मराठी राजभाषा दिन साहित्यसूर्य वि.वा.शिरवाडकर यांचा जन्मदिन state language day
वि. वा. शिरवाडकर यांचे खरे नांव गजानन रंगनाथ शिरवाडकर दत्तक गेल्यामुळे • त्यांचे नांव विष्णु वामन शिरवाडकर झाले. २७ फेब्रुवारी १९१२ साली त्यांचा जन्म झाला. प्राथमिक शिक्षण पिपंळगाव येथे झाले. तर माध्यमिक शिक्षण नाशिक येथील न्यू इंग्लीश स्कुलमध्ये म्हणजे आजचे जे जु. स. रुंगठा विद्यालय आहे तेथे झाले. मॅट्रिक परिक्षा ते मुंबई विद्यापीठातून पास झाले.
१९३० साली हं. प्रा. ठाकरसी विद्यालयात ते होते तेव्हा ‘रत्नाकर’ मासिकातुन त्यांच्या कविता प्रसिध्द होत. अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या लोकांना काळाराम मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून १९३२ साली जो सत्याग्रह झाला त्यात त्यांनी सहभाग घेतला होता, त्यामूळे बाल्यावस्थेतील त्यांच्या लिखाणाला प्रौढत्वाची लकाकी चढून हळूहळू त्यांच्या साहित्याने आकाशाला गवसणीच घातली. ज्यात त्यांनी फक्त कविताच नाही तर कथा, कादंबऱ्या, नाटके, ललित साहित्य याबरोबर प्रभा साप्ताहिक, प्रभात वृत्तपत्र, सारथी, धनुर्धारी व नवयुग यामध्ये पत्रकारिता पण केली. त्यांचा आवडता लेखक पी. जी. वुडहाऊस व आवडता नट चार्ली चाप्लिन होता.
१९४२ साली प्रसिध्द झालेला ‘विशाखा’ हा काव्यसंग्रह म्हणजे मराठी वाङमयातील उच्च कोटीचे वैभव होय. जे आजही मराठी साहित्यप्रेमींना भुरळ घालते. ‘मराठी माती’, ‘स्वागत’, ‘हिमरेषा’ यांचबरोबर ‘ययाती आणि देवयानी’ व ‘वीज म्हणाली धरतीला’ ही नाटके १९६० ते १९६६ साली प्रसिध्द झाली. साऱ्या साहित्य कृतींना राज्य पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. १९४६ साली ‘वैष्णव’ ही कादंबरी व ‘दूरचे दिवे’ हे नाटक प्रसिध्द झाले.
‘नटसम्राट’ ही त्यांच्या लेखणीतून उतरलेली सर्वोत्कृष्ट कलाकृती तर होतीच पण त्याचे नाट्यप्रयोगही खूप गाजले. नाट्यवेड्या मराठी रसिकांनी त्यांचे अभूतपूर्व स्वागत केले. अत्यंत नाजुक व भावुक विषयाला हाताळणारे हे नाटक वयोवृध्दांचा दृष्टीकोन
बदलणारे ठरले कारण अनेक वृध्दांनी हे नाटक पाहिल्यावर आपले मृत्यूपत्र बदलले. तरूणांचाही वृध्दांकडे पहाण्याचा दृष्टीकोन बदलला.
* कुसुमाग्रज एक वेगळं व्यक्तिमत्व :
त्यांच्या साहित्य प्रवासाबरोबर माणूस म्हणून त्याचं वेगळं व्यक्तिमत्व अभ्यासायचं तर अनेक पैलूनी ते पहावे लागेल. नाशिकमधील अनेक चळवळींचे ते प्रणेते होते. उदाहरणार्थ, त्यांनी लोकहितवादी मंडळ १९५० मध्ये सुरू केले. नाशिकच्या प्रसिध्द सार्वजनिक वाचनालयाचे ते १९६२ ते १९७२ पर्यंत अध्यक्ष होते. ते दशक वाचनालयाचे सुवर्णयुग म्हटले पाहीजे. सामाजिक वा वैयक्तिक अशा कुठल्याही प्रकल्पांना ते मार्गदर्शन करीत. कोणीही कुठल्याही प्रकारचे मार्गदर्शन मागण्यास आला तर क्षणात त्या व्यक्तीची क्षमता ओळखून ते मदत करीत. असं असूनही यश साजरं करतांना ते मागे राहणंच पसंत करत.
* साहित्यसूर्य मावळला :
१० मार्च १९९९ रोजी कुसुमाग्रजांचे निधन झाले. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात कुसुमाग्रजांच्या निधनाने जी पोकळी निर्माण झाली ती कधीच भरून निघणार नाही. नाशिककरांना तर आपल्या घरातील वडीलधारं माणूस गमावल्याचं दुःख आहे. मानवतेचा कळवळा व मराठी भाषेवरचं प्रभुत्व यामुळेच ‘नटसम्राट’ व ‘विशाखा’ सारखे साहित्य जन्माला आले. एवढं उत्तुंग कर्तृत्व व अनेक पुरस्कारांनी सन्मानित व्यक्तिमत्व अत्यंत साधे तर होतेच पण शेवटपर्यंत अत्यंत नम्र व सत्कार्याला वाहून घेतलेले जीवन ते शेवटपर्यंत जगले. शिक्षणक्षेत्रात त्यांनी खूप मार्गदर्शन केले. आजची परीक्षा पध्दती मुलांसाठी निष्ठुर पध्दती आहे असे त्यांचे मत होते. इतरही अनेक क्षेत्रात त्यांनी लोकांना योग्य मार्ग दाखवले. त्यांचे घर म्हणजे तीर्थक्षेत्र झाले होते. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ स्थापण्यात आलेल्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानाचे समाजातील गरीब, गरजू व मागासलेल्या जनतेसाठी योगदान वाखाणण्यासारखे आहे.