23 एप्रिल जागतिक पुस्तक दिना निमित्त पुस्तकाचे महत्व international book day 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
international book day
international book day

23 एप्रिल जागतिक पुस्तक दिना निमित्त पुस्तकाचे महत्व international book day

मरावे परी | पुस्तक रुपी उरावे ||

आज जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने पुस्तकाचे महत्व विशद करणारा लेख….

पुस्तके म्हणजे संतांची शिकवण पुस्तके म्हणजे मूल्यांची रुजवण.सदविचारांची पखरण, व्यक्तिमत्त्वाची जडणघडण. पुस्तके होऊ देत नाही जीवनात अधोगती, सदैव साधतात आपली सर्वांगीण प्रगती. पुस्तके वेदनेवर फुंकर घालतात. आपली जीवन ज्योत प्रज्वलित ठेवतात, पुस्तके सुखाची झुळूक बनुन जीवन आल्हाददायक बनवतात.दुःखाला तडीपार करतात, व्यसनांना हद्दपार करतात. पुस्तके चांगली मित्र बनतात, निस्वार्थ मैत्री करतात सुखदुःखाची देवाणघेवाण करतात. पुस्तके कधी गुरु बनतात जीवन जगण्याचा सन्मार्ग दाखवतात. यशाची प्रकाशवाट दाखवितात. पुस्तक आई बाबा बनतात मायेची चादर पांघरतात, प्रेमाची उब देतात, दोष पोटात घालतात. त्यांचे सद्गुण आपल्याला देतात त्यांची संपत्ती म्हणजे ज्ञान ती आपल्याला प्रदान करतात. पुस्तक हसवतात पुस्तक कल्पना विश्वात रमवतात पुस्तके धीर देतात,पुस्तके वीर बनवतात. पुस्तके निस्वार्थी बनवतात, पुस्तके परमार्थी बनवतात. पुस्तके शांत बनवतात, संयमी बनवतात. पुस्तके ज्ञानी बनवतात, सर्वांना मानी बनवतात. पुस्तकांचा ध्यास घेणाऱ्यास ‘व्यास’ बनवतात. पुस्तके माणसं घडवतात. अन्यायी माणसांना बडवतात. पुस्तके फुलासारखी असतात. आपला ज्ञान सुगंध दुसऱ्यांना देत त्यांची आयुष्य सुगंधित करत असतात. पुस्तके चंदनासारखे असतात स्वतः झिजतात परंतु दुसऱ्यांची ज्ञानाची झीज भरून काढतात. पुस्तके समृद्ध करतात, पुस्तके बुद्ध बनवतात, संत बनवतात. पुस्तके म्हणजे जीवन त्या विना जगणे कठीण आहे. पुस्तके म्हणजे ढाल आहेत, प्रेमाची उब देणारी शाल आहेत. पुस्तक हे शस्त्र आहेत. पुस्तक अस्त्र आहेत. त्यांच्या वापराने क्रांती होते. पुस्तक गीता आहे पुस्तक कुराण आहे. सर्व बंधू समभावाची पुस्तके शिकवण आहेत. पुस्तकेच राम आहेत, पुस्तकेच रहीम आहेत. जातीसलोखा शिकवणारे ते महामहीम आहेत. पुस्तकामुळेच अनेक महापुरुष, शास्त्रज्ञ,नेते घडतात. पुस्तकामुळेच सिकंदरासारखे जेते घडतात. पुस्तकेच सामान्य व्यक्तीचा किर्ती सुगंध उधळतात. पुस्तकामुळेच चर्चा घडतात. समस्यावर तोडगे निघतात, विचार मंथन होऊन अमृत रुपी विचार बाहेर पडतात. पुस्तक फक्त माणसं घडवतात.दुर्जनास सज्जन बनवतात, कफल्लकास समृद्ध करतात. पुस्तके अंधश्रद्धेने अंध झालेल्यांना डोळस बनवतात. पुस्तके अनिष्ट चालीरीती बंद करून नवीन प्रथा रूढ करतात. पुस्तक आत्म सन्मान देतात, जगण्याचा नवा दृष्टीकोन देतात. पुस्तके मन मजबूत करतात, पुस्तके मन काबूत करतात. एकाग्रता वाढवतात, ध्यान लावतात आपले आयुष्य घडवितात बेरंग आयुष्यात रंग भरतात. माणसांच्या स्वभावाचे विविध रंग उलगडतात. पुस्तक साधेपणाने जगायला शिकवतात चंगळवादापासून दूर ठेवतात. पुस्तके छळत नाहीत, मनाने मळत नाहीत, वाचल्याशिवाय कळत नाही. त्यामुळे पुस्तके वाचूया, जीवन घडवूया !
पुस्तके आपल्याला देत आणि देतच असतात. त्यामुळे म्हणावेसे वाटते,
पुस्तकाने देत जावे, आपण ज्ञान घेत जावे |
घेता घेता एक दिवस , आपलेच पुस्तक व्हावे |
शेवटी एवढेच सांगू इच्छितो,
मरावे परी | पुस्तक रूपी उरावे ||

 

Leave a Comment