राज्य शासनाच्या मोफत गणवेश योजनेंतर्गत इयत्ता १ ली ते ८ वी सर्व विद्यार्थ्याना दोन गणवेश प्रदान करणेबाबत school uniform 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राज्य शासनाच्या मोफत गणवेश योजनेंतर्गत इयत्ता १ ली ते ८ वी सर्व विद्यार्थ्याना दोन गणवेश प्रदान करणेबाबत school uniform

विषय: सन २०२४-२०२५ या शैक्षणिक वर्षात समग्र शिक्षा व राज्य शासनाच्या मोफत गणवेश योजनेंतर्गत शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमध्ये इयत्ता १ ली ते ८ वी मध्ये शिक्षण घेणारे सर्व विद्यार्थी व विद्यार्थीनींना प्रत्येकी दोन गणवेश प्रदान करण्याबाबत मार्गदर्शक

सूचना.

संदर्भ :शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई यांचा

१. शासन निर्णय क्र. एसएसए-१२२०/प्र.क्र.१५४/एस.डी.३, दि.०८.०६.२०२३.

२. शासन निर्णय क्र. एसएसए-१२२०/प्र.क्र.१५४/एस.डी.३, दि.१८.१०.२०२३.

३. शासन शुद्धीपत्रक क्र. एसएसए-२०२३/प्र.क्र.१५०/एस.डी.३, दि.२४.०१.२०२४.

संदर्भाधीन शासन निर्णयांद्वारे समग्र शिक्षा व राज्य शासनाच्या मोफत गणवेश योजनेमधून शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमधील इयत्ता १ली ते ८वी मध्ये शिक्षण घेत असलेले सर्व विद्यार्थी व विद्यार्थीनींना प्रत्येकी २ गणवेश उपलब्ध करून देण्याबाबत ईनिविदा प्रक्रिया महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेमार्फत राबविण्यात आली असून ईनिविदा प्रक्रियेअंती मे. पदमचंद मिलापचंद जैन यांना पुरवठा आदेश दि.०४.०३.२०२४ रोजी देण्यात आला आहे. तसेच या गणवेशाची शिलाई महिला आर्थिक विकास महामंडळांतर्गत महिला बचत गटांमार्फत करण्यात येणार असून याबाबत देखील कार्यारंभ आदेश दि.१३.०३.२०२४ रोजी निर्गमित करण्यात आला आहे. सुलभ संदर्भासाठी दोन्ही आदेशांच्या प्रती सोबत जोडल्या आहेत.

या उपक्रमाच्या अंमलबजावणीची थोडक्यात रूपरेषा पुढीलप्रमाणे स्पष्ट करण्यात येत आहे,

१. ईनिविदा प्रक्रियेअंती नियुक्त पुरवठादारास राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील व प्रत्येक BRC/CRC मध्ये शाळानिहाय व इयत्ता निहाय शिक्षण घेत असलेले विद्यार्थी व विद्यार्थीनींची संख्या उपलब्ध करून देण्यात आली असून त्यानुसार BRC/CRC अथवा महिला आर्थिक विकास महामंडळांतर्गत लोक संचालित साधन केंद्र येथे गणवेशाच्या कापडाचा पुरवठा करण्यात येणार आहे.

२. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या मागणीनुसार प्रतिविद्यार्थी/विद्यार्थीनी, प्रतिगणवेश लागणाऱ्या कापडाचे मापाप्रमाणे मायक्रो कटींग करून त्यानुसार कापडाचा पुरवठा BRC/CRC/लोक संचालित साधन केंद्र येथे करण्यात येणार आहे.

३. लोक संचालित साधन केंद्रांतर्गत स्थानिक स्तरावरील महिला बचत गटाद्वारे या गणवेशाच्या कापडाची शिलाई करण्यात येणार असून शिलाई अंती लोक संचालित साधन केंद्राद्वारे तयार गणवेशांचा पुरवठा संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांकडे करण्यात येणार आहे.

४. तयार गणवेशाचा पुरवठा झाल्यानंतर शिलाईबाबत काही त्रुटी, तक्रारी प्राप्त झाल्यास सदरहू त्रुटींचे निराकरण व शिलाईतील दोष महिला बचत गटामार्फत स्थानिक पातळीवरूनच दुरूस्त करण्यात येणार आहेत.

