतिबिंबासारखी उलटी होऊन स्वतःच्या आयुष्यावरही अनेकदा उतते. पारलौकिकाच्या गप्पा मारणारा दांभिक भारतीय समाज लौकिक जगण्यातले साधे संकेत, नियम पाळायला तयार नसतो. त्याची ही सारी दुर्दैवी आणि कटू फळे

आहेत.

 

Leave a Comment