सुंदर मार्मिक बोधकथा sundar moral stories 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सुंदर मार्मिक बोधकथा sundar moral stories 

एका गावातला एक तरुण अतिशय साधा, भोळा आणि प्रेमळ होता. कोणी कसेही वागो, पण त्याने आपला चांगुलपणा कधीच सोडला नव्हता. परंतु एक वेळ अशी येते, जेव्हा संयमाचा बांध फुटतो आणि आपल्याला स्वत:च्या चांगुलपणाचाही राग येऊ लागतो. मन व्यवहारी होते, स्वार्थी होते, परंतु हा बदलही आपल्याला सहन होत नाही. कारण चांगले वागणे हा आपला स्थायी भाव असतो.
त्या तरुणाच्या बाबतीतही तेच झाले. तो अतिशय अस्वस्थ होता. त्याने गावातल्या एका साधूबाबांकडे जाऊन शंकेचे समाधान विचारले. साधू महाराजांनी त्याला आपल्या सदऱ्याच्या खिशातून एक अंगठी दिली आणि म्हणाले, `पुढचा आठवडाभर ही अंगठी तू तुझ्याजवळ घे आणि त्याची किंमत किती मिळू शकेल याचा शोध घे. फक्त काही केल्या ही अंगठी विकू नकोस!’
प्रश्न आणि उत्तर यांचा परस्पर काहीही संबंध नसताना साधूमहाराजांनी दिलेले काम पाहून तरुण निराश झाला. परंतु त्याने दिलेले काम पूर्ण करायचे ठरवले. तो एका व्यापाऱ्याजवळ गेला. त्याला अंगठी दाखवली. तो त्या अंगठीचे हजार रुपये देईन म्हणाला. तरुण मुलगा दुसऱ्या व्यापाऱ्याकडे गेला, त्या व्यापाऱ्याने दहा हजाराची बोली लावली. तिथून तो एका सोनाराकडे गेला. सोनाराने अंगठी नीट पाहिली आणि म्हणाला एक लाख रुपए देतो, पण ही अंगठी मलाच विक! तरुण मुलगा गोंधळला. तिथून तो एका जवाहिराकडे गेला. त्याने मोल ठरवायला वेळ लावला पण त्याने जे उत्तर दिले ते ऐकून तरुण मुलगा चक्रावला. जवाहीर म्हणाला, माझी सगळी संपत्ती देऊ केली तरी या अंगठीचे मोल मला फेडता येणार नाही, हे ऐकून गोंधळलेला तरुण साधूमहाराजांकडे परत आला. त्याने सगळी हकीकत सांगितली. त्यावर साधूमहाराज म्हणाले, बाळा, अंगठीची किंमत ज्याने त्याने आपल्या कुवतीनुसार सांगितली. जो खरा रत्नपारखी होता त्याने ही अंगठी अमुल्य आहे असे सांगितले. याचाच अर्थ आपले गुण ओळखणारा आणि त्या गुणांची कदर करणारासुद्धा तेवढाच गुणवान असावा लागतो. जे लोक तुझी किंमत करत नाहीत, ते त्यांच्या कुवतीप्रमाणे तुझ्याशी व्यवहार करतात. मात्र जे तुला ओळखतात ते तुझी किंमत, योग्यता समजतात. तू ही अंगठी आहेस हे आधी ओळख आणि तुझी किंमत सामान्य व्यापाऱ्याने ओळखावी अशी अपेक्षा करू नकोस. तू तुझा चांगुलपणा कायम ठेव. कोणीतरी रत्नपारखी आयुष्यात नक्कीच भेटेल.
एक गोष्ट सदैव लक्षात ठेवा कि…
रिकाम्या भांड्यावर झाकण आणि चुकीच्या विचारांची पाठराखण काही उपयोगाची नसते…तुम्ही चांगले आहात की वाईट हा विचार कधीच करू नका, कारण लोकांना गरज पडली की तुम्ही चांगले आणि गरज संपली की वाईट. आपण पायाने चालतो तेव्हा तो प्रवास होतो हृदयाने चालतो तेव्हा ती यात्रा होते आणि भान हरपून चालतो तेव्हा ती वारी होते…माणूस एक अजब रसायन आहे, आवडला तर त्याचे दोष दिसत नाहीत…आणि नाही आवडला तर त्याचे चांगले गुण पण दिसत नाहीत…
नेहमी मन निर्मळ ठेवा व प्रामाणिक राहा…कुणी कितीही फसवले तरी एक लक्षात ठेवा प्रामाणिक माणसाच्या पाठीशी नेहमी सत्य उभ असतं…!
“माझं चुकलं?…
हे शब्द समोरच्याचा काळजाला स्पर्श करतात परंतु हे शब्द म्हणण्यासाठी फार सामर्थ्य लागतं”…हे सामर्थ्य आपल्या सर्वांमध्ये वृद्धींगत होवो हीच सदिच्छा…