पोषण आहाराच्या मसाला पाकिटात पाल निघाली; काय कारवाई केली? Mid day meal in lizard
लोकमत न्यूज नेटवर्क अकोला : जिल्ह्यातील तळेगाव डवला येथे शालेय पोषण आहाराच्या मसाला पाकिटात पाल निघाल्याची घटना गुरुवारी समोर आली असून, या गंभीर प्रकारानंतर शिक्षण विभागाने काय कारवाई केली, अशी विचारणा शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत करण्यात आली. या मुद्यावरुन सदस्यांनी आक्रमक भूमिका घेत शिक्षणाधिकाऱ्यांना धारेवर धरल्याने सभा चांगलीच गाजली.
तळेगाव डवला येथील शाळेत शालेय पोषण आहाराच्या लसूण व कांदा मसाल्याच्या एका पाकिटात पाल निघाल्याची गंभीर घटना घडल्यानंतर शिक्षण विभागाने काय कारवाई केली, असा प्रश्न सदस्य राम गव्हाणकर यांनी सभेत उपस्थित केला. तसेच सदस्य स्फूर्ती गावंडे यांनीही अशीच विचारणा केली. या प्रकरणात संबंधित पुरवठादारास कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असून, संबंधित पुरवठादारास काळ्या यादीत टाकण्याचा आणि पोषण आहार पुरवठ्याचा करारनामा संपुष्टात आणण्यासाठी शिक्षण संचालकांकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी रतनसिंग पवार यांनी दिली. त्यावेळी विद्यार्थ्यांना पोषण आहाराच्या
वितरणासाठी संबंधित मसला पाकिटांचे वितरण बंद करण्यासंदर्भात तातडीने काय कारवाई केली, अशी विचारणा करीत, सदस्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना धारेवर धरले. या मुद्यावरुन सभेत काहीवेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
जिल्हा परिषद अध्यक्ष संगीता अढाऊ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी, उपाध्यक्ष सुनील फाटकर, सभापती आम्रपाली खंडारे, माया नाइक, रिजवाना परवीन, योगीता रोकडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके यांच्यासह सदस्य आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री, आमदारांना का बोलावले नाही?जिल्हा परिषद सेस फंडातून उभारण्यात आलेल्या संविधान सभागृहाचे लोकार्पण करण्यात आले असून, या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत पालकमंत्री, जिल्ह्यातील आमदार व जिल्हाधिकाऱ्यांचे नाव का नाही आणि लोकार्पण कार्यक्रमाला त्यांना का बोलावण्यात आले नाही, असा प्रश्न सदस्य डॉ. प्रशांत अढाऊ यांनी सभेत उपस्थित केला
विद्यार्थ्यांना बाधा झाल्यावर कारवाई करणार काय?
पोषण आहाराच्या मसाला पाकिटात पाल निघाल्याच्या गंभीर घटनेनंतर २४ तास उलटून गेल्यानंतर शिक्षण विभागाने यासंदर्भात कोणतीही कारवाई केली नसल्याने, विद्यार्थ्यांना बाधा झाल्यावर कारवाई करणार काय, असा सवाल सदस्य संजय अढाऊ यांनी सभेत उपस्थित केला. तसेच विद्यार्थ्यांच्या पोषण आहारासाठी संबंधित मसाला पाकिटे वितरित करू नका, तातडीने वितरण थांबविण्याची मागणी सदस्य पुष्पा इंगळे यांनी केली. या गंभीर प्रकरणात तातडीने संबंधित यंत्रणेला निर्देश देऊन कारवाई करण्याची मागणी सदस्य गोपाल दातकर यांनी सभेत केली.
साडेतीन कोटींच्या सभागृहाचे लोकार्पण; पत्रिकेत सदस्यांची नावे का नाही?
१
जिल्हा परिषद सेस फंडातून साडेतीन कोटींच्या निधीतून उभारण्यात आलेल्या सभागृहाचे लोकार्पण करण्यात आले; मात्र सभागृहात कॉडलेस माइक अजूनही लागले नसून, सुविधा कधी करणार, अशी विचारणा उद्धवसेनेचे जिल्हा परिषद गटनेता गोपाल दातकर यांनी सभेत केली.
सभागृहाच्या उभारणीसाठी जिल्हा परिषदेच्या सर्व सदस्यांचे • योगदान असताना सभागृह लोकार्पणाच्या निमंत्रण पत्रिकेत जिल्हा परिषदेच्या सर्व सदस्यांची नावे का नाही, असा प्रश्न सदस्य डॉ. प्रशांत अढाऊ, गजानन पुडकर, संजय अडाऊ आदी सदस्यांनी केली. पत्रिकेत जिल्हा परिषदेच्या सर्व सदस्यांची नावे असायला पाहिजे होती, अशी भूमिका सत्तापक्षाच्या सदस्य पुष्पा इंगळे, राम गव्हाणकर यांनी सभेत मांडली. सभागृहात साऊंड सिस्टीमचे काम लवकरच करण्यात येणार असून, सर्व सदस्यांची नावे सभागृहाजवळ लावण्यात आलेल्या फलकावर नोंदविण्यात आल्याची माहिती सत्तापक्षाचे गटनेता ज्ञानेश्वर सुलताने यांनी सभागृहात दिली.