मेळघाटातील अविस्मरणीय क्षण

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मेळघाट अभयारण्य आणि मला आलेले अनुभव 

मी अशोक बबन काशिद (सहशिक्षक) माझी प्रथम नियुक्ती मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घाना या (आदिवासी)गावी दि.24-12-2010 रोजी झाली. या अगोदर मला मेळघाट विषयी कसलीही महिती नव्हती. मेळघाट म्हणजे वन्यजीव अभयारण्य होय. चिखलदरा आणि धारनी तालुका मिळून मेळघाट तयार होतो मेळघाट म्हणजे दऱ्याखोऱ्यांचा प्रदेश सातपुडा पर्वताच्या रांगेतील उंच शिखरे वैराट हे त्यातीलच एक उंच शिखर होय यामध्ये अनेक हिंस्र प्राणी होते वाघ, अस्वल, बिबट, लांडगा हे मला तेथील शाळेत रुजु झाल्यावर कळाले. मेळघाट म्हणजे वाघ,अस्वल यांचे माहेर घर होते. सागवणाचे घनदाट जंगल रायमोनियाचे घनदाट जाळे , अनेक रंगीबेरंगी फुलांची झाडे, विविध पक्षांचे वेगवेगळे आवाज कधी कधी वाघाची ऐकायला येणारी डरकाळी, पक्षांचे थवे, बाष्याचे घनदाट जंगल त्यांच्या घर्षणामुळे लागणारी आग जंगली प्राण्यांना पाणी पिण्यासाठी वनविभागाने केलेली पाणवठे, हिंस्र प्राण्यांच्या पाऊलखुणा पाहून मनामध्ये एखादा प्राणी जवळच असावा अशी भीती मनात यायची,अभयारण्यातील वळणे घेत जाणारे रस्ते . हे सर्व पाहिल्यावर अनेक वेळा नौकरी सोडण्याचा विचार माझ्या मनात यायचा. पण एक मन असेही म्हणायचे की नाही नौकरी करून दुसरे काय करणार माझी गावाकडची परिस्थिती तेवढी चांगली नव्हती गावाकडे जर गेलो तर ऊस तोडणीसाठी जावे लागेल दुसरा तर पर्याय नाही . कारण नौकरी लागण्यासाठी आतोनात मेहनत केलेली होती शिक्षणासाठी पुर्ण महाराष्ट्र फिरलो होतो नौकरी सोडणे एव्हढे सोपे नव्हते. पण अंतर्मनाचा एक कोपरा मला सांगत होता तु करु शकतोस आणि मी अंतर्मनाचे ऐकले निर्णय ठाम केला ‘do or die’ सिच्युएशन तयार केली आणि ठरवले ही नौकरी…. नौकरी म्हणून करायची नाही तर आदिवासी लोकांची सेवा म्हणून करायची आपल्यातलं सर्वोत्तम त्यांना द्यायचे सर्व मेळघाट आपण सुधारू शकत नाही पण एक गावं मात्र आपण सुधारू शकतो हा विश्वास मनात निर्माण केला आणि शेवटी यश मिळाले.

घाना या गावातील लोकांचा पेहराव पाहून मला खुप भीती वाटायची कारण त्यांच्या खांदयवर कुऱ्हाड असायची डोक्यावर केस वाढलेले असायचे सतत मध्यपान करायचे मोहाची शिडू(गावठी दारू जी की मोहाच्या झाडाच्या फुले यापासुन बनवलेली) पिलेले असायचे त्यांचा व्यवसाय म्हणजे शिकार करणे, मासेमारी इत्यादी. राम राम घालणे (नमस्कार) कळायचे म्हणून मी कोणीही शाळेत आला तर त्याला राम राम घालायचो. अनेक प्रसंगांना मी तेथे तोंड दिले. एखादा जर टीसी मागायला आला तर लगेच द्यावा लागायचा. पण ते लोक मनाने खूप प्रेमळ होते त्रास कधी देत नसत.