या प्रकल्पाच्या अंमलबजावणीबाबत माहिती, तसेच प्रकल्पाच्या प्रभावी अंमलबजावणीकरिता पुढीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना देण्यात येत आहेत,

१) कापड पुरवठादाराकडून कापडाची निर्मिती झाल्यांनतर या कापडाच्या दर्जाची तपासणी टेक्सटाईल कमिटी, मुंबई या केंद्र शासनाच्या वस्त्रोद्योग मंत्रालयांतर्गत येणाऱ्या संस्थेमार्फत करण्यात येणार असून कापडाच्या दर्जाच्या तपासणीअंती सुयोग्य दर्जाच्या कापडाचे मायक्रो कटींग पुरवठादाराच्या प्रोसेसिंग युनिटमध्ये करण्यात येणार आहे. या सर्व प्रक्रियेदरम्यान टेक्सटाईल कमिटीचे निरीक्षक कापडाचा दर्जा

राखण्याबाबत आवश्यक ती सर्व खबरदारी घेणार असून प्रत्येक गणवेशासाठी लागणाऱ्या कापडाचे मायक्रो कटींग झाल्यानंतर टेक्सटाईल कमिटीचे निरीक्षक यांच्या समक्ष त्या गणवेशाचे कापड सुयोग्य पॅकेटमध्ये भरून त्यावर टेक्सटाईल कमिटीचे सील लावण्यात येणार आहे. या प्रक्रियेद्वारे BRC/CRC/लोक संचालित साधन केंद्र येथे पुरवठा होणाऱ्या गणवेशाच्या कापडाच्या दर्जाबाबत खात्री करण्यात येणार आहे. BRC/CRC/लोक संचालित साधन केंद्र येथे प्राप्त होणाऱ्या कापडाचे बॉक्स हे इयत्तानिहाय स्वतंत्रपणे एका गणवेशातील शर्ट अथवा पँट अथवा फ्रॉक अथवा सलवार कमीज, असे स्वतंत्रपणे पॅकिंग करून उपलब्ध होणार आहेत. म्हणजेच प्राप्त होणाऱ्या एका बॉक्समध्ये त्या बॉक्सच्या बाह्य Cover वर याबाबत सुस्पष्टपणे लिहिलेले असेल. उदा. इयत्ता १ लीच्या मुलांच्या शर्टचे कापड (नियमित गणवेश) सदरहू गठ्ठा स्काऊट गाईड या गणवेशाकरिता असल्यास “स्काऊट गाईड गणवेश”, असे स्पष्टपणे लिहिण्यात येईल. तसेच या बॉक्समध्ये बाह्यपृष्ठावर त्या बॉक्समध्ये ज्या इयत्तेतील विद्यार्थी अथवा विद्यार्थीनींसाठी गणवेशाच्या कापडाचे तुकडे भरण्यात आलेले आहेत, त्या गणवेशाच्या कापडाच्या एकूण तुकड्यांची संख्या, प्रत्येक गणवेशाच्या कापडाच्या तुकड्याला सुस्पष्ट क्रमांक, प्रत्येक तुकड्याची लांबी, रुंदी इ. तपशील उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्रत्येक बॉक्समध्ये १०० गणवेशाच्या कापडांचे तुकडे पुरविण्यात येणार असून त्याचाही तपशील बॉक्सच्या बाह्य भागावर स्वतंत्रपणे नमूद करण्यात येईल.

२) प्रत्येक BRC/CRC/लोक संचालित साधन केंद्रावर त्या त्या गटातील इयत्ता १ली ते ८ वीच्या विद्यार्थी व विद्यार्थीनींकरिता, असे एकूण ६४ स्वतंत्र बॉक्स उपलब्ध होणार आहेत. म्हणजेच इयत्तानिहाय प्रत्येक विद्यार्थ्याकरिता ४ बॉक्स आणि प्रत्येक विद्यार्थीनींकरिता ४ बॉक्स देण्यात येणार आहेत. इयत्ता ८ वीच्या विद्यार्थीनींच्या बॉक्समध्ये ओढणीकरिता लागणारे कापड देखील पुरविण्यात येणार आहे.

४) गणवेशाचे बॉक्स प्राप्त झाल्यानंतर प्रत्येक बॉक्सवर टेक्सटाईल कमिटीचे सील आहे किंवा कसे, सदरहू सील सुस्थितीत आहे किंवा कसे, सीलवरील मजकुरात कोणतीही खाडाखोड झालेली नाही, तसेच सर्व बॉक्स बाहेरून सुस्थितीत आहेत, याची काळजीपूर्वक तपासणी करून त्यानंतरच सदरहू बॉक्सचा स्वीकार करण्यात यावा.

५) कापडाचा स्वीकार करतेवेळी वर नमूद केल्याप्रमाणे बॉक्समध्ये काही माहिती उपलब्ध नसल्यास अथवा सील सुस्थितीत नसल्यास अथवा बॉक्सवर वर नमूद केल्याप्रमाणे माहिती उपलब्ध नसल्यास सदरहू बॉक्सचा स्वीकार करण्यात येऊ नये व याबाबत योग्य नोंद घेऊन सदरचा बॉक्स पुरवठादारास अथवा त्याच्या प्रतिनिधीस परत करण्यात यावा.

