“पूर्णत्व” प्रेरणादायी लेख purnatva sundar lekha
मुलीचा जन्म. मुलगी जन्माला आल्यापासून प्रत्येक क्षणाला तिच्या भोवती सीमा आखल्या जातात. प्रत्येक रेषेचे महत्व तिला बालपणापासूनच पटवून दिलं जातं.पण तिच्या मनाचा विचार करायला प्रोत्साहित केल जात नाही. इथेच तिच्या विचारांवर आघात होण्यास सुरुवात होते.
तिला लहानपणापासूनच बंधने दिली जातात. तिला स्वतंत्रपणे, मनमोकळेपणाने कोणाशी खेळण तर सोडा बोलूही दिलं जात नाही. एकट कुठे पाठवायचे सोडाच कोणाशी नजर वर करून बघुही दिलं जात नाही. या आणि अशा अनेक बंधणांमध्ये अडकत अडखळत ती मोठी होत जाते.
मोठी होण म्हणजे वयात येणं, वयात येणं म्हणजे तिचा पूर्णतः शारीरिक विकास होण. या टप्प्यावर तर तिला अपराध्यासारख वाटत असत. ज्यावेळी तिला घरामधील प्रेम, माया, जिव्हाळा, आपुलकी हवे असते, मनमोकळे पणाने समस्या मांडण्याचं स्वातंत्र्य हवे असते तेव्हाच तिला “शांत बस” असे म्हणून गप्प केल जातं. तिला होणाऱ्या वेदना, त्रास, निमूटपणे सहन करत ती जगण्याची घडपड करताना दिसते. हळूहळू या सगळ्याची सवय होवुन ती या ऋतूचक्राला तोंड बंद करून सामोरी जाते. स्त्री जन्माला या यातना सहन कराव्याच लागतात या गैरसमजातून ती एक एक पाऊल टाकत जाते. पुढे आयुष्याच्या नवीन वाटेवर पाय टाकण्यापूर्वीच तिला आणि तिच्या मनातील प्रश्नांना पुन्हा खोट्या दरीत ढकलून दिलं जाते. एकांगाने विचार करून विवाह बंधनात तिला गुंतवून दिले जाते.
एकदा का ती या बंधनात अडकली की तिची हक्काची नाती तिच्या पासून दुरावतात. “जे काही होईल त्यास तु आणि तुझे घरचे जबाबदार असतील”. या वाक्याने तिच्या मनात असंख्य प्रश्नांचे काहूर माजते पण बोलणार कोणापुढे? सगळी दुःख गिळून सुखाचे खोटे हसु चेहेऱ्यावर आणुन संसाराचा गाडा ओढत ओढत स्त्री शरीराला पूर्णत्वाकडे घेवुन जाताना होणाऱ्या
मनाची चलबिचल सांभाळत आई होण्याचा सुखाला पूर्णत्व देवून स्त्री जन्माचे सार्थक करणाऱ्या प्रत्येक मुलीला मानाचा मुजरा करावाच लागतो.
स्त्री मन जपणारा साथीदार हजारात दहाच सापडतात. त्या दहा पुरुषांनी हजारो पुरुषांना सांगितले पाहिजे तिच्या कुशीत किंवा उदरात आपणही नऊ महिने सुरक्षित होतो. त्या प्रत्येक स्त्रीचा आदर स्वतःच्या आई, बहीण, आत्या, मावशी, काकी, मामी याप्रमाणे करा. तिला मानसिक, भावनिक, शारीरिक आधार देणारा पुरुष मिळाला तर खऱ्या अर्थाने तिला स्त्री जन्माचे पूर्णत्व मिळाल्याचा आनंद होईल यात शंकाच नाही.