ऑनलाइन फसलात१९३० वर कॉल करा अन् पैसे परत मिळवा सायबर आर्थिक फसवणूक हेल्पलाइनमुळे झाली सुविधा online syber cheating
सायबर आर्थिक फसवणूक हेल्पलाइनमुळे झाली सुविधा
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : अलीकडे ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार प्रचंड वाढले आहेत. मात्र, अकाउंटमधून पैसे कट झाल्यानंतर बऱ्याचदा नेमके काय करावे, हे अनेकांना माहिती नसते. एक- दोन दिवसांनंतर पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार देतात. परंतु तोपर्यंत फार उशीर झालेला असतो. तातडीने तुम्ही हालचाल केली तर तुमचे पैसे परतही मिळतात. साताऱ्यात बऱ्याच जणांना अशाप्रकारे पैसे परत मिळाले आहेत; पण त्यांनी १९३० या हेल्पलाइन नंबरवर फोन केला. तुम्ही केला का, असे सायबर पोलिस विचारतायत.
काहीवेळा शनिवार व रविवार आणि सार्वजनिक सुटीच्या दिवशी बँका उपलब्ध नसतात आणि फसवणूक केलेले पैसे विविध खात्यांमध्ये जातात. अशा घोटाळ्यांमध्ये गुंतलेल्या लोकांची अनेक बँक खाती असतात. एखाद्या व्यक्तीची फसवणूक केल्यानंतर ते रक्कम इतर खात्यांमध्ये ट्रान्सफर करतात. यावरही आता सायबर पोलिसांकडून तोडगा काढण्यात आला असून, ही हेल्पलाइन
काय आहे १९३०…
• १९३० ही सायबर आर्थिक फसवणूक हेल्पलाइन आहे. जर कोणी बँकेच्या खात्यातून किवा डिजिटल वॉलेटमधून फसवणूक करून पैसे काढले किवा त्याचा गैरवापर केल्यास तातडीने या हेल्पलाइनवर फोन करा.
• ही हेल्पलाइन बँका, वॉलेट आणि ऑनलाइन व्यापारी यासारख्या सर्व आर्थिक मध्यस्थांशी जोडलेली आहे. तक्रारदाराने आपले सर्व डिटेल्स या हेल्पलाइनवर सांगितल्यास पैसे तत्काळ गोठवले जातात. जेणेकरून फसवणूक करणाऱ्यांच्या हाती पैसे जाण्यापासून रोखता येतात.
२१ हजार गेलेले परत मिळाले..
साताऱ्यातील शाहूपुरीत राहणारे सत्यजित गुजर यांच्या पत्नी अनुराधा यांना सायबर चोरट्याचा फोन आला. त्याने ‘तुमचे लाइट बिल भरले नाही तर वीज कट केली जाईल,’ असे सांगितले. एवढेच नव्हे तर मीटरच्या रीडिंगचा फोटोही त्यांना पाठविला, त्यामुळे त्यांना वीज वितरणमधूनच फोन आला असल्याचे वाटले. त्यानंतर संबंधिताने त्यांना एक अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यांनी अॅप डाऊनलोड केल्यानंतर काही वेळातच त्यांच्या खात्यातून २१ हजार रुपये कट झाले. हा प्रकार त्यांनी त्यांचे पती सत्यजित गुजर यांना सांगितला, त्यांनी तातडीने १९३० या हेल्पलाइनवर फोन करून सर्व माहिती दिली. ज्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर झाले आहेत. ते अकाउंट गोठविण्यात आले. त्यांनी वेळेत फोन केल्यामुळे चौथ्या दिवशी त्यांना सर्व पैसे परत मिळाले.
लोकांनी कधीही वन टाईम पासवर्ड (ओटीपी) शेअर करू नये किंवा लिंकवर क्लिक करू नये किवा क्यूआर कोड स्कॅन करू नये. अनोळखी व्यक्तींनी निर्देश दिल्यास अॅप इन्स्टॉल करू नये. लोकांनी अशा सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात पडू नये.