माझा शाळेचा पहिला दिवस 25 घराचं ते गावं होतं.आणि तेथील परिस्थिती पाहून मी हरखून गेलो. कारण तेथे खुप भयावह परिस्थिती होती. पाणी पिण्यासाठी योग्य नव्हते. गावाला एक handpump होता. त्याला खुप दूषित पाणी यायचे लोक तेच पाणी पीत होते. काही लोक तर नदीतील पाणी पीत असत त्यानें लहान मूल आजारी पडायचे. गावात नेहमी रोगराई पसरत असे. गावामधे electricity नव्हती. लोक sour pannel वर लाईट तयार करायचे त्यावर कसाबसा एखादा lamp रात्रभर चालायचे. गावात दळणवळणाची साधनं नव्हती. लोकं आजूबाजूच्या गावाला पायी जात असत. तेथें मोबाईलला range नव्हती. त्यामुळें जगाशी 100 टक्के संपर्क तुटलेला असायचा मी महिन्यातून एकदा अमरावती, परतवाडा येथे जायचो तेथून घरी संपर्क करायचो घरची खुशाली जाणून घ्यायचो तोपर्यंत मी आहे का कूठे गेलो हे घरच्याना माहीत नसायचे. तेथील आदिवासी लोकांना मराठी समजत नसे ते हिंदी थोडी फार बोलायचे कारण त्यांची भाषा कोरकु होती कोरकू भाषा मला काहीच समजत नव्हती. मी बोलायला लागलो की ते लोक हसायचे मी कधी कधी त्यांची भाषा कृतीवरून समजून घ्यायचो. गावात बस येत नसल्यामुळे चुर्णी येथे बाजाराला पायी जावे लागायचे. दोन तास पायी चालल्यावर चूर्णी गाव गाठायचे बाजार करून पुन्हा तेथें यायचे गावात पक्के घर नव्हते कौलारू छपराची घरे होती कधी कधी छपरावर साप दिसायचे. खुप भीती दायक परिस्थिती होती. रात्री प्राण्यांचे चित्र विचित्र आवाज यायचे. जंगलातून जाताना अस्वल,वाघाची, लांडग्याची भीती वाटायची. त्यामुळें झाडावर चढणे शिकावं लागलं कारण तेथील लोक म्हणायचे जर कधी प्राण्याने हल्ला केला तर मोठ्याने ओरडायचे किवा छोट्या खोडाच्या झाडावर चढायचे.तेथील लोकांचा आरोग्याचा प्रश्न खुप गंभीर होता. लहान मुलांच्या पोटात दुखत असेल तर त्याच्या पोटला गरम सळईचे चटके दिले जायचे. झाडपल्याचे औषधे वापरायचे. दवाखान्यात ते जात नसत. आरोग्याची काळजी घेत नव्हते. 

तेथे अनेक वन कर्मचारी होते वनाधिकारी होते ते आम्हाला नेहमी जंगला विषयी माहिती द्यायचे जंगलातील प्राण्याविषयी माहिती द्यायचे प्राण्यांची गणना कशी केली जाते हे ते आम्हाला सांगायचे आम्हाला अनेक प्रकारची मदत ते करायचे शाळेमध्ये अनेक उपक्रमामध्ये ते भाग घ्यायचे विद्यार्थ्यांना भेटवस्तू द्यायचे त्यांच्याकडून आम्हाला जंगलाविषयीच्या अनेक बारिक-सारीक गोष्टी शिकायला मिळाल्य. वृक्षारोपण करताना त्यांची आम्हाला मदत व्हायची उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेस जंगलांना आगे लागायच्या त्याला गुन्हा येत म्हणून विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता आणण्यासाठी आम्ही सहशालेय कार्यक्रमांमधून गावागावांमध्ये त्याची जागरूकता करायचो.

