दहावीसह बारावीच्या परीक्षा शुल्कात राज्य मंडळाची वाढ increase exam fees
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या इयत्ता दहावी परीक्षा शुल्कात वाढ करण्याचा निर्णय राज्य मंडळ कार्यकारी परिषदेने घेतला आहे. त्यानुसार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र पुरवणी परीक्षा जुलै ऑगस्ट २०२४ आणि मुख्य परीक्षा- २०२५ साठी सुधारित शुल्क आकारण्यात येणार आहे. दहावीच्या नियमित तसेच पुनर्परीक्षार्थीसाठी परीक्षा शुल्क ४२० रुपयांवरून ४७० तसेच खासगी विद्यार्थी अर्ज आणि नोंदणी शुल्क असे एकूण १ हजार ३४० रुपये एवढे झाले आहे.
राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दहावीच्या सुधारित परीक्षा शुल्कासंदर्भात परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार नियमित विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क ४७० रुपये, प्रशासकीय
शुल्क २०, गुणपत्रिका लॅमिनेशन २० रुपये शुल्क, प्रमाणपत्र २० रुपये, प्रात्यक्षिक परीक्षा शुल्क (शास्त्र विषय) १० रुपये, प्रात्यक्षिक परीक्षा शुल्क (तंत्र विषय) १०० रुपये तसेच खासगी विद्यार्थी नाव नोंदणी अर्ज (माहिती पुस्तिकेसह) १३० रुपये आणि नोंदणी शुल्क १ हजार २१० रुपये आकारले जाणार आहेत.
पुनर्परीक्षार्थी आणि तुरळक विषय घेऊन परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुधारित परीक्षा शुल्क ४७० रुपये प्रशासकीय शुल्क २०, गुणपत्रिका लॅमिनेशनसह शुल्क २०, प्रात्यक्षिक परीक्षा शास्त्र विषय १० आणि प्रात्यक्षिक परीक्षा शुल्क (तंत्र विषय) १०० रुपये एवढे असणार आहे.