“त्या” ७०० शिक्षकांना काम बंदचे आदेश 700 teachers stop work’s order
रत्नागिरीं न्यूज:- शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीमुळे रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील शाळांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त झाली होती. त्यामुळे जिल्हा परिषदेने ७०० शिक्षकाची मानधन तत्त्वावर तात्पुरत्या स्वरुपात नेमणूक केली होती. येत्या शैक्षणिक वर्षामध्ये या शिक्षकांना कमी करण्यात येणार असल्याने त्याना में २०२४ पासून त्यांना काम बंद करण्याचे आदेश जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहेत.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या २,६०० प्राथमिक शाळा असून शिक्षकांची ६,९०० पदे मंजूर आहेत. त्यापैकी १,३०० पदे रिक्त असतानाही मागील शैक्षणिक वर्षामध्ये ७०७ शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या केल्या होत्या. त्या शिक्षकांना एका दिवसात कार्यमुक्त करण्यात आले होते. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षकांची सुमारे २ हजार पदे रिक्त झाली होती.
मुलांचे शैक्षणिक नुकसान होणार असल्याने पालकांमध्ये कमालीचा संताप व्यक्त करण्यात येत होता. त्यामुळे तात्पुरत्या स्वरुपात मानधन तत्त्वावर ७०० शिक्षकांची नियुक्ती करून रिक्त पदांची कसर भरून काढण्यात आली होती.
दरम्यान, शिक्षकांची रिक्त पदांसाठी १०६८ पदे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरती करण्यात येत आहे. या भरतीमध्ये १४ शिक्षक अनुपस्थित राहिले होते. त्यामुळे आता १ हजार १४ शिक्षकांची भरती जिल्हा परिषदेत करण्यात येत आहे. या भरतीची प्रक्रिया लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे स्थगित आहे.
७ मेनंतर ही भरती प्रक्रिया सुरू होऊन त्या शिक्षकांना शाळांवर नेमणूक देण्यात येणार आहे. त्यामुळे ९ हजार रुपये मानधनावर नियुक्त शिक्षकांना नवीन शैक्षणिक वर्षात मुदत वाढवून देण्यात आलेली नाही. त्या तात्पुरत्या स्वरुपात नेमणुका करण्यात आलेल्या शिक्षकांचे काम हे शैक्षणिक वर्ष पूर्ण झाल्याने मेपासून बंद करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील नऊही पंचायत समित्यांच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले आहेत. याप्रमाणे त्या ७०० शिक्षकांना काम थांबवण्याचे आदेश गटशिक्षणाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
……………………………………