मतदानाचे व्हिडीओ पोस्ट करणे दोघांना पडले महागात election commission
लोकमत न्यूज नेटवर्क नांदेड : लोकसभेसाठी शुक्रवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी काही मतदारांनी ईव्हीएम आवडत्या उमेदवाराच्या नावासमोरील बटण दाबताना आणि व्हीव्ही पॅटमध्ये येणारी चिठ्ठी याचे व्हिडीओ तयार करुन ते सोशल मीडियावर व्हायरल केले होते. त्यामुळे आचारसंहितेचा भंग झाला असून, या प्रकरणात हदगाव आणि लोहा पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
नांदेड शहरातही अनेक पक्षांच्या कार्यकर्त्यांनी अशाचप्रकारे व्हिडीओ तयार करुन व्हायरल केले आहेत. आता त्यांची तपासणीही सुरु करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत मतदान केंद्रात मोबाईलच्या वापरास प्रतिबंध घालण्यात आला होता. मतदान प्रक्रिया सुरु असताना आतमध्ये कोणालाही चित्रीकरण करता येत नाही. परंतु, काही उत्साही
मतदारांना याचे भान नव्हते. त्यांनी आपल्या आवडत्या उमेदवाराच्या नावासमोरील बटण दाबत असल्याचे व्हिडीओ तयार केला.
त्यानंतर हे व्हिडीओ समाज माध्यमांवर टाकले. या प्रकरणात लोहा येथील प्रमोद होळगे याच्यावर तर हदगावमध्ये अज्ञात मतदारावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांकडून सोशल मीडियावरील इतरही अशा व्हिडीओंचा शोध घेण्यात येत आहे. त्यामुळे उमेदवाराला खुश करण्याच्या नादात व्हिडीओ अपलोड करणाऱ्यांना आता हा प्रकार चांगलाच महागात पडणार आहे. मतदान केंद्रामध्ये मोबाईल नेण्यास मज्जाव असतानाही असे प्रकार समोर आले.