जो आम्हाला देईल सरसकट जुनी पेन्शन, त्यालाच करू मतदान old penshan scheme
वाशिम : जो पक्ष कर्मचाऱ्यांना सरसकट जुनी पेन्शन लागू करेल, त्याच पक्षाला आम्ही मतदान करू, या निर्धारावर महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनाठाम आहे. जुनी पेन्शनच्या मागणीसाठी संघटनेच्यावतीने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बुधवार १३ मार्चला कारंजा येथे संघटनेच्यावतीने निवेदन देण्यात आले.
निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांची होणारी हेळसांड थांबविण्यासाठी जुनी पेन्शन आवश्यक असल्याची कर्मचाऱ्यांची धारणा असून, जुनी पेन्शनची नितांत गरज संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आली. त्यामुळेच सरसकट जुनी पेन्शन लागू करण्यात यावी यासाठी महाराष्ट्रातील सर्व कर्मचारी व्होट फॉर ओपीएस हे अभियान राबविणार आहेत, असेही संघटनेकडून स्पष्ट करण्यात आले. जो पक्ष संपूर्ण भारतात जुनी पेन्शन योजना लागू करेल, तर कोट्यवधी कर्मचारी, त्यांचे नातेवाईक, मित्रपरिवार, कुटुंबासह आपल्या पक्षाच्या उमेदवारांना आयुष्यभर मतदान करतील अशी
शपथ कर्मचाऱ्यांनी घेतली असून, १ नोव्हेंबर २००५ नंतरच्या सर्व कर्मचाऱ्यांना सरसकट १९८२-८४ ची जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या निवेदनातून जुनी पेन्शन संघटनेच्या वाशिम जिल्ह्यातील
पदाधिकाऱ्यांनी केली आहे. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष नीलेश कानडे, विभागीय कार्याध्यक्ष गोपाल लोखंडे, गजानन राठोड, प्रदीप खाडे, संतोष गुल्हाने, नीलेश मोरे, प्रशांत गावंडे, रामेश्वर भोडणे, विवेक इंगोले उपस्थित होते.
जुनी पेन्शन हा आमच्या जीवनाच्या अखेरच्या टप्प्यातील महत्त्वाचा आधार असणार आहे. त्यामुळे जुनी पेन्शनच्या मागणीसाठी आमचा लढा असून, जो पक्ष जुनी पेन्शन लागू करेल, त्याच पक्षाला मतदान करण्याच्या निर्णयावर आम्ही ठाम आहोत. – रवी महल्ले,
जिल्हाध्यक्ष, महसूल कर्मचारी संघटना, वाशिम
सरसकट जुनी पेन्शन हीच आमची मुख्य आणि एकमेव मागणी आहे. ही योजना लागू करणाऱ्या पक्षालाच आमचे नातेवाईक, मित्रपरिवार, कुटुंबासह आपल्या पक्षाच्या उमेदवारांना आयुष्यभर मतदान करतील अशी शपथ कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.
-गजानन राठोड, राज्य सोशल मीडिया सदस्य महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन संघटना