केंद्रप्रमुख पदोन्नती प्रक्रियेवर प्रहार शिक्षक संघटनेचा आक्षेप: प्रक्रिया नियमबाह्य असल्याचा आरोप kendrapramukh promotion
देशोन्नती वृत्तसंकलन अमरावतीः जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने १६३ पदवीधर शिक्षक व मुख्याध्यापकांची केंद्रप्रमुखपदी पदोन्नतीकरिता यादी जाहीर करून त्यांना १२ जूनपर्यंत कागदपत्रे सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहे, परंतु ही यादी नियमबाह्य असल्याचा आरोप करीत प्रहार शिक्षक संघटनेने यादीवर आक्षेप घेतला आहे. ज्या सहायक शिक्षकांनी उच्च शैक्षणिक व्यावसायिक पात्रता घेतली आहे, त्यांना देखील या प्रक्रियेत समाविष्ट करण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा आंदोलन करू, असा इशारा संघटनेच्या वतीने विभागीय आयुक्तांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आला आहे.
जिल्ह्यात सुमारे ५२ केंद्रप्रमुखांच्या रीक्त जागांवर पदोन्नतीने पदस्थापना करायची आहे. याकरिता शिक्षण विभागाने पदवीधर शिक्षक व मुख्याध्यापक यांना पात्र करीत ६ जून रोजी जिल्ह्यातील १६३ जणांची सेवाज्येष्ठता यादी तयार प्रसिध्द केली आहे. या यादीवर आक्षेप नोंदवित ही यादी नव्याने प्रसिद्ध करावी अन्यथा आंदोलन करू, असा इशारा देखील महेश ठाकरे यांनी विभागीय आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे. यावेळी संघटनेचे विभागीय सचिव अमोल आगे, अमरावती जिल्हाध्यक्ष शरद काळे, अकोला कार्याध्यक्ष अमर भागवत आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यापूर्वी १३ ऑक्टोबर २०२३ रोजी प्रसिध्द केलेल्या केंद्रप्रमुख पदोन्नती तात्पुरत्या सेवाज्येष्ठ यादीमध्ये फक्त विषय, पदवीधर शिक्षक व पदवीधर मुख्याध्यापक यांचाच समावेश केला होता. त्याचवेळी याचा विरोध करण्यात आला होता; परंतु याची दखल शिक्षण विभागाने घेतली नाही. अखेर पुन्हा ही प्रकिया सुरू केली आहे. त्यामुळेही प्रक्रिया नियमबाह्य आहे. याबाबत ग्रामविकास विभाग व विभागीय आयुक्तांना निवेदन देऊन आक्षेप घेतला आहे.
– महेश ठाकरे, राज्याध्यक्ष, प्रहार शिक्षक संघटना