आंतरजिल्हा बदली शिक्षक आगाऊ वेतनवाढीपासून वंचित ग्रामविकास मंत्र्यांना साकडे extra increment
नागपूर : आंतरजिल्हा बदली झालेले शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना एक आगाऊ वेतन वाढ देण्याची शासन निर्णयात तरतूद आहे. परंतु, अद्यापही हा निर्णय लागू झालेला नाही. यामुळे सेवाज्येष्ठता कमी होऊन वेतनवाढही मिळत नसल्याने शिक्षकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
वर्तमानपत्र कात्रण येथे पहा
👉PDF download
वर्ग ३ व वर्ग ४ च्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची आंतर जिल्हा बदलीने दुसऱ्या जिल्ह्यात बदली झाली असल्यास त्याची सेवाज्येष्ठता शून्य होते. यामुळे जिल्हा परिषदेतील मागील तीन वर्षांच्या गोपनीय अहवालाच्या आधारे बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना एक आगाऊ वेतनवाढ देण्याची तरतूद शासन निर्णयात ३ ऑक्टोबर २००३ मध्ये करण्यात आली आहे. असे असतानाही हा शासन निर्णय अधिक्रमित व रद्दही झालेला नाही. त्यामुळे अद्यापही या शासन निर्णयाची अंमलबजावणी देखील न झाल्यामुळे जिल्हा परिषदेतील आंतर जिल्हा बदलीने बदलून आलेले वर्ग ३ व वर्ग ४ चे कर्मचारी एक आगाऊ वेतन वाढीच्या लाभापासून वंचित आहेत- त्यामुळे भाजप शिक्षक आघाडीचे विदर्भ संयोजक अनिल शिवणकर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामविकास मंत्र्यांची भेट घेण्यात आली. याची दखल घेत तात्काळ तपासणी करून हा विषय मार्गी लावण्याचे आदेश ग्रामविकास मंत्र्यांनी दिले. त्यामुळे अनेक वर्षांपासून रखडलेला आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचा आगाऊ वेतनवाढीचा प्रश्न सुटणार का? याकडेही लक्ष लागले आहे.
आंतरजिल्हा बदली झालेल्या कर्मचा-यांना एक आगाऊ वेतन वाढ देण्याची शासन निर्णयात तरतूद असूनही त्याची अंमलबजावणी होत नाही. या गंभीर विषयाची दखल घेत मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली. त्यांनी प्रधान सचिव ग्रामविकास विभाग यांना कार्यवाहीचे लेखी निर्देश दिले.
– अनिल शिवणकर, पूर्व विदर्भ संयोजक, भाजप शिक्षक आघाडी
शिक्षक व कर्मचाऱ्यांना आगाऊ वेतनवाढ देण्याचा विषय अनेक वर्षांपासून रखडलेला आहे. यावर कार्यवाहीच्या सूचना दिल्या आहेत.
गिरीश महाजन, ग्रामविकास मंत्री