मी शाळेत जॉईन झालो आणि तेथें एक भयानक गोष्ट घडली. माझ्या शाळेपासून जवळच एक 10 किमी अंतरावर निवासी आश्रम शाळेत एका अस्वलाने हल्ला केला आणि तेथील एक शिक्षक, एक विद्यार्थी, एक गावातील नागरिक, व एक वन कर्मचारी यांना त्या अस्वलणे फाडून टाकले. लोकांनी त्यांना वाचवण्याचा खूप प्रयत्न केला परंतु काही उपयोग झाला नाही. नंतर त्या पिसाळलेल्या अस्वलाला मारण्यासाठी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी हत्ती आणला त्यावर sharp shooters बसवले आणि अस्वलाचा अंत केला ही घटना मी ऐकली आणि मी अस्वस्थ झालो कारण आतापर्यंत फक्तं ऐकलं होत की येथे हिंस्र प्राणी आहे. परंतु कोणावर attack झालेलं पहिल्यांदाच आईकले होतें . पण एव्हढे सगळे ऐकून पाहून असे वाटायचे आपल्याला नौकरी तर करणेच आहे काही झालं तरी हार मानायची नाही कारण येथे पण लोकच राहतात. यांना पण जीवन आहे मग विचार केला नौकरी ही नौकरी म्हणुन नाही करायची तर सेवा म्हणुन करायची असं मी ठरवलं आणि माझ्या मनावरील ताण हलका झाला. मन मोकळे झाले कारण मी तेथील परिस्थिती समजून घेत होतो. जर या लोकांना आपलंसं करायचे असेल तर आपल्याला त्याच्यामध्ये जावे लागेल त्यांची संस्कृती समजून घ्यावी लागेल. त्यांना कशात आवड आहे हे पाहावे लागेल.

त्या गावात शैक्षणिक वातावरण नव्हते लोकांना शिक्षणात रुची नव्हती शिक्षणाविषयी निरसता होती. शिक्षणाचे महत्त्व नव्हते. मुलांना ते लोक शाळेत पाठवत नसत. मी त्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. शिक्षणाने जागृती येते लॅपटॉपवर काही सामाजिक, शैक्षणिक व्हिडिओ क्लिप दाखवल्या. लोकांनी त्या पहिल्या काही लोकांना त्या आवडल्या. त्यांनी चांगला निर्णय घेतला. आपली मुले गावातल्या शाळेतच शिकवायची.3 मुलावरून माझी शाळा सुरु झाली पुढील एका महिन्यात मला गावातील 22 मुले मिळाली. मग मी माझे काम सुरु केले लोकांनी माझ्यावर विश्वास टाकला मुले पाढे पाठ करु लागली कविता प्रार्थना गाऊ लागली. मुलांना आणण्यासाठी अनेक क्लृप्त्या मला कराव्या लागल्या. जंगलातील शेतात जाणे तेथें जाऊन लोकांना शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगणे. त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे. त्या मुलांना स्वच्छतेचे महत्व नव्हते. सुरवातीला त्यांना मी handpamp वर घेऊन जायचो. तेथें अंघोळ करायला लावायची. शाळेत सर्व साहित्य ठेवावे लागायाचे कंगवा, आरसा, टॉवेल, तेल,soap इत्यादी. हळूहळू मुले सुधारू लागली. स्वच्छता त्यांना कळू लागली.