६) BRC/CRC/लोक संचालित साधन केंद्रावर कापडाचा पुरवठा झाल्यानंतर सदहू कापडाचे/बॉक्सचे वाटप व्यवस्थापक, लोक संचालित साधन केंद्र यांच्या सूचनेनुसार संबंधित महिला बचत गटाच्या सदस्यांना करून त्याबाबत सुयोग्य पद्धतीने पोहोच पावती घेण्यात यावी.

७) एखाद्या प्रसंगी, एखाद्या केंद्रावर कापडाचा पुरवठा सायंकाळी उशिरा सदरहू मालाचा पुरवठा स्विकारून सदरहू माल सुयोग्य ठिकाणी, योग्य

करून घेण्याची जबाबदारी संबंधित केंद्रप्रमुखाची राहील. तथापि, अशा परिस्थितीत संबंधित केंद्रप्रमुखांनी कापड पुरवठादारास/त्यांच्या प्रतिनिधीस कापडाच्या पुरवठ्याबाबत पोहोच देणे योग्य होणार नाही. कापड पुरवठादार/त्यांच्या प्रतिनिधीस सदरहू केंद्रावर दुसऱ्या दिवशी सकाळी नियोजित वेळेत उपस्थित राहण्याच्या सूचना गट शिक्षणाधिकारी यांचे स्तरावरून देण्यात याव्यात व या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे कापडाचा पुरवठा झाल्याबाबत खात्री करून त्यानंतरच पुरवठ्याची पोच देण्यात यावी.

८) पुरवठा झालेले गणवेशाचे कापड सुस्थितीत ठेवण्यासाठी पुरवठयाची जागा सुरक्षित असावी, गणवेशाचे कापड चोरीला जाणार नाही, अवेळी पडणाऱ्या पावसामुळे खराब होणार नाही अथवा उंदीर, घुशीपासून कुरतडले जाणार नाही, अशा जागेची निवड करावी.

९) संबंधित गटाचे गट शिक्षणाधिकारी यांच्याकडून लाभार्थीच्या प्रमाणात इयत्तानिहाय व गणवेश प्रकारानुसार गणवेशाच्या कापड पुरवठ्याची खात्री झाल्यावर पुरवठादारास स्वाक्षरी देण्यात यावी. गट शिक्षणाधिकारी यांनी कापड पुरवठा संदर्भातील अहवाल शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांना पुरवठा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सादर करावा.

१०) महिला बचत गटाच्या किती कारागिरांना, शिलाईसाठी किती गणवेश संचाचे कापड दिले आहे, याची माहिती महिला आर्थिक विकास महामंडळ यांचे प्रतिनिधी, लोक संचलित साधन केंद्राचे (CSRMC) प्रतिनिधी/व्यवस्थापक, संबंधित गटाचे गट शिक्षणाधिकारी यांनी ठेवणे आवश्यक राहील.

११) शिलाईकरिता गणवेशाच्या कापडांचे संच प्राप्त झाल्यानंतर महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत कार्यरत महिला बचत गटाच्या शिलाई कारागिरांनी त्यांना देण्यात आलेल्या गणवेशाचे साहित्य ज्या शाळेतील विद्यार्थी / विद्यार्थीनींकरिता शिलाई करावयाचे आहे, त्या शाळेस भेट देवून संबंधित इयत्तेतील विद्यार्थी / विद्यार्थीनींची मापे Standard मापांनुसार आहेत किंवा कसे याची तपासणी करुन त्यानुसार शिलाईचे काम

करावे, जेणेकरुन तयार गणवेश शाळांना पुरवठा केल्यानंतर मापाबाबत तक्रारी येऊ नयेत.

१२) महिला बचत गटाच्या संबंधित शिलाई कारागीर यांच्याकडून गणवेश शिलाई पूर्ण झाल्यानंतर जमा करीत असलेले गणवेश व त्यांना शिलाईसाठी देण्यात आलेले गणवेश संच संख्या बरोबर आहेत किंवा नाहीत, याबाबत संबंधित गटाचे गट शिक्षणाधिकारी व लोक संचलित साधन केंद्राचे व्यवस्थापक यांनी संयुक्तपणे खात्री करावी.

school uniform 
school uniform

१३) शिलाई पूर्ण झालेले गणवेश संकलित करुन शाळांना पुरविण्यात यावेत. इयत्तानिहाय नियमित गणवेश संच, तसेच स्काऊट गाईड विषयास अनुरुप गणवेश संच, असे दोन गणवेश प्राप्त झाल्याबाबत संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांकडून लेखी स्वरुपातील अहवाल घेऊन सदर अहवाल दोन दिवसांत शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांना सादर करण्यात यावा.

सोबत : कार्यारंभ आदेश (२)

शासन निर्णय pdf download

Leave a Comment