शिक्षकांच्या आंतरजिल्हा झाल्या बदल्या पण; नव्या भरतीचा आदेश ठरतोय कार्यमुक्तीला अडथळा online teacher transfer
सोलापूर : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीचा सहावा टप्पा नुकताच ऑनलाइन राबविण्यात आला. या टप्प्यात जिल्हा परिषदेच्या २ हजार ३२९ प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या झाल्या. ग्रामविकास विभागाच्या ४ जानेवारीच्या पत्रानुसार आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना नवीन भरतीनंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्तरावरून कार्यमुक्त करण्याबाबत आदेशित केले आहे. त्यामुळे आंतरजिल्हा बदल्या झालेल्या शिक्षकांची मोठी कोंडी झाली आहे.
Online teacher transfer ग्रामविकास विभागाच्या ४ जानेवारीच्या आदेशात किती तारखेपर्यंत कार्यमुक्त करावे याबाबत स्पष्टता नाही. त्यामुळे कार्यमुक्तीसाठी जिल्हा परिषद स्तरावर पुन्हा भ्रष्टाचार वाव मिळणार असल्याचे शिक्षकांचे मत आहे. आंतरजिल्हा बदली झालेल्या सर्व शिक्षकांना नवीन भरती पूर्वी कार्यमुक्त केले तर, सर्व जिल्ह्यातील रिक्त पदांची – संख्या भरती पोर्टलला दिसेल व भरती प्रक्रिया व्यवस्थितपणे राबविता येईल, त्यामुळे आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांबरोबर नवीन भरती होणाऱ्या शिक्षकांना समान न्याय मिळेल. तसेच नवीन भरती पूर्वी अंतिम तारीख देऊन एखाद्या तारखेपर्यंत आंतरजिल्हा बदली झालेल्या सर्व शिक्षकांना कार्यमुक्त करून रिक्त पदे तत्काळ कळविण्याचा आदेश जिल्हा परिषदेला दिले तर बदल्यांमधील भ्रष्टाचार कमी असे शिक्षकांनी सांगितले.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना दिले निवेदन
शासनाने ऑनलाइन बदल्या करून संपविलेला भ्रष्टाचार कार्यमुक्तीमध्ये होईल. ग्रामविकास विभागाचा ४ जानेवारीचा मुख्य कार्यकारी अधिकारी स्तरावरून आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करण्याचा दिलेला आदेश त्वरित रद्द करून एक अंतिम तारीख देऊन त्या तारखेपूर्वी सर्वांना नवीन भरती पूर्वी कार्यमुक्त करण्यास आदेशित करावे असे निवेदन शिक्षक सहकार संघटनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले आहे.
शासनाने २३१९ प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या करून शिक्षकांना नव वर्षांचे गिफ्ट दिले. आता ४ जानेवारीचे ग्रामविकास विभागाचे पत्र रद्द करून आंतरजिल्हा बदली झालेल्या सर्व शिक्षकांना नवीन भरती पूर्वी एका दिनांक देऊन त्या दिनांकापर्यंत कार्यमुक्त करावे, अन्यथा आंतरजिल्हा बदली झालेले शिक्षक मुंबईत आंदोलन करतील. -नीलेश देशमुख, राज्य सरचिटणीस, शिक्षक सहकार संघटना