स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज जयंती मराठी भाषण speech on chatrapati shivaji Maharaj jayanti
राष्ट्रपुरुष हा महाराष्ट्राचा,
शिल्पकार जो स्वराज्याचा, कैवारी हा रयतेचा, श्वास असे तो मराठ्यांचा | सदैव वाटतो करावा, गौरव ज्यांच्या कार्याचा, माझ्या लाडक्या राजाचा, छत्रपती शिवरायांचा ! छत्रपती शिवरायांचा |
व्यासपीठावरील आदरणीय मान्यवर, वंदनीय गुरुवर्य, आणि या गौरवशाली हिंदवी स्वराज्यातील तमाम शिवभक्तांना शिवजयंतीच्या… या अस्सल मराठमोळ्या सणाच्या… खूप साऱ्या शिवमय शुभेच्छा !
खरच ! समजत नाही आरंभापासून प्रारंभ करावा की प्रारंभापासून आरंभ करावा; कारण ज्यांनी निसर्गालाही झुकवून स्वराज्याचे देखणे स्वप्न उराशी बाळगलं. अनेक अग्निदिव्ये पार करून ते साकार केलं… आज ज्यांच्या जन्माला जवळपास चार शतके होत आली असली तरीही त्यांच नाव घेतलं तरी प्रत्येकात वीरश्री संचारते… चहूबाजूला नवचैतन्याचे वारे वाहते. अशा थोर विभूती बद्दल मी पामराने काय बोलावे ? आणि त्यांचे अतुलनीय कार्य कसै तोलावे ? तरीही… एक यत्न, एक प्रयत्न, एक भावना, एक श्रद्धा, एक मुजरा, एक मानाची वंदना… माझ्या राजासाठी ! राजा शिवरायासाठी !
दिवस होता… १९ फेब्रुवारी, १६३०. सारा महाराष्ट्र अन्याय, अत्याचार, जुलूम यांच्या काळ्याकुट्ट अंधारात झाकाळला होता. अन् अशातच कुठल्यातरी दैवी शक्तीचा साक्षात्कार घडावा अशी घटना घडली. स्वाभिमानी आणि अभिमानी मराठेशाहीची पहिली पताका फडकावणारे सरदार शहाजी भोसले व सरदार लखुजी जाधव यांची वीरकन्या आदरणीय जिजामाता यांच्या पोटी एक रत्न जन्माला आले. साऱ्या महाराष्ट्रात स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणारा… अंधारमय मराठी भूमीत चैतन्याची पहाट फुलवणारा….एक क्रांतीसूर्य जन्माला आला… होय माझा शिवबा जन्माला आला… माझा राजा जन्माला आला. ‘शिवनेरी’ चे नाव इतिहासात सुवर्णअक्षरात कोरून गेला. म्हणून तर आपण म्हणतो,
माय भवानी चे वरदान ज्याला, तो जन्मदात्यांच्या स्वप्नांचा आधार | तो शहाजीचा वीर पुत्र, ज्याने केले हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकार |
28/53
जिजाऊंना नेहमी वाटायचे, माझा शिवबा शूर झाला पाहिजे ! वीर झाला पाहिजे ! या परकीय आक्रमणांना थोपवून त्याने हिंदवी स्वराज्य निर्माण केले पाहिजे ! म्हणून त्यांनी नेहमी शिवबाला रामाच्या, कृष्णाच्या, अर्जुनाच्या, अभिमन्यूचा अशा वीरांच्या सदैव गोष्टी सांगितल्या. शिवाय मनावर चांगले संस्कार व्हावेत. चांगले विचार निर्माण व्हावेत; यासाठी संतवचनांचे व सात्विक विचाराचे सिंचन बालमनावर केले. यामुळेच शिवरायांसारखा एक युगपुरुष घडला…त्याच्या पाठीशी माझा प्रत्येक मावळा जिवानिशी लढला… आणि म्हणूनच हा सोनेरी महाराष्ट्र घडला..! याचे महात्म थोडक्यात
आपल्याला असेही सांगता येईल…
सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला, भगवा टिळा चंदनाचा शिवनेरीवर हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला, प्रकटला | महाराष्ट्रात असा एक शिवाजी राजा होऊन गेला |
पहिले पंतप्रधान पंडित नेहरूजी म्हणतात, शिवाजी राजे फक्त महाराष्ट्राचे आदर्श नाहीत तर ते देशाचे आदर्श आहेत शिवरायांचे स्वराज्य प्रेम, रयतेबद्दलची सहानुभूती, जनतेबद्दलचे प्रेम, त्यांची न्यायबुद्धी, धैर्य, शौर्य आणि चातुर्य अनाकलनीय होते. त्यांची प्रशासन व्यवस्था, युद्धनीती, धर्मकारण, राजकारण, आणि समाजकारण संपूर्ण विश्वाला आदर्शवादी आहे. म्हणूनच म्हणतो, “अरे माझा राजा लाखात एक नाही, तर जगात एक होता.” आपले सौभाग्य म्हणून असा आदर्श राजा, जाणता राजा, श्रीमान योगी, दैववान, किर्तीवान महामेरू आपणास लाभला. युगानुयुगे अस्मिता आणि स्वाभिमान जागवून गेला. म्हणूनच प्रत्येकाचे मन सदैव्य म्हणते, शिवरायांचे आठवावे रूप ! शिवरायांचा आठवावा प्रताप ! जाता जाता एक लाख मोलाची गोष्ट सांगावीशी वाटते,
ध्येय गाठण्यासाठी जिद्द हवी… जिद्द येण्यासाठी स्फूरण हवे… स्फुरण चढण्यासाठी आदर्श हवा… आदर्शासाठी नेतृत्व हवै… नेतृत्वासाठी कर्तृत्व हवे… कर्तृत्वासाठी पराक्रम हवा… पराक्रमासाठी देशभक्ती हवी… देशभक्तीसाठी अभिमान हवा… अभिमानासाठी स्वाभिमान, परंपरा संस्कृती हवी… आणि प्रत्येक मराठी माणसाला हे सर्व एकाच व्यक्तीने दिले आहे ते म्हणजे… ‘छत्रपती शिवराय’ ! राजे… तुमच्या सारखा अवतार न कधी झाला.. ना आहे.. ना होणार !
राजे… तुमचे ऋण कधी आम्ही नाही फेडू शकू ! राजे… ना तुमची प्रेरणा आशीर्वाद आदर्श आम्ही विसरू शकू ! राजे… ना खंडित होईल तुमचा जन्मोत्सव या भूमीवरी ! राजे… आपणास कोटी कोटी प्रणाम ! जय भवानी ! जय शिवाजी !