मंत्रालयात अभ्यागतांना व वाहनांना प्रवेश देण्याबाबत सुधारित मार्गदर्शक सूचना mantralay entry guidelines 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मंत्रालयात अभ्यागतांना व वाहनांना प्रवेश देण्याबाबत सुधारित मार्गदर्शक सूचना mantralay entry guidelines 

वाचा १. शासन निर्णय, गृह विभाग क्र. पीईएस-०४२१/प्र.क्र.१०८/विशा-४, दि.२४.१२.२०२१

शासन परिपत्रक-

मंत्रालयात अभ्यागतांना व वाहनांना प्रवेश देण्यासंदर्भात शासनास प्राप्त झालेल्या सूचना/निवेदने, त्याचप्रमाणे संदर्भीय शासन निर्णयानुसार काम करताना आलेले अनुभव तसेच मंत्रालय सुरक्षा प्रकल्प फेज-२ प्रकल्पांतर्गत Visitor Management System प्रणाली विचारात घेवून सुधारीत मार्गदर्शक सूचना विहित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्याअनुषंगाने मंत्रालयात अभ्यागतांना व वाहनांना प्रवेश देण्याबाबत पुढीलप्रमाणे सुधारीत मार्गदर्शक सूचना विहित करण्यात येत आहेत.

अ) DigiPravesh ऑनलाईन अॅप आधारे मंत्रालय प्रवेश :-

मंत्रालयात क्षेत्रिय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी, अभ्यागत यांना यापुढे कोणत्याही कामाकरीता मंत्रालयात प्रवेश हवा असल्यास त्यांना DigiPravesh या ऑनलाईन अॅप आधारित प्रणालीव्दारे मंत्रालयात प्रवेश अनुज्ञेय असणार आहे. DigiPravesh अॅपव्दारे आपली नोंदणी केल्यानंतर मिळणाऱ्या क्यू आर कोड आधारे मंत्रालयाबाहेर असलेल्या खिडकीवर मंत्रालय प्रवेशाकरीता RFID Card वितरीत करण्यात येईल. सदर RFID Card आधारे सुरक्षाविषयक तपासणी करुन मंत्रालयात प्रवेश देण्यात येईल. अभ्यागत यांना RFID प्रवेश ओळखपत्र (Entry Card) परिधान करणे व मंत्रालयातून बाहेर जाताना ते सुरक्षा कर्मचाऱ्यांकडे जमा करणे बंधनकारक राहील.

ब) क्षेत्रिय अधिकारी/कर्मचारी यांना मंत्रालयात प्रवेश देण्याबाबतः-

क्षेत्रिय कार्यालयीतील अधिकारी व कर्मचारी यांना कामानिमित्त मंत्रालयात प्रवेश हवा असल्यास त्यांनी DigiPravesh या ऑनलाईन अॅप आधारित नोंदणी करणे आवश्यक असेल. त्यांना ज्या विभागामध्ये कामानिमित्त भेट द्यावयाची आहे त्या विभागाच्या संमतीने मंत्रालयात सकाळी १०.०० वा नंतर प्रवेश अनुज्ञेय असेल.

क) क्षेत्रिय अधिकारी/कर्मचारी यांना बैठकीकरीता मंत्रालयात प्रवेश देण्याबाबतः-

क्षेत्रिय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांना बैठकीकरीता मंत्रालयात आमंत्रित केले असल्यास, सदर निमंत्रित अधिकारी/कर्मचारी यांचा मंत्रालय प्रवेश व वेळ निश्चित करण्यासाठी संबंधित विभागातील कक्ष अधिकारी किंवा त्यावरील अधिकारी यांच्या स्वाक्षरीचे बैठक पत्र/सूचना बैठकीच्या किमान एक दिवस अगोदर सायंकाळी ०५.३० वा. पर्यंत Digi Pravesh या ऑनलाईन अॅपवर Upload करणे बंधनकारक असेल. बैठकीकरीता संबंधित विभागांनी कमाल दोन पेक्षा जास्त अधिकारी/कर्मचारी उपस्थित राहणार नाहीत याची दक्षता

घ्यावी. बैठकीकरीता मंत्रालयामध्ये संबंधित अधिकारी/कर्मचारी यांची प्रत्यक्ष उपस्थिती आवश्यक नसल्यास त्यांना दृकश्राव्य (VC) माध्यमाव्दारे आमंत्रित करण्यात यावे व अनावश्यक गर्दी टाळण्यात यावी.

ङ) क्षेत्रिय अधिकारी/कर्मचारी/वकील/अभ्यांगत यांना सुनावणी करीता मंत्रालयात प्रवेश देण्याबाबतः-

