मराठी,इंग्रजी आणि अभिव्यक्तीची भाषा मराठी राजभाषा दिन विशेष ब्लॉग marathi state language day
Marathi State language day 27 February मराठीबाबत जेव्हा केव्हा चर्चा होते, तेव्हा दुसऱ्याच क्षणी गाडी इंग्रजी माध्यमाच्या शाळांवर येऊन घसरते. एकीकडे मराठी माध्यमाच्या शाळा कमी होत आहेत, तर इंग्रजी शाळा वाढताहेत. इंग्रजी शाळा अशाच वाढत गेल्या तर मराठीचे भवितव्य काय, असा प्रश्नही चर्चिला जातो. मराठीला फारसे भवितव्य नाही, यावर अनेकांचे, विशेषतः शहरी उच्चभ्रू वर्गाचे एकमतही होते. या वर्गाने आणि त्यांच्या दिशेनं वाटचाल करीत असलेल्या मध्यमवर्गीयांनी, कनिष्ठ मध्यमवर्गीयांनी इंग्रजी माध्यमावर केव्हाच पसंतीची मोहोर उमटवली आहे. मुलांना मराठी माध्यमाच्या शाळेत घालावं की इंग्रजी… हा प्रश्न त्यांनी केव्हाच निकाली काढला आहे इंग्रजीच्या बाजूने कौल देऊन! हा कौल घेताना त्यांनी मराठीच्या नव्हे, तर आपल्या मुला-मुलींच्या भवितव्याचा विचार केला आहे आणि त्यात काहीही गैर नाही. त्यामुळेच इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे वास्तव मान्य करून मराठीचा उत्कर्ष कसा होईल याचा विचार करण्याची गरज आहे.
इंग्रजी माध्यमाचे प्रस्थ वाढण्यामागे अनेक कारणे आहेत आणि त्यातील बहुतेक कारणे रास्तही आहेत. आपल्याकडे उर्ध्वगामी दिशेने सरकणारा घटक मोठ्या संख्येने असल्याने इंग्रजी माध्यमाचे आकर्षण आणखी वाढण्याची शक्यता आहे. इंग्रजी शाळांच्या विरोधात असंख्य मुद्दे मांडण्यासारखे असले, तरी त्यांचा विस्तार होण्याचीच चिन्हे अधिक आहेत. हे कटू सत्य स्वीकारून या आव्हानाचा सामना कसा करायचा याचा विचार करायला हवा. इंग्रजीतून लिहिता-बोलता येणे म्हणजेच अभिव्यक्त होणे महत्त्वाचे आहे, याची वाढती जाणीव या साऱ्याच्या मुळाशी आहे. इंग्रजीतून उत्तम प्रकारे अभिव्यक्त होण्यासाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळेतच जायला हवे असे नाही; मराठी वा अन्य भारतीय भाषांच्या माध्यमातून शिक्षण घेतलं तरी ते शक्य होऊ शकते, याची खात्री आजच्या पालकांना पटवून देता आली पाहिजे. मराठीतून शिक्षण घेऊन उत्तम इंग्रजी बोलू-लिहू शकणाऱ्यांची उदाहरणे देऊन ही खात्री पटविता येणार नाही. त्यासाठी शाळांमध्ये सुविधा निर्माण करावी लागणार आहे.
आपल्यापैकी बहुतेकांना मराठी वा आपली मातृभाषा वा परिसर भाषा शाळेत जायच्या आधीच अवगत झाली आहे. याचा अर्थ असा, की भाषा शिक्षणासाठी, त्या भाषेचे वातावरण मिळणे महत्त्वाचे असते. इंग्रजी माध्यमात माध्यमाच्या बंधनामुळे – ते काही प्रमाणात का होईना मिळते. मराठी शाळांमध्ये फक्त इंग्रजीच्या तासांपुरतेच हे वातावरण मिळते. तेही सर्व शाळेत असतेच असे नाही. अनेक ठिकाणी तर मराठीतूनच इंग्रजी शिकविण्याची, तिला व्याकरणाच्या जंजाळात अडकविण्याची पद्धत रुजली आहे. वास्तविक प्रसारमाध्यमांमुळे, तंत्रज्ञानामुळे इंग्रजीशी असलेला आपला संबंध कितीतरी पटीने वाढला आहे. इंग्रजी सहजपणे कानावर पडते आहे. या तंत्रज्ञानाचा लाभ घेऊन ती शिकवली गेल्यास ती अवगत होण्यास मदत होऊ शकेल. यासाठी शिक्षक प्रशिक्षणपासून संवादात्मक कार्यक्रमांबाबत अनेक जाणकार तज्ज्ञांनी उपक्रम राबविले आहेत. ते सर्वदूर पोहोचविण्यासाठी व्यापक प्रयत्न होण्याची गरज आहे.
