अतिरिक्त पूरक मार्गदर्शन आध्ययन निष्पत्ती : प्रशिक्षणार्थी learning outcomes
• अतिरिक्त पूरक मार्गदर्शन ही संकल्पना स्पष्ट सांगतात.
• अतिरिक्त पूरक मार्गदर्शन म्हणजे काय ते सांगतात.
• संपादणूक पातळी साध्य करू न शकण्याची विदयार्थिनिहाय कारणे सांगतात.
• अतिरिक्त पूरक मार्गदर्शन करतात.
• अतिरिक्त पूरक मार्गदर्शनाच्या नोंदी ठेवतात.
प्रस्तावना :
बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील कलम २४ (१) मध्ये शिक्षकांची कर्तव्ये स्पष्ट करण्यात आली आहेत. कायदयाप्रमाणे दर आठवड्याला घड्याळी ४५ तास काम करणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यातील ३० तास प्रत्यक्ष वर्ग अध्ययन-अध्यापन आणि उर्वरित १५ तास अतिरिक्त पूरक मार्गदर्शन, अवांतर वाचन, पूर्वतयारी इत्यादींसाठी अपेक्षित आहेत. कायद्यातील तरतुदी लक्षात घेता अध्ययन प्रक्रिया समृद्ध होण्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना अतिरिक्त पूरक मार्गदर्शन करावे अशी अपेक्षा आहे. तसेच राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० मध्येही विदयार्थ्यांचे अध्ययन समृद्ध होण्यासाठी शिक्षकांनी अध्ययन प्रक्रियेदरम्यान निरंतर मार्गदर्शकाच्या भूमिकेत असावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. विदयार्थ्यांना शिकत असताना येणाऱ्या अडचणी, समस्या आणि त्रुटी यांच्या कारणांचा शोध घ्यावा. या समस्यांचे निराकरण करण्यासाठी विद्यार्थिनिहाय कृती आराखडा तयार करावा. तसेच मानसिक आणि भावनिक हाताळणी करून उपाययोजना करावी. विदयार्थ्यांना अपेक्षित अध्ययन निष्पत्ती साध्य करता येतील या सर्व बाबी अतिरिक्त पूरक मार्गदर्शन या संकल्पनेत समाविष्ट आहेत.
अतिरिक्त पूरक मार्गदर्शन म्हणजे काय?
अतिरिक्त पूरक मार्गदर्शन म्हणजे विदयार्थ्यांच्या अध्ययनातील उणिवांचे निराकरण करणे होय. तसेच विदयार्थी ज्या अध्ययन स्तरावर आहेत त्यापेक्षा उच्च स्तरावर जाण्यासाठी समृद्ध करणारे मार्गदर्शन म्हणजे ‘अतिरिक्त पूरक मार्गदर्शन.’ यात विदयार्थ्यांची अध्ययन निष्पत्तीनिहाय संपादणूक प्राप्त करण्यासाठी अध्ययनातील खंड, उणिवा, त्रुटी, पोकळी (gaps) भरून काढून शिकण्यातील अडथळे दूर करणे अपेक्षित आहे.
अतिरिक्त पूरक मार्गदर्शनाचे नियोजन करताना शिक्षकांनी पुढील बाबी जाणून घेणे आवश्यक आहे :
१) अध्ययन मुद्दा/घटक, उपघटक
२) अध्ययन निष्पत्ती
३) अध्ययन निष्पत्तीनिहाय विद्यार्थी प्रतिसाद
४) अध्ययन निष्पत्ती अपेक्षित संपादणूक पातळीपर्यंत साध्य न करू शकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या
५) अपेक्षित संपादणूक पातळी साध्य करू न शकण्याची विदयार्थीनिहाय कारणे
६) अध्ययन करताना दिसून आलेले; परंतु दूर न झालेले अडथळे व त्यांचे स्वरूप (अध्ययन स्तर)
७) विशेष गरजा असणाऱ्या विदयार्थ्यांचा अध्ययन स्तर व त्या आधारित कृती कार्यक्रम
संपादणूक पातळीचा स्तर उंचावण्यासाठीच्या उपाययोजना :
• अध्ययन स्तर निर्धारक चाचणी घेऊन अध्ययन निष्पत्तीनिहाय स्तर निश्चिती करताना विद्यार्थिनिहाय प्रतिसादाची नोंद घेताना अध्ययन विषयक गरजा निश्चित कराव्यात.
