राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्राथमिक/माध्यमिक मुलींना स्वसंरक्षण प्रशिक्षण self defence training
विषयः समग्र शिक्षातंर्गत सन २०२३-२४ मध्ये राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत राज्यातील सर्व शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या २२,२०१ शाळांमधील (२०,४२१ उच्च प्राथमिक व १,७८० माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा) मुलींना स्वसंरक्षण प्रशिक्षण, जीवन कौशल्य देण्यासाठी मार्गदर्शक सूचना.
संदर्भ : १) निविदा क्र. GEM/२०२३/B/३६९३९३९, दि. ३०/०८/२०२३.
२) GeM Sanction Order No.५११६८७७९४०९८०९५, दि.२८/१२/२०२३.
बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ ची दिनांक ०१ एप्रिल, २०१० पासून राज्यात अंमलबजावणी करण्यात येत आहे. राज्यातील प्रत्येक ६ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांस सुरक्षित वातावरणात गुणवत्तापूर्ण शिक्षण प्राप्त करण्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, २०२० च्या तब्बल ८६ शिफारसी समग्र शिक्षा (परिशिष्ट-1) मध्ये
समाविष्ट केल्या आहेत. यामध्ये मुलींच्या स्वसंरक्षण प्रशिक्षणावर भर देण्यात आला आहे. त्यानुसार मुलींच्या शारीरिक आणि मानसिक शक्तीला चालना देण्यासाठी आणि शाळेत किंवा त्यानंतर कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी त्यांना सुसज्ज करण्यासाठी, शाळेत मुलींना स्वसंरक्षण प्रशिक्षण देणे आवश्यक आहे.
स्व-संरक्षण प्रशिक्षणाद्वारे, मुलींना मानसिक, बौद्धिक आणि शारीरिकदृष्ट्या पुरेसे सक्षम बनवण्याची गरज आहे. जेणेकरून त्या संकटाच्या आणि असुरक्षिततेच्या वेळी स्वतःचे संरक्षण करू शकतील. हिंसाचार करणाऱ्यांना संदेश देण्यासाठी मुली सामना करण्यासाठी तयार आहेत आणि या संदर्भात मुलींना सर्व पैलूंमध्ये सक्षम करणे, कोणत्याही प्रकारच्या कठीण परिस्थितीचा सामना करण्यासाठी मुलींना स्वयं-कौशल्यांत पारंगत करणे त्यांच्यामध्ये आत्मविश्वास व जागरूकता विकसित करणे ही काळाची गरज निर्माण झाली आहे.
विद्यार्थिनींना गुन्हेगारीविरुद्ध लढण्यासाठी सक्षम करणे हे या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण व तंत्र यांचे प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. अनुभवी मार्शल आर्ट्स प्रशिक्षकांकडून मुलींनी सुरक्षित वातावरणात व्यावहारिक संरक्षण तंत्र शिकणे आवश्यक आहे. विद्यार्थिनींसाठी हा उपयुक्त संरक्षण तंत्र कार्यक्रम आत्मनिर्भर बनवून तणाव कमी
करण्यासाठी त्यांनी स्व-संरक्षण कौशल्ये शिकण्याचा उत्तम मार्ग असेल. इयत्ता सहावी ते बारावीत शिकणाऱ्या मुलींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
सन २०२३-२४ मध्ये समग्र शिक्षा अंतर्गत राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण (प्राथमिक आणि माध्यमिक) अंतर्गत २०,४२१ उच्च प्राथमिक शाळा आणि १,७८० माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये मुलींसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण देण्यासाठी तरतूद मंजूर आहे.
केंद्र शासनाने मंजूर केलेल्या निधीच्या अधिन राहून या कार्यालयाकडून विहित प्रक्रियेद्वारे M/s. Skill Tree Consulting Pvt. Ltd. या सेवादारकाची निवड करण्यात आली असून दि. 8/9 / 2028 ते दि. ३१/०३/२०२४ या कालावधीसाठीचा त्यांचे सोबत आवश्यक तो करार करण्यात आला असून उक्त सेवादारकास सेवा पुरवठा आदेश निर्गमित करण्यात आला असून सदर सेवादारकामार्फत आपल्या जिल्ह्यातील सोबत जोडलेल्या यादीमध्ये नमूद शाळांकरिता मुलींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यामध्ये प्रशिक्षकांमार्फत मार्शल आर्टच्या किमान एक शैली/प्रकारात विशेष/कुशल (तायक्वांदो, वुशू, कराटे, ज्युडो, वेस्टर्न बॉक्सिंग, किकबॉक्सिंग, कुस्ती, कॉम्बॅट साम्बो, मुय थाई, जिउ-जित्सू (किंवा जुजुत्सु), क्राव मागा, MMA (मिश्र मार्शल आर्ट्स), आयकिडो, जी कुने दो आणि भारतीय मार्शल आर्ट्सचा कोणताही प्रकार) वर नमूद केल्याप्रमाणे स्व-संरक्षण विशिष्ट कौशल्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण झाल्यावर विद्यार्थिनींना सेवादाराकडून प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल. याबाबतचा Scope of Work पुढीलप्रमाणे-
सबब, वरील सेवादारकाकडून नियुक्त करण्यात येणाऱ्या प्रशिक्षकांमार्फत मुलींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्यासाठी आपणांस पुढील प्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत.