इंग्रजी माध्यमाच्या शाळांची लाट थोपवायची असेल, तर मराठी माध्यमाच्या शाळांत इंग्रजीला पूरक असे वातावरण देण्याशिवाय पर्याय नाही. या शाळांतील मुले-मुलीही उत्तम इंग्रजी बोलू शकतात, असा विश्वास तेव्हाच निर्माण होईल. मुलांच्या कलाकलाने, आनंददायी वातावरणात अध्यापन करण्याची रचनावादी शिक्षण पद्धत इंग्रजीसाठी उपयुक्त ठरू शकते. प्रमाण मराठी भाषा, शुद्धलेखन आदींबाबतचा आग्रह प्राथमिक स्तरावर धरला जाऊ नये, असा विचार रुजतो आहे; इंग्रजीच्या बाबतीतही प्राथमिक स्तरावर असाच दृष्टिकोन घेऊन व्याकरणाचा अट्टहास सोडून द्यायला हवा. हळूहळू पुढच्या टप्प्यांमध्ये त्याचा समावेश करता येईल. मात्र, कोणत्या ना कोणत्या वळणावर प्रमाण भाषा आणि इंग्रजी दोन्हीही स्वीकाराव्या लागणार आहेत, हे विसरून चालणार नाही. त्यामुळे त्याबाबत वितंडवाद घातला जाऊ नये.
शिक्षणाचे माध्यम आणि अभिव्यक्ती यांचा अतिशय निकटचा संबंध आहे. आपली मातृभाषा वा परिसर भाषा कोणतीही असो; शाळेचे माध्यम कोणते यावर बहुतेकांच्या अभिव्यक्तीचे माध्यम ठरते, असा एक समज आहे. आणखी सोपे करून सांगायचे म्हणजे – आपण स्वतःशी बोलताना कोणत्या भाषेतून बोलतो? आपल्या या ‘स्व-संवादा’चे आणि शाळेचे माध्यम बहुतेकदा एकच असते, असे वाटत होते. मराठी शाळांत शिक्षण घेतलेले मुले-मुली अर्थातच मराठीतूनच ‘स्व-संवाद’ साधत असतात. इंग्रजी माध्यमाच्या बाबतीत असे होते का? इंग्रजीतून शिक्षण घेतलेल्या
मुला-मुलींचा ‘स्व-संवाद’ इंग्रजीतून होतो की मराठीतून? याबाबत एक उत्सुकता म्हणून इंग्रजी शाळांत शिक्षण घेत असलेल्या काही मुला-मुलींना मी हा प्रश्न विचारला. त्यांपैकी बहुतेकांनी ‘मराठी’ हेच उत्तर दिले होते. इंग्रजी हे उत्तरही आले; परंतु प्रमाण कमी होते. संख्याशास्त्राच्या नियमानुसार मी ही पाहणी केली नसल्याने थेट निष्कर्ष काढणार नाही. शाळेचे माध्यम इंग्रजी झाले, तरी अभिव्यक्तीचे माध्यम मराठी असणे, हे मराठीसाठी, मराठी समाजासाठी चांगलीच गोष्ट आहे. मात्र, मराठी माध्यमातील मुलांचे ‘मराठी’तून अभिव्यक्त होणे आणि इंग्रजी माध्यमातील मुलांचे ‘मराठी’तून अभिव्यक्त होणे यांत फरक आहे.
मराठी माध्यमातील विद्यार्थी, मराठी साहित्याचे, संतवाङ्गयाचे, पंतकवींचे, आधुनिक लेखनाचे धडे गिरवत लहानाचा मोठा झाला आहे. त्याला पूरक असे वातावरणही शाळेत मिळत गेले आहे. त्यामुळे त्यांचे मराठीतून अभिव्यक्त होणे अधिक प्रभावी असते. इंग्रजी माध्यमातील सर्वच मराठी मुलांना ‘मराठी’ हा विषय नाही. ज्यांनी हा विषयही शाळेत शिकलेला नाही, ते मराठीतून कसे व्यक्त होत असतील? स्वाभाविकच त्यांच्या अभिव्यक्तीला मर्यादा येतात. मराठीतील शब्दसंपत्ती, वाक्प्रचार, म्हणी, कथा-कादंबऱ्यांचे आणि कवितांचे संदर्भ यांबाबत ते कमी पडत असणार. त्यामुळं मराठीतून नेमकी मांडणी करण्यात ते कमी पडत असणार.
