अध्ययन स्तर, अध्ययन निष्पत्ती व एकविसाव्या शतकासाठीची कौशल्ये learning outcomes
आपल्या वर्गामध्ये सर्वसाधारणपणे तीन स्तरात/पातळीवर विद्यार्थी आढळतात. अध्ययन गती कमी असणारी
मुले, अध्ययन गती मध्यम असणारी मुले आणि अध्ययन गती जास्त असणारी मुले. याचे वर्गीकरण आपण मूल्यांकन पद्धतीनुसार पुढीलप्रमाणे करू शकतो.
1) ASER पातळीवरील मुले
2) NAS पातळीवरील मुले
3) PISA पातळीवरील मुले
1) ASER (Annual Status of Education Report): असर पातळी म्हणजेच प्रथम संस्थेकडून मूलभूत संकल्पनांवर आधारित मूल्यमापन केले जाते. ज्यामध्ये मुलांचे वाचन, संख्याज्ञान व संख्यांवरील क्रिया या क्षमता पाहिल्या जातात. वाचनामध्ये इयत्ता आठवीतील मुलाला इयत्ता दुसरीच्या पाठ्यपुस्तकातील उतारा वाचता येणे अपेक्षित असते, तर गणितामध्ये भागाकार यापासून सुरुवात करत संख्याज्ञानापर्यंत खाली खाली येतात. आपल्या वर्गामध्ये पण लेखन, वाचन संख्याज्ञान व संख्यांवरील क्रिया यामध्ये समस्या असणारे विदयार्थी असतात. ही विदयार्थी संख्या ASER अहवालानुसार खूप मोठी आहे.
2) NAS (National Achievement Survey) : मूल्यमापनाची दुसरी पातळी म्हणजे NAS पातळी. NAS मूल्यमापनामध्ये मुलांच्या वर्गनिहाय व विषयनिहाय अध्ययन निष्पत्ती (Learning Outcomes) पडताळल्या जातात.
3) PISA (Programme for International Student Assessment): जागतिक स्तरावरील मूल्यमापन
प्रक्रिया म्हणजेच PISA. OECD (The Organization for Economic Co-operation and Development) या जगातील श्रीमंत देशांच्या समूहाने एकत्रित येऊन PISA (Programme for International Student Assessment) विकसित केली आहे. सदर परीक्षा सन २००० पासून घेण्यास सुरुवात झाली. यामध्ये गणित, विज्ञान आणि वाचन यांमधील विदयार्थ्यांची कामगिरी पाहिली जाते. PISA चा उद्देश जागतिक स्तरावर व्यक्ती म्हणून विकसित होणे. कोणत्याही देशात त्याला सुखकर जीवन जगता यावे. विश्वाच्या पातळीवर सर्वत्र त्याचा स्वीकार व्हावा यासाठी त्याच्यामध्ये एकविसाव्या शतकासाठीची कौशल्ये (4Cs चिकित्सक (Critical Thinking), सर्जनशील (Creative Thinking), सहयोग (Collaboration Skill), संवाद (Communication Skill) अपेक्षित आहेत. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० मध्ये या सोबतच आत्मविश्वास (Confidence) आणि करुणा (Compassion) ही दोन कौशल्ये देखील जोडलेली आहेत. PISA मूल्यमापनामध्ये विविध विषयाच्या अनुषंगाने 4Cs कौशल्यांची पडताळणी केली जाते.
