निवडणुकीच्या कामात शिक्षक व्यस्त; पेपर तपासायचे कधी ?कामाचा अतिरिक्त ताण: एकाचवेळी निवडणूक, परीक्षा आणि प्रशिक्षण election work with school work
लोकमत न्यूज नेटवर्क पिंपरी महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहेत. त्यामध्येच निवडणुकांचे काम लागल्याने त्यांचे पेपर कधी तपासणार, असा सवाल शिक्षकांनी उपस्थित केला आहे. एकाच वेळी निवडणुकीचे काम, विद्यार्थ्यांच्या परीक्षा आणि प्रशिक्षणही सुरू असल्याने शिक्षकांवर कामाचा अतिरिक्त ताण आला आहे.
पिंपरी-चिंचवड शहरामध्ये महापालिकेच्या १०५ प्राथमिक, तर १८ माध्यमिक शाळा आहेत. या शाळांमध्ये ५१ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ९३७ शिक्षक आणि ६८ मुख्याध्यापक आहेत. या शिक्षकांना निवडणुकीच्या अनुषंगाने पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या विधानसभा मतदारसंघांतर्गत काम देण्यात आले आहे.
त्यासाठीचे प्रशिक्षणही सुरू आहे. दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहेत. त्यासाठी पर्यवेक्षणाचेही काम करावे लागत आहे. परीक्षा संपल्यानंतर त्यांचे पेपर तपासून निकालपत्र बनवण्याचे महत्त्वाचे काम असणार आहे. मात्र, त्यासाठी वेळ मिळणार नसल्याची तक्रार शिक्षकांची आहे. निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने विद्यार्थ्यांचे पेपर कधी तपासायचे? तसेच त्यांचे निकालपत्र कधी बनवणार? असा सवाल शिक्षकांनी उपस्थित केला आहे.
शाळा पूर्वतयारीचे प्रशिक्षण आता नुकतेच पार पडले. एकीकडे निवडणुकीचे काम, दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या परीक्षा आणि त्यामध्येच प्रशिक्षणही सुरू आहे. त्यामुळे शिक्षकांना पुरेसा वेळ मिळत नाही. एकाच वेळी अनेक कामे असल्याने शिक्षकांवर अतिरिक्त ताण आहे. अर्धा मे महिना निवडणुकीचे काम चालणार आहे. त्यामुळे मुलांचे पेपर कधी तपासायचे, हा प्रश्न आहे. – सविता दौंडकर, शिक्षिका
शिक्षकांना नेहमी एकाचवेळी अनेक कामाचा व्याप असतो. केंद्र सरकार व राज्य सरकारकडून विविध प्रकारचे सर्वेक्षण घेतले जातात. त्यासाठीही शिक्षकांची नेमणूक केली जाते. तर विविध उपक्रम असतात. त्याचे प्रशिक्षण, त्यासाठी नोंदणी करणे, त्याची माहिती पालकांना व विद्यार्थ्यांना देणे ही कामे नित्याची असतात. आता निवडणुकीच्या कामासह विविध प्रकारचे प्रशिक्षण सुरु आहेत. त्याचाही अतिरिक्त ताण शिक्षकांवर आहे.
– अक्षय गोरे, पदवीधर शिक्षक, महापालिका