         ग्रामपंचायतीच्या सरपंच यांच्या  माध्यमातून शाळेला संगणक उपलब्ध करून घेतला. सौर प्लेटच्या माध्यमातून शाळेला विद्युत पुरवठा सुरू केला. मुले संगणकावर विविध प्रकारचे चित्रकला लेखन गायन पाहू लागले. मुलांचा शिक्षणामध्ये चांगल्या प्रकारे रस निर्माण झाला. मुलांची उपस्थिती वाढू लागली. लोकांना शिक्षणाचे महत्त्व समजून ते देखील मला सहकार्य करू लागले. गावात सगळीकडे शैक्षणिक वातावरण तयार होऊन सर्वजण मला येऊन सांगू लागले. मुले आता चांगले अभ्यास करू लागली आहेत. गावामध्ये भिंतीवर सार्वजनिक ठिकाणी चित्रकला चित्रकलेच्या माध्यमातून अंक अक्षरे मुळाक्षरे अशा प्रकारचे लेखन मी स्वतः त्या ठिकाणी केले. सुट्टीच्या दिवशी यामुळे मुलांना वाचनासाठी फायदा झाला. लोकांचा शाळेकडे पाण्याचा दृष्टिकोन बदलला. शाळा हे आपल्या विकासाचे माध्यम आहे हे लोकांना कळून आले. लोक सहशालेय उपक्रमामध्ये भाग घेऊ लागले. शाळेमुळे व शाळेतील अध्ययनामुळे गावामध्ये उत्साही वातावरण निर्माण झाले.

       शालेय परिसरामध्ये मी परसबाग फुलवण्याचे ठरवले यासाठी गावातील लोकांनी पालकांनी मला चांगल्या प्रकारे मदत केली शाळेच्या पाठीमागे आम्ही परसबाग बनवण्याचे ठरवले या परसबागेसाठी बैलजोडीने थोडी शेती सुपीक करण्यात आली. त्या ठिकाणी विविध प्रकारचे फळभाज्या आणि पालेभाज्या लावण्यात आल्या. त्या सर्व पालेभाज्यांचा फळभाज्यांचा उपयोग आम्ही दररोज खिचडी मध्ये केला त्यामुळे विद्यार्थ्यांना खिचडी चांगल्या प्रकारे आवडू लागली विद्यार्थी आनंदी झाले अशाप्रकारे आनंददायी वातावरणातून आनंददायी शिक्षण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यास मदत झाली. गावकऱ्यांनी शाळेला व परसबागेला तारीचे कुंपण बनवून दिले. पालक मंडळी शाळेला भेटवस्तू देऊ लागले.

            शाळेच्या व गावाच्या मधात एक छोटा नाला होता त्या नाल्यामुळे विद्यार्थ्यांना पावसाळ्यामध्ये येण्या जाण्यासाठी अडचण निर्माण होत होती गावातील लोकांच्या सहकार्याने आम्ही त्या ठिकाणी मोठी नळी बसवली त्यामुळे विद्यार्थी ये जा करताना कसल्याही प्रकारची भीती राहिली नाही. शालेय उपयोगी अशा अनेक प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणी आम्ही सुरू केल्या. पालकांचा उत्साह पाहून मीही त्यामध्ये समरस होऊन गेलो. मलाही त्या गावामध्ये आनंद वाटू लागला.

      एक अस्वलीचा प्रसंग मला आजही आठवतो आम्ही सुरनीला बाजारासाठी गेलो होतो बाजार संपून संध्याकाळी सात वाजता परतीच्या मार्गाला लागलो त्या ठिकाणी जंगलातून येत असताना एक मोठी नदी आहे आणि त्या नदीवरून आम्ही घाट चढत होतो घाट चढत असताना अचानक समोर एक अस्वल आले ते पाहून आम्ही सर्व आम्ही सर्वजण घाबरलो पण हिम्मत हरलो नाहीत ते अस्वल आमच्या गाडीच्या समोर उभी होती तिने आमच्याकडे पाहिले आणि थोडा वेळ तसेच थांबले आणि काही वेळानंतर ती पुढे चालू लागली आमच्या गाडीच्या फोकस मुळे तिला समोरचे दिसत नव्हते त्यामुळे ती मागे वळली आणि पुढे चालू लागली ती जशी जशी पुढे गेली तशी तशी आमची गाडी तिच्या मागे चालू लागली पुढे गेल्यानंतर तिनं एका झुडपामध्ये ती निघून गेली आणि आम्ही सुटकेचा निष्वास सोडला आणि गाडी भरताव वेगाने पळवली अशा प्रकारचा हा समोरासमोर घडलेला अस्वलीचा प्रसंग मला तो आजही जशाचा तसा आठवतो अस्वल हा असा प्राणी आहे की तो माणसाला पायऱ्या बरोबर त्याला फाडून आस्तव्यस्त करतो. हे मी चांगल्या प्रकारे ऐकले होते त्यामुळे अस्वला विषयी पहिल्यापासूनच माझ्या मनामध्ये भीती होती.