अशाप्रकारे ASER, NAS आणि PISA अशा मूल्यांकनाच्या तीन पातळ्या आहेत. PISA परीक्षा वयाच्या १५ व्या वर्षी परीक्षा घेतली जाते, परंतु प्रत्येक इयत्तेमध्ये PISA साठी किंवा भविष्यासाठी तयार असणारी मुले तयार करता येतात. जरी PISA परीक्षा वयाच्या १५ व्या वर्षी घेतली जात असली तरी त्याची सुरुवात पहिल्या वर्गापासूनसुद्धा करता येते. PISA च्या बाबतीत विचार केल्यास भारताची स्थिती फारशी चांगली नाही. २००९ मध्ये भारतातील काही शाळा परीक्षेसाठी सहभागी झाल्या होत्या. एकूण ७४ देशांपैकी भारत ७३ व्या स्थानी राहिला. तेव्हापासून भारत देशातील शाळा PISA परीक्षेसाठी सहभागी झालेल्या नाहीत, परंतु
जागतिक बँकेच्या सहकार्याने २०२१ मध्ये होणाऱ्या PISA परीक्षेसाठी भारतातील काही शाळा सहभागी होणार होत्या, परंतु त्या सहभागी होऊ शकल्या नाहीत. यावरून आपल्याला PISA परीक्षेच्या बाबतीत आपल्या देशाची स्थिती लक्षात येण्यास मदत होते. वरील तीनही मूल्यांकनाचा विचार केला असता, आपल्या वर्गात ASER, NAS, PISA पातळी अशा तीनही
पातळीत असणारे विदयार्थी आढळून येतात. वेगवेगळे अहवाल पाहिले असता, भारतातील जास्तीत जास्त विदयार्थी संख्या ASER पातळीवर आहे. NAS पातळीवर काही प्रमाणात आणि PISA पातळीवर खूपच कमी संख्या आहे. असे चित्र प्रत्येक वर्गात दिसते. याच्याशी कुणाचेही दुमत असण्याचे कारण नाही. वरील स्थितीच्या अनुषंगाने दोन महत्त्वाचे प्रश्न आहेत :
१) शिक्षकांची जास्तीत जास्त ऊर्जा कोणत्या पातळीवरील मुलांसाठी खर्च होते? किंवा कोणत्या पातळीवर खर्च होते ?
२) शिक्षकाची जास्तीत जास्त ऊर्जा कोणत्या पातळीवर खर्च व्हायला हवी?
वरील दोन्ही प्रश्नांचा विचार केला असता, पहिल्या प्रश्नाचे उत्तर वास्तव आहे, तर दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर अपेक्षा आहे. आपली अपेक्षा पूर्ण करण्यासाठी जागतिक शिक्षण विचार व त्या अनुषंगाने सांगितलेले सतरा मुद्दे निश्चितच आपल्याला मदत करतील.
शिक्षणात गुणवत्ता न येण्यामागे शिक्षकांमधील प्रेरणेचा अभाव हे एक कारण मानले जाते. या परिस्थितीत गुणवत्ता सुधारताना शिक्षकांना प्रेरित करण्याचा मार्ग शोधणे योग्य ठरेल. दोन परिस्थिती दिल्या, एक ज्यामध्ये वर्गातील १०० टक्के मुले शिकत आहेत आणि दुसरी ज्यामध्ये काही मुले शिकत नाहीत. हे मान्य करावे लागेल की, कोणत्याही शिक्षकाला प्रथम परिस्थिती आवडेल.
शिक्षकांना असे प्रशिक्षण दिले जाऊ शकते की, ज्याने ते १०० टक्के मुलांना शिकविण्यास सक्षम होतील आणि ते एक आदर्श प्रशिक्षण असेल. १०० टक्के परिणामापर्यंत पोहोचण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो. त्यामुळे मुलांच्या शिकण्याचा वेग वाढविणारे प्रशिक्षण शिक्षकांना त्वरित प्रेरित करेल. अशा प्रकारे निर्माण होणारी प्रेरणा भविष्यात कमी होऊ नये यासाठी मुलांच्या शिकण्याच्या वेगात सातत्य आणि त्याने निर्धारित उद्दिष्टे लवकर साध्य होणे आवश्यक आहे. देशाने FLN लक्ष्य साध्य करण्यासाठी ५ वर्षांचा कालावधी निश्चित केला आहे. जर शाळा/वर्ग ३ किंवा ६ महिन्यांत किंवा एका वर्षात ते साध्य करू शकत असेल तर त्या वर्गातील शिक्षक / शाळांसाठी ते पुरेसे प्रेरणादायी आहे.
प्रत्येक विद्यार्थी/वर्ग/शाळेचे शिक्षण प्रगतिपथावर दिसले पाहिजे. जे विदयार्थी FLN पार करतील त्यांनी NCERT ने परिभाषित केलेल्या अध्ययन निष्पत्ती (LOs) शिकणे सुरू केले पाहिजे. LOs पूर्ण करणाऱ्यांनी एकविसाव्या शतकासाठीची कौशल्ये किंवा ग्लोबल एज्युकेशनकडे जाणे सुरू केले पाहिजे. सध्या या शिक्षण स्तरांची चाचणी ASER (Annual Status of Education Report), NAS (National Achievement Survey) आणि PISA (Programme for International Student Assessment) द्वारे केली जाते, यापैकी पहिले दोन पूर्वनिर्धारित अंतराने दर पंधरवड्याला शिक्षक करू शकतात. शिक्षणातील तात्कालिक प्रगतीचे विश्लेषण शिक्षकांद्वारे तसेच उच्च स्तरांवर केले जाऊ शकते, यश आणि परिणाम साध्य करण्यात यशाचा वाढलेला वेग शिक्षकांसह प्रणालीतील
प्रत्येकाला प्रेरित करेल.