• प्रत्यक्ष अध्ययन-अध्यापन करताना निरीक्षण करून, विद्यार्थ्यांना प्रश्न विचारून, नैदानिक चाचणी घेऊन चुकांमागील कारणांचा शोध घ्यावा.
• विदयार्थी शिकत असताना, कृती करत असताना, सादरीकरण करत असताना, विदयार्थ्यांचे लेखी काम तपासल्यानंतर, चुकांची/त्रुटी/अडथळ्यांची यादी करावी.
अतिरिक्त पूरक मार्गदर्शनाचे स्वरूप :
. विदयाथ्यर्थ्यांच्या अध्ययनात पडलेला खंड भरून काढण्यासाठी मार्गदर्शन.
विद्यार्थ्यांच्या अध्ययनातील कच्च्या दुव्यांचा शोध.
• न समजलेल्या भागासाठी सुसंगत अध्ययन अनुभवांची रचना.
आवश्यकतेनुसार पुनराध्यापन व सराव.
अध्ययन निष्पत्तींशी सुसंगत अध्ययन अनुभवांची पुनर्रचना.
विदयार्थ्यांच्या पूर्वानुभवांशी नवीन अध्ययन घटकांचा संबंध जोडणे, भाषा सोपी करणे, कृतींवर भर देणे, आशय टप्प्याटप्प्याने पूर्ण करणे, विद्यार्थ्यांचा सहभाग घेत पुढे जाणे यांसारखे उपाय.
अतिरिक्त पूरक मार्गदर्शन केव्हा करावे?
अध्ययन प्रक्रिया चालू असताना तसेच अध्ययन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अतिरिक्त पूरक मार्गदर्शन करावे. अध्ययनाच्या प्रत्येक टप्यावर विदयार्थी वेगवेगळ्या स्वरूपाच्या वर्गकार्यात सहभागी होत असतो. जसे – कृती, उपक्रम, प्रात्यक्षिक कार्य, प्रश्नोत्तरे, शंकानिरसन तसेच जिज्ञासापूर्तीसाठी प्रश्न विचारणे, प्रकटवाचन, स्वाध्याय, भाषण-संभाषण (कथन, वर्णन, निवेदन, सादरीकरण इत्यादी), गटकार्य, गटचर्चा, इत्यादी प्रसंगी. विद्यार्थी वर्गकार्यात प्रात्यक्षिक, तोंडी व लेखी स्वरूपात प्रतिसाद देत असतो. अशा प्रतिसादाच्या निरीक्षणातून आढळून आलेल्या चुका, त्रुटी, उणिवा यांची दखल घेऊन त्याच वेळी त्यांची दुरुस्ती करावी म्हणजे त्यांची पुनरावृत्ती होणार नाही. विद्यार्थ्यांच्या शिकण्याचा प्रवाह सतत चालू राहण्यास मदत होईल. प्रसंगानुरूप केलेली दुरुस्ती विदयार्थ्यांच्या कायमस्वरूपी लक्षात राहते. पुढे पुढे अतिरिक्त पूरक मार्गदर्शनाचे प्रमाण कमी कमी होत जाते. याबरोबरच एखादया विद्यार्थ्याने स्वतःचा वेगळा विचार प्रतिसादातून दाखवला असेल, तर त्याला खत-पाणी घालण्यासाठी आणि तो अधिकाधिक फुलवण्यासाठीही अतिरिक्त पूरक मार्गदर्शन करावे.
अतिरिक्त पूरक मार्गदर्शन हे फक्त अध्ययनात मागे पडलेल्या विद्यार्थ्यांपुरते मर्यादित नसून प्रत्येक विदद्यार्थ्यास तो ज्या टप्प्यावर आहे त्याच्या पुढे नेण्यासाठीही आवश्यक असते.
