२५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेंतर्गत प्रतिक्षा यादी टप्पा क्र.०१ मधील प्रवेश पात्र बालकांचे प्रवेश सुरु करणेबाबत right to education addmission start
सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकातील २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेंतर्गत प्रतिक्षा यादी टप्पा क्र. ०१ मधील प्रवेश पात्र बालकांचे प्रवेश सुरु करणेबाबत.
संदर्भ :- संचालनालयाचे पत्र क्र. आरटीई २५ टक्के/२०२५/८०१/१०८, दि. १३-०१-२०२५
उपरोक्त विषयी आपणास कळविण्यात येते की, बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार, दरवर्षीप्रमाणे २५ टक्के प्रवेश प्रक्रिया संपूर्ण राज्यात ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत आहे. त्यानुसार सन २०२५-२६ शैक्षणिक वर्षासाठी आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेंतर्गत ऑनलाईन सोडत (लॉटरी) दि. १०-०२-२०२५ रोजी काढण्यात आली असून निवड यादीतील बालकांचे प्रवेश निश्चित करण्याची मुदत दि. १०-०३-२०२५ पर्यंत होती.
सर्व जिल्हयांतील निवड यादीतील प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली आहे. सर्व जिल्हयांमध्ये उद्या मंगळवार, दि. १८-०३-२०२५ रोजी प्रतिक्षा यादी टप्पा क्र. ०१ मधील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुरु होत आहे याची सर्व जिल्हयांनी नोंद घ्यावी. तसेच दि. १८-०३-२०२५ पासून प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या पालकांना SMS पाठविण्यात येणार आहेत. प्रतिक्षा यादीतील बालकांचे पालकांना शाळेच्या रिक्त जागेनुसारच SMS पाठविण्यात येणार आहेत.
पालकांनी केवळ SMS वर अवलंबून न राहता RTE PORTAL वरील अर्जाची स्थिती या टॅबवर आपल्या बालकाचा अर्ज क्रमांक टाकून अर्जाची स्थिती पहावी. वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे अवलोकन करावे.
प्रतिक्षा यादीतील बालकाच्या पालकांनी त्यांच्या अॅलोटमेंट लेटरची प्रिंट काढावी. सदर अॅलोटमेंट लेटर व आवश्यक कागदपत्रे घेऊन विहित मुदतीत नजिकच्या पडताळणी केंद्रावर जाऊन पडताळणी समितीकडून दि. १८-०३-२०२५ ते २४-०३-२०२५ या कालावधीमध्ये कागदपत्रांची तपासणी करुन आपल्या बालकांचा ऑनलाईन प्रवेश निश्चित करावा. प्रवेश निश्चित झाल्याची पावती घेऊन शाळेमध्ये जावे आणि प्रवेश घ्यावा.
तसेच पालकांना व शाळा / शैक्षणिक संस्था यांना प्रतिक्षा यादीतील प्रवेश उद्या दि. १८-०३-२०२५ रोजी सुरु होत असल्याची नोंद घेण्याबाबत व वरील सूचनांना आपल्यास्तरावरुन मोफत प्रसिध्दी देण्यात यावी.