विविध प्रकारच्या चाचण्या आयोजित करण्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण देणे सहज शक्य आहे. अध्ययन निष्पत्तींवर आधारित सर्व विषयांच्या सर्व इयत्तांसाठी प्रश्नपेढीचे अॅप मराठीत उपलब्ध आहे. त्यावर शिक्षकांना
पुरेसे प्रशिक्षण देता येईल. वेगवेगळ्या वयोगटांसाठी PISA स्तरावरील प्रश्न बैंक उपलब्ध नाहीत. परंतु, त्यासाठी काही ऑलिम्पियाड आणि शिष्यवृत्ती परीक्षांचे प्रश्न ही चांगली सुरुवात असू शकते. यासाठी सुरुवातीला, प्रत्येक वर्गातील सुमारे
२५ टक्के विदयार्थ्यांचे उद्दिष्ट ठरविले पाहिजे.
शिक्षक आणि काही पालकांकडे मोबाईल उपलब्ध असल्यामुळे वरील सर्व गोष्टी शक्य आहेत. मोबाईलची
उपलब्धता आणि नेटवर्क कव्हरेज विस्तारत राहील अशी अपेक्षा आहे. अशीही अपेक्षा आहे की, सरकार किंवा पालक हळूहळू विदयार्थ्यांना टॅब्लेट/टॅब प्रदान करण्यास सुरुवात करतील. माणसाचा प्रत्येक छोटासा प्रयत्न जेव्हा अपेक्षित परिणाम देतो तेव्हा तो मनुष्याला प्रचंड प्रेरणा देतो. छोट्या यशामुळे मोठे यश मिळवण्यासाठी आत्मविश्वास निर्माण होतो. यशामुळे मानसिक समाधान मिळते. प्रत्येक माणसाला सतत समाधानी राहायचे असते. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या पूर्ण प्रगतीच्या वरील डिझाईनमुळे शिक्षणक्षेत्रात समाधानी माणसांची संख्या वाढीस लागेल.
आता प्रश्न एवढाच उरतो की कोणत्या प्रशिक्षणामुळे शिक्षणाची गती वाढू शकते ?
हे सहा पायऱ्यांचे मॉडेल आहे :
१) विदयार्थ्यांना स्वतः शिकण्यास प्रेरित करणे.
२) विदयार्थ्यांना त्यांच्या शिकण्याच्या स्तरावर अवलंबून आव्हाने देणे आणि शिकण्याचा वेग वाढवणे. ३) शिकण्याची गती आणखी वाढविण्यासाठी, समवयस्क, गट अध्ययन आणि विषय मित्र शिक्षण या पद्धतीचा
उपयोग करणे.
४) विदयार्थ्यांच्या जिज्ञासू वृत्तीचा आदर करणे.
५) मुलांच्या शिकण्यात तंत्रज्ञानाचा उपयोग करणे.
५) वरच्या पायऱ्यांचे अनुसरण केल्याने, मुलांच्या शिकण्याची गती तिप्पट होते. त्यामुळे कोणत्याही वर्गाचा
पाठ्यक्रम एक तृतीयांश वेळेत पूर्ण होतो हे स्वतः पाहू शकणे. ६) ध्वनीफित, ध्वनीचित्रफित, अधिक सामग्री आणि सेल्फी विथ सक्सेस यासाठी शिक्षक आणि पालकांच्या मोबाईल हँडसेटच्या स्वरूपात तंत्रज्ञानाचा वापर करणे. परिणामांवर आधारित आंतरिक प्रेरणेसाठी कदाचित बाहेरील एजन्सींचा समावेश करून किंवा पर्यवेक्षण किंवा दोन्हीद्वारे नियतकालिक बाह्य मूल्यमापनातून अभिप्राय प्राप्त करणे सुद्धा आवश्यक असेल. शिक्षकांनी नोंदविलेले परिणाम आणि इतर मूल्यमापनांमधून उपलब्ध असलेल्या विसंगतीवर चर्चा करण्यासाठी केंद्रस्तरीय बैठका, शिक्षण परिषद आणि संवाद सभेचा वापर देखील आवश्यक आहे. डेटाच्या सर्व स्रोतांमधून समान आकडे मिळवणे हा हेतू असावा.