क्षेत्रिय अधिकारी/कर्मचारी/वकील/अभ्यांगत यांना सुनावणी करीता मंत्रालयात आमंत्रित केले असल्यास, सदर निमंत्रित क्षेत्रिय अधिकारी/कर्मचारी/वकील/अभ्यांगत यांचा मंत्रालय प्रवेश व वेळ निश्चित करण्यासाठी संबंधित विभागातील कक्ष अधिकारी किंवा त्यावरील अधिकारी यांचे स्वाक्षरीचे सुनावणी पत्र सुनावणीच्या किमान एक दिवस अगोदर सायंकाळी ०५.३० वा. पर्यंत DigiPravesh या ऑनलाईन अॅपवर Upload करणे बंधनकारक असेल. सदर पत्रामध्ये संबंधित क्षेत्रिय अधिकारी/कर्मचारी/वकील/अभ्यांगत यांचे नांव, आधार क्रमांक व मोबाईल नंबर देणे आवश्यक असेल. सुनावणीकरीता संबंधित विभागांनी कमाल दोन पेक्षा जास्त क्षेत्रिय अधिकारी/कर्मचारी/वकील/अभ्यांगत उपस्थित राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी. सुनावणीकरीता मंत्रालयामध्ये संबंधित क्षेत्रिय अधिकारी/कर्मचारी/वकील/अभ्यांगत यांची प्रत्यक्ष उपस्थिती आवश्यक नसल्यास त्यांना दृकश्राव्य (VC) माध्यमाव्दारे आमंत्रित करण्यात यावे व अनावश्यक गर्दी टाळण्यात यावी.

तसेच वकील व त्यांचेसोबतचे न्यायालयीन लिपिक यांना विविध विभागात अपिल व इतर न्यायालयीन कामकाजाच्या अनुषंगाने वैध दस्तावैज तपासून सकाळी १०.०० वा. नंतर प्रवेश अनुज्ञेय असेल.

ई) सर्व साधारण अभ्यागतांना मंत्रालयात प्रवेश देण्याबाबतः-

मंत्रालयात येणाऱ्या इतर सर्व साधारण अभ्यागतांना मंत्रालयात दुपारी ०२.०० वा. नंतर प्रवेश देण्यात येईल. अशा प्रवेशासाठी त्यांना DigiPravesh या ऑनलाईन अॅप आधारित प्रणालीव्दारे मंत्रालय प्रवेशपास घेऊन मंत्रालयात प्रवेश मिळविता येईल. अभ्यागतांनी मंत्रालयात प्रवेश मिळविण्यासाठी आधार कार्ड, वाहन परवाना, पॅन कार्ड इ. शासन मान्य ओळखपत्र सादर करणे आवश्यक असेल. अशिक्षित तसेच स्मार्टफोन नसलेल्या अभ्यांगताकरीता गार्डन गेट येथे Digi Pravesh या ऑनलाईन अॅप आधारित प्रणालीव्दारे मंत्रालय प्रवेश नोंदणी करीता तसेच मदतीकरीता एक खिडकी उपलब्ध असेल. तसेच, सर्वसाधारण अभ्यागतांना प्रवेशासाठी वेळोवेळी लागू केलेल्या नियमांचे अटी व शर्तीचे अनुपालन करणे बंधनकारक असेल.

च) ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग अभ्यागत यांना मंत्रालयात प्रवेश देण्याबाबतः-

ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग अभ्यागत यांना रांगेत उभे राहण्यामुळे होणारा त्रास विचारात घेता त्यांना दु. १२.०० वा. प्रवेश देण्यात यावा, तर दुपारी १२.०० नंतर ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग अभ्यागत यांचेसाठी स्वतंत्र रांगेची व्यवस्था राहील. तसेच, ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग अभ्यागत यांनी तत्संबंधीचे वैध प्रमाणपत्र सोबत ठेवणे आवश्यक राहील.

छ) वाहनांना मंत्रालयात प्रवेश देण्याबाबतः-

मंत्रालयात प्रवेश दिलेल्या वाहनांनी त्यांना देण्यात आलेला पार्किंग/ड्रॉपिंग पास वाहनाच्या पुढच्या काचेवर सहज दिसून येईल अशा पध्दतीने चिकटविणे बंधनकारक असेल त्याशिवाय, त्या वाहनांना प्रवेश देण्यात येणार नाही. मंत्रालय प्रवेशाकरीता पार्किंग/ड्रॉपिंग पास देण्यात आलेल्या वाहनांत सदर पासधारक व्यक्तीशिवाय इतर कोणत्याही व्यक्तीस मंत्रालय प्रवेश करण्यास प्रतिबंध असेल. या सुचनांचा भंग झाल्यास ती गंभीर बाब मानण्यात येईल.

ज) सर्वसामान्यांना मंत्रालयात प्रवेश देण्याबाबत सूचना :-

अभ्यांगत यांना मंत्रालयाच्या ज्या विभागात कामानिमित्त प्रवेश आवश्यक आहे. केवळ त्यांना दिलेल्या वेळेत आणि अनुज्ञेय असलेल्या मजल्यावरच प्रवेश करावा. अनधिकृत मजल्यावर प्रवेश केल्यास अभ्यांगत कारवाईस पात्र राहतील. तसेच अभ्यांगतांनी संबंधित विभागातील आपले काम पूर्ण झाल्यावर विहित वेळेत मंत्रालयातून बाहेर पडावे व अधिक वेळेपर्यंत मंत्रालयात थांबून अनावश्यक गर्दी करू नये.

झ) मंत्रालय प्रवेशासाठी लागू करण्यात आलेले हे सर्व नियम मंत्रालयासमोरील नवीन प्रशासन भवन इमारतीमध्ये प्रवेशासाठी देखील लागू राहतील.

या मार्गदर्शक सूचना या शासन परिपत्रकाच्या दिनांकापासून लागू होतील.

सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२५०३२४१८३००३०१२९ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने

Join Now