‘आरटीई’ चे पोर्टल जानेवारीपासून सुरू राज्यभरातील खासगी शाळाची नोंदणी पूर्ण होण्याच्या मार्गावर rte addmission start from January
मुंबई, ता. २८ शिक्षण हक्क अधिकार कायद्यानुसार ‘आरटीई’ प्रवेशाच्या २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी खासगी शाळांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण होण्याच्या मार्गावर आली आहे. मंगळवारपर्यंत (ता.३१) ही नोंदणी केली जाणार आहे. त्यानंतर १ जानेवारीपासून शालेय शिक्षण विभागाकडून ‘आरटीई’ प्रवेशाचे पोर्टल सुरू होणार आहे. यासंदर्भातील वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाणार आहे.
‘आरटीई’ प्रवेशासंदर्भात यंदाच्या शैक्षणिक वर्षात शालेय शिक्षण विभागाकडून काही दिवस अगोदरच नियोजन करण्यात आले असल्याने पुढील एक ते दीड महिन्यामध्ये प्रवेश पूर्ण केले जाण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी न्यायालयीन प्रक्रिया आणि विविध कारणांमुळे ‘आरटीई’ची प्रवेश प्रक्रिया लांबली. त्यामुळे शाळा नोंदणीपासून अनेक प्रकारच्या त्रुटी समोर आल्या होत्या. यंदा त्यामध्ये कोणतीही कमतरता राहू नये आणि अधिकाधिक खासगी शाळांची नोंदणी व्हावी, त्यासोबतच उर्वरित शाळांचा अधिकाधिक समावेश केला जावा, यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून १८ डिसेंबरपासून शाळांच्या नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत नव्वद हजारांहून अधिक शाळांची नोंदणी पूर्ण झाली असून यंदाही सुमारे सव्वा लाखाहून अधिक शाळांचा यामध्ये समावेश होण्याची शक्यता आहे.
राज्यात खासगी शाळांमध्ये पूर्व प्राथमिक आणि पहिलीच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू आहे. ‘आरटीई’ प्रवेशाची कोणतीही जागा या शाळांकडून भरली जाऊ नये, यासाठीच्या सूचना दिल्या आहेत. जोपर्यंत शालेय शिक्षण विभागाकडून ‘आरटीई’चे प्रवेश सुरू केले जाणार नाहीत तोपर्यंत त्यांच्याकडील राखीव जागा या प्रवेशासाठी खुल्या ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे. एखादी संस्था अथवा शाळांनी या आदेशाचे पालन केले नाही तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे.
जाचक अटी कमी करणार ?
■ ‘आरटीई’ प्रवेश सुलभ व्हावेत यासाठी संकेतस्थळावर माहिती उपलब्ध केली जाणार आहे. मुलांना कोणत्या शाळेत प्रवेश घेता येईल, त्यासाठी लागणारी कागदपत्रे, त्या शाळांची माहिती तसेच शाळांचे अंतर याची माहितीदेखील पालकांना संकेतस्थळावर मिळणार आहे. या प्रवेशासाठी आतापर्यंत असलेल्या काही जाचक अटी कमी करण्याचा विचारही शालेय शिक्षण विभागाकडून केला जात आहे.