आता ही मुले इंग्रजीतून का अभिव्यक्त होत नाहीत? कदाचित पुरेसे पूरक वातावरण त्यांना मिळाले नसणार. शाळेत इंग्रजी, तर घरी आणि दारी मराठी वा अन्य परिसर भाषा असा प्रकार. त्यामुळे इंग्रजीतून व्यक्त होण्यालाही त्यांना मर्यादा येत असतील. सर्वांच्या बाबतीत हे होते असे नाही; परंतु इंग्रजी शिक्षण घेतलेल्या आजच्या तरुणांतील काहींशी संवाद साधताना, त्यांनी केलेले लेखन पाहताना हे जाणवते. त्यामुळे, शाळेचे आणि अभिव्यक्तीचे माध्यम यांबाबतचे समीकरण चुकते आहे. इंग्रजी माध्यमातील मुले-मुली इंग्रजीतून बोलण्याइतपत तयार होऊ शकतात; परंतु त्या भाषेतून सक्षमपणे अभिव्यक्त होतीलच, असे नाही. हीच गोष्ट मराठीच्या बाबतीतही आहे काय? मराठीच्या शिक्षकांच्या आणि प्राध्यापकांच्या मते, मराठीतून शिक्षण घेतलेली मुलं-मुलीही मराठीतून जोरकसपणे अभिव्यक्त होतातच असे नाही. तुम्ही अलंकारिक शब्दप्रयोग करीत अभिव्यक्त व्हावे, असे नाही; परंतु आपल्याला जे म्हणायचे आहे, ते अगदी सुस्पष्टपणे मांडणे आवश्यक आहे. त्यात कमी पडणे म्हणजे अभिव्यक्तीत कमी पडणे होय. याचाच अर्थ असा, की शिक्षणाच्या
माध्यमांबाबत केवळ वितंडवाद सुरू आहे. भाषा शिक्षणाकडे मात्र जवळ जवळ दुर्लक्षच झाले आहे. मराठी असो वा इंग्रजी. त्या अवगत होण्यासाठी निरीक्षण, श्रवण, चिंतन, मनन, संवाद, अक्षर ओळख, वाचन आणि लेखन… अशा टप्प्यांतून भाषेचे शिक्षण देण्याकडेही दुर्लक्ष होतं आहे. आधी भाषा ऐकवली जावी, त्यानंतर एकेक शब्द करीत संवाद साधला जावा, त्याद्वारे शब्दसंपत्ती वाढवत नेली जावी आणि मग लेखनाला सुरुवात केली जावी.
उत्तम वाचकामध्ये एक संभाव्य लेखक दडलेला असतो, असे म्हणतात. अभिव्यक्तीसाठी ही बाबही लागू आहे. आपल्या अभिव्यक्तीचे माध्यम कोणतेही असो, ते अधिक जोरकसपणे होण्यासाठी त्या माध्यमातून वाचन अधिक होण्याची गरज असते वाचनाची गोडी वाढविणे म्हणतच आवश्यक आहे भाषाशिक्षणात
गरज असते. वाचनाची गोडी वाढविणे म्हणूनच आवश्यक आहे. भाषाशिक्षणात वाचनाचे महत्त्व अर्थातच आहे. भाषा शिक्षणाचा अशा पद्धतीने शास्त्रीय दृष्टिकोनातून विचार करणारी मंडळी आपल्याकडे आहेत. त्यांचे मार्गदर्शन घेऊन मराठी आणि इंग्रजी भाषांच्या शिक्षणावर भर दिल्यास मुले मराठी आणि इंग्रजी या दोहोंतही तितक्याच चांगल्या प्रकारे अभिव्यक्त होऊ शकतील आणि इंग्रजी माध्यमातील शिक्षण दोन भाषांतून अभिव्यक्त होण्याला पूरक नसल्याने मराठी माध्यमाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलू शकेल. तसे झाल्यास पालक मराठी शाळांकडे परत वळू शकतील.