या शाळा आता सकाळी ११ ते ५ वेळेत राहणार सुरू; मुख्याध्यापकांनाही मिळेल साप्ताहिक सुट्टी ashramschool timetable
शिक्षक संघटना आणि आदिवासी आयुक्तांत बैठक प्रतिनिधी । नाशिक
आश्रमशाळा आता सकाळी ११ ते ५ या वेळेत सुरू राहतील. मुख्याध्यापकांना साप्ताहिक एक दिवस सुट्टी घेता येईल, असा निर्णय आमदार किशोर दराडे यांच्या अध्यक्षतेखाली आदिवासी विकास भवन येथे शासकीय अनुदानित, विनाअनुदानित, खासगी आश्रमशाळांच्या मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी झालेल्या आयुक्त नयना गुंडे यांच्या सोबतच्या बैठकीत झाला.
संघटनेने मागण्या करताना तक्रारींचा पाढा वाचला. त्यात एक स्तर योजना सर्वांनाच लागू करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला. डीसीपीएस व एनपीएसचा हिशेब ८ दिवसांत त्या त्या कर्मचाऱ्यांना देण्याचा निर्णय झाला. शासकीय कर्मचाऱ्यांना देय १०, २०, ३० ची प्रगत आश्वासित योजना लागू करण्याबाबत आयुक्तांनी आश्वासन दिले. आदिवासी विभागात काम करणाऱ्या शिक्षकांच्या पाल्यास पदवी व पदव्युत्तर शिक्षण मोफत मिळावे, शिक्षक-शिक्षकेतर व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची पदे भरावी, शालेय शिक्षण विभाग व वसतिगृह कामकाज स्वतंत्र करून जबाबदारी निश्चित करावी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मोफत प्रवास सवलत मिळावी. सर्वच कर्मचाऱ्यांना कॅशलेस मेडिकल विमा योजनेची सुविधा उपलब्ध करून द्यावी या विषयांवर चर्चा झाली. आयुक्त गुंडे यांनी काही मुद्दे मांडले. त्यात शाळांचे १०वी १२वी चे निकाल ७० टक्क्यांपेक्षा जास्त असावे. ३० टक्के विद्यार्थी स्कॉलरशिप व इतर परीक्षांना बसवावे. शिक्षकांना ड्रेसकोड असावा. वेळेच्या आत शाळेत हजर असावे. जेवणाची क्वालीटी उत्तम असावी. यावर सर्व संघटनांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. यावेळी एस. बी. देशमुख, बी. एन. देवरे, विजय पाटील, करण बावा यांनी समस्या मांडल्या. याप्रसंगी उपआयुक्त गोलाईत, सीटूचे डॉ. डी. एल. कराड, नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव एस. बी. देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.