मुख्याध्यापकाची कर्तव्य कोणती? याबाबत pdf duty of headmaster
अ) सर्वसाधारण कर्तव्ये
१) शाळेतील शैक्षणिक, प्रशासकीय व आर्थिक बाबीचे संनियंत्रण करणे.
२) ६ ते १४ वयोगटातील मुलांचे सर्वेक्षण करणे. दाखलपात्र मुला- मुलींची १००% पटनोंदणी करून घेणे.
३) नव्याने दाखल होणाऱ्या मुलांना प्रवेश देणे.
४) रजिस्टर क्र. १ नुसार मुलांना शाळा सोडल्याचा दाखला देणे.
५) १००% उपस्थिती टिकविणे. पालक संपर्क वाढविणे.
६) शालेय नोंदपत्रके अद्ययावत ठेवणे.
७) वर्गखोली बांधकाम ग्राम शिक्षण समितीच्या मदतीने वेळेत पूर्ण करून घेणे.
८) अनौपचारिक शिक्षणवर्गाचे नियंत्रण करणे.
९) शाळेमध्ये वेळेत उपस्थित असणे.
१०) शाळेच्या वेळेत कोणतेही खाजगी काम न करणे,
११) शाळेच्या मालमत्तेची योग्य काळजी घेणे. ग्रामशिक्षण समितीचा सचिव म्हणून काम करणे.
१२) शाळेचा शैक्षणिक दर्जा सर्व मानवी घटकांच्या मदतीने वाढविणे.
(ब) शैक्षणिक कर्तव्ये
१) शाळेचे वेळापत्रक तयार करणे.
२) अभ्यासविषयक व अभ्यासानुवर्ती कार्यक्रमाचे वार्षिक नियोजन करून घेणे.
३) सहकारी शिक्षकांना शैक्षणिक मार्गदर्शन करणे.
४) स्वतः वर्ग अध्यापन करणे व त्याबाबतचे वार्षिक नियोजन तयार करणे.
५) गटसंमेलनात सर्व शिक्षकांसह स्वतः उपस्थित राहणे.
६) स्पर्धा परीक्षा, घटक चाचणी, सत्र परीक्षांबाबत पूर्वनियोजन करणे. शासकीय शिष्यवृत्त्या आणि विविध सवलती यांचा लाभ विद्यार्थ्यांना वेळेत मिळवून देणे.
७) शाळेतील निकामी झालेल्या वस्तूंचे निर्लेखन प्रस्ताव नियमानुसार मंजूर करून घेऊन कार्यवाही करणे.
८) मूल्यशिक्षण, पर्यावरण शिक्षण, मुर्लीचे शिक्षण, लोकसंख्या शिक्षण इत्यादी सर्व विषयांतून एकात्म पद्धतीने शिकविले जातील याबाबत सहकारी शिक्षकांना मार्गदर्शन करणे.
९) समावेशक शिक्षणाबाबत ग्रामशिक्षण समिती, पालक-शिक्षक संघ, माता-पालक
१०) संघ यांचे उद्बोधन करणे. इयत्तानिहाय विद्यार्थी हजेरी वेळच्या वेळी शिक्षक भरत असल्याची खात्री करणे.
११) सर्व विषयांचे अध्यापन गाभा घटकाशी संबंधित होईल याबाबत दक्ष राहणे.
१२) शासन व समाजाकडून मिळणाऱ्या प्रत्येक पैशाचा पुरेपूर व योग्य वापर शाळेच्या विकासासाठी करणे.
१३) शाळेची प्रतवारी निश्चित करून त्यामधील उणीवा दूर करण्याचा प्रयत्न करणे. वार्षिक निकालपत्रक तयार करून घेऊन निकाल जाहीर करणे.
१४) सर्व सहकारी शिक्षकांना शैक्षणिक कामाचे वाटप करणे. पर्यवेक्षण निःपक्षपाती करून चांगल्या कामाची दखल घेणे.
१५) सहशिक्षकांच्या पाठाचे निरीक्षण करून लॉगबुक भरणे आणि अध्यापनातील त्रुटीविषयी त्यांना मार्गदर्शन करणे. शिक्षक-पालक संघ, माता-पालक संघ यांच्या सभा आयोजित करून विद्यार्थ्याच्या (पाल्यांच्या) गुणवत्तावाढीबाबत चर्चा व मार्गदर्शन करणे.
१६) दरमहा शिक्षक सभा आयोजित करून शिक्षकांनी केलेल्या अध्यापनकार्याचा तसेच कार्यवाहीत आणलेल्या विविध उपक्रमांच्या यशापयशाचा आढावा घेणे व मार्गदर्शन करणे.
१७) शैक्षणिक वर्षामध्ये घ्यावयाचे विविध शालेय व सहशालेय उपक्रमांचे नियोजन करणे, कामाचे वाटप करणे.
१८) शिक्षक हजेरीपत्रकावर शिक्षकांच्या सह्या वेळेत करून घेऊन रजेवरील शिक्षकांच्या
१९) रजेची आणि गैरहजर शिक्षकांच्या गैरहजेरीची नोंद करून स्वतः स्वाक्षरी करणे.
(क) विविध शैक्षणिक योजना अंमलबजावणीबाबत कर्तव्ये १) दर दोन महिन्यांनंतर शाळा व्यावस्थापन समितीची बैठक
आयोजित करणे. शासकीय व सर्व शिक्षा अभियानाच्या विविध योजनांचा लाभ सर्व लाभार्थीना मिळवून देणे. योजनांबाबत वरिष्ठ कार्यालयांनी विचारलेली सर्व माहिती वेळेत व बिनचूक पाठविणे.