विदयार्थ्यांच्या अध्ययनाचे टप्पे पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या संपादणुकीची खात्री करण्यासाठी स्वाध्याय, छोट्या कालावधीची लेखी चाचणी, संकलित मूल्यमापन यांसारखी साधनतंत्रे वापरली जातात. शिक्षक अल्प प्रमाणात तोंडी आणि प्रात्यक्षिक स्वरूपात व जास्त प्रमाणात लेखी स्वरूपात विद्यार्थ्यांचे प्रतिसाद पाहत असतात. या प्रतिसादांचे विश्लेषण करून चुकांचे प्रमाण आणि त्यामागील कारणे लक्षात घेऊन अतिरिक्त पूरक मार्गदर्शन करावे. यासाठी नियोजनात काही वेळ राखून ठेवावा. गरजेनुरूप अधिकचा वेळ देऊनही विदयार्थ्यांना अतिरिक्त पूरक मार्गदर्शन करावे. अतिरिक्त पूरक मार्गदर्शनासाठी कोणाकोणाची मदत घेता येईल? बैठक व्यवस्था कशी असावी? वर्गातील हुशार मुले, बहुवर्ग पद्धती असल्यास वरच्या वर्गातील मुले,
पालक, गावातील शिक्षणप्रेमी यांची मदत घेता येईल. यासाठी कोणत्या कालावधीत कोणत्या कृती कराव्यात. याविषयी त्यांना नीट कल्पना दयावी. शक्यतो शिक्षकांनी स्वतः जास्तीत जास्त अतिरिक्त पूरक मार्गदर्शन करावे. समान चुका असलेल्या विदयार्थ्यांना गटात बसवून मार्गदर्शन करावे. वैयक्तिक मार्गदर्शनावर अधिक भर असावा.
अतिरिक्त पूरक मार्गदर्शनाच्या नोंदी ठेवण्याची पद्धत :
दैनिक नियोजनच्या शेवटी अध्ययन पूरक अतिरिक्त मार्गदर्शनाच्या नोंदी कराव्यात. अध्ययन मुदव व विदयार्थ्यांना दिलेल्या अनुभवांचे स्वरूप संक्षिप्तपणे नोंदवावे. प्रत्येक सत्राच्या अखेरीस संकलित मूल्यमापनानंतर एखादया विदयार्थ्यास एक किंवा अनेक विषयात क-२ च्या खालील श्रेणी मिळालेली असेल, तर तो विदयार्थी कोठे कमी पडलेला आहे? का कमी पडलेला आहे? याचा शोध घेऊन त्या विद्यार्थ्यांस किमान क-२ श्रेणीपर्यंत आणण्यासाठी अतिरिक्त पूरक मार्गदर्शन केले जाते. अतिरिक्त पूरक मार्गदर्शनानंतर निरीक्षणाद्वारे शिक्षकांची खात्री झाल्यानंतर त्या विद्यार्थ्याचे पुन्हा मूल्यमापन करावे. अतिरिक्त पूरक मार्गदर्शनासाठी वेळेचे नियोजन आधीच करावे. अपेक्षित सुधारणा घडवून आणणे, उपलब्ध वेळेत शक्य झाले नाही, तर विद्यार्थ्याच्या प्रगतिपुस्तकात ‘सुधारणा आवश्यक’ या सदरात कोणत्या स्वरूपाचे मार्गदर्शन हवे याची नोंद करावी, पुढील वर्गात गेल्यानंतर त्या विदयार्थ्यास अतिरिक्त पूरक मार्गदर्शन मिळणे शक्य होईल. संबोध विकसनासाठी, शंका निरसनासाठी अध्ययन अनुभव देणे जितके आवश्यक असते, तितकेव अध्ययनातील चुका, त्रुटी आणि उणिवा भरून काढण्यासाठी व समृद्धीसाठी अध्ययन पूरक अतिरिक्त मार्गदर्शन करणे आवश्यक असते.