‘ईव्हीएम’बाबत पत्र व्हायरल केल्याने प्राध्यापकावर गुन्हा एसडीओंची कारवाई : केंद्राध्यक्ष म्हणून होती नियुक्ती Action on PRO for election letter
लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : लोकसभा निवडणुकीसाठी केंद्राध्यक्ष म्हणून नियुक्ती केलेल्या प्राध्यापकाने ईव्हीएमबाबत निवेदन देऊन ते सोशल मीडियामध्ये व्हायरल केले. याची यवतमाळ उपविभागीय अधिकारी गोपाळ देशपांडे यांनी गंभीर दखल घेऊन पोलिसांत गुन्हा नोंदविण्याचे निर्देश दिले. त्यावरून नायब तहसीलदारांनी तक्रार दिल्यानंतर अवधूतवाडी पोलिसांनी प्राध्यापकावर गुन्हा दाखल झाला आहे.
यवतमाळ-वाशिम लोकसभा निवडणुकीसाठी २६ एप्रिलला मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर यवतमाळ विधानसभा मतदारसंघासाठी नियुक्त केलेल्या मतदान केंद्राध्यक्ष, सहायक मतदान केंद्राध्यक्ष व इतर मतदान अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण २०, २१ मार्चला आयोजित केले होते. प्रशिक्षणाला प्रा. डॉ. सागर शेवंतराव जाधव यांची केंद्राध्यक्ष म्हणून नियुक्ती केली होती.
दरम्यान, प्रशिक्षणापूर्वीच १९ मार्च २०२४ रोजी त्यांनी तहसील कार्यालयाकडे निवेदन सादर केले. निवडणूक ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरने घेतल्यास लोकशाही निवडणूक प्रक्रियेत सोपविलेली जबाबदारी पार पाडण्यास तयार आहे, असे नमूद केले. सोशल मीडियावर निवेदन व्हायरल केले. यामुळे निवडणूक कर्तव्यातील अधिकारी व कर्मचारी, नागरिकांमध्ये ईव्हीएमसंदर्भात संभ्रम निर्माण करून शासकीय कामात अडथळा निर्माण करीत असल्याचा ठपका जाधव यांच्यावर ठेवण्यात आला आहे. एसडीओ गोपाळ देशपांडे यांच्या वतीने नायब तहसीलदार एकनाथ बिजवे यांनी अवधूतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी मंगळवारी रात्री ९ वाजता कलम १३४ लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ सहकलम १८८ भादंविनुसार गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार नरेश रणधीर यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.
या मजकुरामुळे दाखल झाला गुन्हा
– प्रा. जाधव यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, सर्वोच्च – न्यायालयाच्या वकिलांचेही ईव्हीएमविरोधात आंदोलन सुरु आहे. ज्या प्रगत राष्ट्रांनी ईव्हीएमचा शोध लावला, ते राष्ट्रसुद्धा निष्पक्ष निवडणुकीसाठी ईव्हीएमचा वापर बंद करीत आहेत. त्यामुळे ईव्हीएमद्वारा घेतल्या जाणाऱ्या निवडणुका भारतीय लोकशाहीसाठी अविश्वासार्ह आहेत. भारताचा एक नागरिक म्हणून, लोकशाहीच्या संरक्षणासाठी भारतीय संविधान अनुच्छेद १९ (१) (अ) द्वारे ईव्हीएमच्या माध्यमातून होणाऱ्या निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यास मी असहमती – नोंदवत आहे. मात्र, मतपत्रिकेवर मतदान होणार असेल तर आपण सोपवलेली जबाबदारी पार पाडण्यास तयार आहे. याच मजकुरामुळे जाधव यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.