१. शालेय अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून भविष्यातील सरावासाठी प्रत्येक शाळेतील शिक्षकांना या कौशल्यांचे उद्बोधन करण्यात येईल. शाळेतील नियमित शिक्षक हे शालेय स्तरावरील या उपक्रमासाठी मुख्याध्यापकाच्या मार्गदर्शनाखाली समन्वयक असतील आणि प्रशिक्षणार्थी म्हणून प्रशिक्षणात सहभागी होतील.
२. सेवा पुरवठादारामार्फत ऑनलाइन प्रणाली, एमआयएस टूल आणि नॉलेज रिपॉझिटरी प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यात येईल. स्वसंरक्षण प्रशिक्षण, जीवन कौशल्ये, मुलांच्या संरक्षणाबाबत समस्या, आत्म-जागरूकता, स्व-संरक्षण आणि स्वयं-विकास यावर लक्ष केंद्रित करून जीवन कौशल्ये प्रशिक्षण इयत्ता ६ वी ते इयत्ता १२ वी च्या (२०,४२१ उच्च प्राथमिक आणि १,७८० माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा) शाळांमधील मुलींना राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा कार्यक्रमातंर्गत स्वसंरक्षण प्रशिक्षण, जीवन कौशल्य याबाबतचे प्रशिक्षण सेवादाराकडून देण्यात येणार आहे. प्रशिक्षणाबाबत आपल्या शाळेचा नियमित प्रगती अहवाल सेवादारामार्फत उपलब्ध करून देण्यात आलेल्या Tool / Tracker मध्ये अद्ययावत करावा.
३. प्रशिक्षणाची वेळ व प्रशिक्षणासाठी सुरक्षित ठिकाणाची माहिती प्रशिक्षकांना उपलब्ध करून देण्यात यावी. सदरचे प्रशिक्षण ताणविरहीत वातावरणात घेण्यात यावेत. तसेच शाळेतील विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेबाबत योग्य ती दक्षता घेण्यात यावी.
४. मुख्याध्यापकांनी वरील प्रशिक्षण विहीत वेळेत पूर्ण होईल यासाठी आवश्यक योग्य ते सहकार्य सेवादारकामार्फत नियुक्त प्रशिक्षकांना करण्यात यावे. यामध्ये विलंब होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.
५. प्रशिक्षणादरम्यान संबंधित शाळेची महिला शिक्षिका / महिला कर्मचारी उपस्थित राहतील याची दक्षता घेण्यात यावी.
६. सेवादारकाकडून वरील प्रशिक्षणाचे व्हिडीओ शुटींग / फोटोग्राफ्स घेण्यात येणार आहेत. याबाबत आवश्यक ते सहकार्य सेवादारकास करण्यात यावे.
७. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर मुख्याध्यापक / शिक्षकांनी त्यावर स्वतःचे नांव व मोबाईल क्रमांक तसेच दिनांकित स्वाक्षरी व शिक्क्यासह प्रमाणित करून त्याची पोहोच सेवादारकास देण्यात यावी.
उपरोक्त प्रमाणे नमूद केलेल्या आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थिनींचे प्रशिक्षण दिनांक ३१/०३/२०२४ पर्यंत पूर्ण करून घेण्यात यावे.
सोबत पुरवठा आदेशाची प्रत व शाळांची यादी संलग्न करण्यात आली आहे. याकामी वर नमूद सदर संस्थेस संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांकडून / शिक्षकांकडून सहकार्य करण्यासाठी आपल्या स्तरावरून निर्देशित करण्यात यावे.
उपरोक्त प्रमाणे नमूद Scope of Work नुसार संबंधित संस्थेकडून योग्य पद्धतीने अंमलबजावणी होत असल्याची खातरजमा आपल्या स्तरावरून जिल्ह्यातील संबंधित पर्यवेक्षीय यंत्रणेमार्फत संबंधित शाळेस भेट देऊन योग्य पद्धतीने होत असल्याची खातरजमा करावी. याबाबत वस्तुनिष्ठ अहवाल वेळोवेळी या कार्यालयास सादर करण्यात यावा.