(ड) आर्थिक बाबीसंबंधी कर्तव्ये
१) दरमहा नियमानुसार पगारपत्रक तयार करून मंजुरीसाठी सक्षम अधिकाऱ्याकडे कार्यालयास सादर करणे.
२) शासन आदेशानुसार व नियमांनुसार शाळेतील आर्थिक व्यवहार करणे.
इ) इतर कर्तव्ये –
१) सहकारी शिक्षकांच्या किरकोळ रजा मंजूर करणे.
२) शिक्षकांच्या किरकोळ रजेव्यतिरिक्त इतर रजा मंजुरीसाठी स्पष्ट शिफारशींसह वरिष्ठाकडे पाठविणे आणि त्याचा पाठपुरावा करणे.
वार्षिक तपासणीमध्ये अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी करणे.
३) स्वतः किंवा सहकारी शिक्षक इतर आर्थिक लाभाच्या योजनेत खात्याच्या • परवानगीशिवाय गुंतवून घेणार नाहीत याबाबत दक्ष राहणे.
माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापकावर विविध प्रकारच्या अनेक जबाबदाऱ्या असतात.
मुख्याध्यापक हा एक शिक्षक तर असतोच परंतु त्याच बरोबर तो एक उत्तम प्रशासकही असावा लागतो. विध्यार्थ्यांच्या शैक्षणिक, नैतिक, सामाजिक विकासापासून ते पालकांचे प्रश्न आणि शिक्षकांच्या पगारापर्यंत सर्वच गोष्टींची काळजी मुख्याध्यापकाला घ्यावी लागते. वेगवेगळया स्तरांवरील त्यांच्या जबाबदाऱ्यांचा थोडक्यात विचार करू.
१. शाळेतील जबाबदाऱ्याः संपूर्ण वर्षाचे नियोजन करणे, विद्यार्थी व शिक्षकांची उपस्थिती तपासणे, शिक्षक वेळेवर त्यांना दिलेल्या तासिका घेतात कि नाही ते तपासणे, त्यांचे मूल्यमापन करणे, वार्षिक, सहामाही, घटक चाचणी इत्यादी परीक्षांचे नियोजन करणे, सांस्कृतिक, कलाविषयक आणि क्रीडा कार्यक्रमांचे नियोजन करणे, ग्रंथालय, प्रयोगशाळा यांची अध्यायावतता सांभाळणे, महापुरुषांच्या जयंती-पुण्यतिथी यासंबंधीत कार्यक्रमांचे नियोजन करणे, विविध स्पर्धांचे आयोजन बक्षिश वितरण करणे, शाळेतील कार्यक्रमांच्या ठिकाणी अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणे, इत्यादी २. प्रशासकीयः शिक्षकांच्या सुट्ट्यांचे नियोजन, शिक्षणाधीकाऱ्यांना रिपोर्टिंग, सर्विसबुक मेंटेनन्स, आवक-जावक पाहणे, शाळेच्या इमारतीची डागडुजी करून घेणे, त्यासंबंधित खर्चाचा हिशेब ठेवणे, विविध विषयांवर शिक्षकांच्या, शाळेतील इतर कर्मचाऱ्यांच्या बैठकी घेणे, विविध उच्चस्तरीय बैठकींना उपस्थित राहणे, इत्यादी. थोडक्यात शाळेच्या प्रशासनाचा प्रमुख म्हणून सर्वच स्तरांवर कामकाज योग्यरीत्या होत आहे कि नाही हे पाहण्याची जबाबदारी मुख्याध्यापाकावरच असते.
३. विद्यार्थी-पालक-शिक्षक यांच्यातील दुवाः कुठलीही तक्रार किंवा विनंती असल्यास पालक सर्व प्रथम मुख्याध्यापाकांनाच भेटतात. पालक-शिक्षक-विद्यार्थी संवाद घडवून आणण्यासाठी पालक सभा आयोजित करणे, विद्यार्थ्यांच्या प्रगतीबद्दल पालकांना अवगत करणे, इत्यादी
४. सामाजिक: सर्वात वरिष्ठ वा जबाबदार शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना देशाचे जबाबदार नागरिक बनवणे, त्यांना चारित्र्यसंपन्न बनवणे, त्यांच्यात सामाजिक भान निर्माण करणे, देशभक्ती वाढविणे, आपल्या संस्कृतीची ओळख करून देणे, एकोपा वाढवणे या जबाबदाऱ्याही मुख्याध्यापकावर असतात.
५. तक्रार निवारणः विद्यार्थी, पालक, शिक्षक, इतर कर्मचारी सर्वांच्या तक्रारींचे निवारण मुख्याध्यापकाला करावे लागते. अशा प्रकारे माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक पद हे अत्यंत महत्वपूर्ण आहे. त्या पदावर असणारी व्यक्ती अत्यंत कर्तव्यनिष्ठ असली पाहिजे. तिच्यावर असलेल्या वर उल्लेखित व अनुल्लेखित अनेक महत्वपूर्ण जबाबदाऱ्यांचे तिला योग्य भान असायला हवे. तरच ती त्या पदाची प्रतिष्ठा आणि आपल्या शाळेची गुणवत्ता जपू शकेल.
अडचणी-
१. वाढता राजकीय हस्तक्षेप
२. शिक्षकांमधील गट, राजकीय भाग
३. पालकांचा वाढता हस्तक्षेप
४. शालेय अंतर्गत वाद हताळणे अवघड झाले आहे.
५. शिक्षकांना जबाबदार्या वाटून देताना येणाऱ्या अडचणी. अशा विविध अडचणी येतात.