          अशाच प्रकारचा एक वाघाचा देखील मला प्रसंग आठवतो मी परतवाड्यावरून चिखलदरा मार्गे सेमाडोह माखला मार्गे खंडू खेळा जात असताना त्या ठिकाणी फोरविलर मध्ये होतो आणि समोर घनदाट जंगल लागले आणि बरेच अंतर जंगलामध्ये आल्यानंतर समोर एक पटेरी वाघ समोर आला त्या वाघाने आमच्या गाडीकडे पाहिले तो एक वाघाला जवळून पाण्याचा प्रसंग मी अनुभवला रात्रीची साडेनऊ ची वेळ होती वाघ त्या ठिकाणी आमच्या गाडीकडे पहात होता बराच वेळ पाहिल्यानंतर वाघाने समोरच्या घनदाट झाडीकडे झेप घेतली वाघाला जवळून पाण्याचा प्रसंग हा खूप न्यारा होता अंगाचा थरकाप उडाला होता.

      पुढे काही दिवसानंतर मेळघाटची जशी जशी प्रगती होत गेली तसतसे मेळघाटन मधील रस्ते सुधारू लागले खड्यांच्या रस्त्याच्या जागी सिमेंटचे रस्ते बनवू लागले घाट वळणावर चांगल्या प्रकारची पक्की रस्ते बनू लागली लोकांचे राहणीमान सुधारले लोकांची शैक्षणिक विचारसरणी बदलली लोकशिक्षणाचे महत्त्व जाणू लागले आरोग्याविषयी जनजागृती आली दळणवळणाची साधने वाढली शासकीय महामंडळाच्या बसेस सुरू झाल्या तेथील शेतीमध्ये सुधारणा झाल्या लोक सुधारित वाण पेरू लागले जास्तीत जास्त उत्पादनान कसे मिळवायचे हा विचार तेथील लोक करू लागले प्रत्येक गोष्टीविषयी त्यांच्यामध्ये जागरूकता निर्माण झाली शहरांशी संपर्क वाढला लोकविकासाची कामे होऊ लागली वनाधिकाऱ्यांच्या मार्फत त्यांना विविध सवलती मिळू लागल्या लोकांच्या हाताला काम मिळाले महाराष्ट्र शासनाच्या वतीने रोजगार निर्मितीचे काम चालू झाले तेथील लोकांचे स्थलांतर थांबले लोक कामासाठी बाहेर जाण्याचे थांबले तेथेच आपली शेती करून ते कुटुंबाचा विकास करू लागले मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न सुटला मुलांना दर्जेदार शिक्षण मिळू लागले आश्रम शाळांच्या माध्यमातून मुलांना उच्च शिक्षण मिळू लागले आदिवासींची मुले प्राधान्याने नोकरीत लागू लागली गावांमध्ये जे मुले नोकरीमध्ये लागली ते आदर्श निर्माण झाले त्यामुळे त्यांच्याकडे पाहून इतर पालक वर्ग ही जागृत झाला आणि आपल्या मुलांना शिक्षण कसे मिळेल हा विचार करू लागला.

असा हा माझा मेळघाटातील नऊ वर्षाचा प्रवास अविरत चालू होता अशातच माझी मेळघाट मधून 2018 मध्ये दर्यापूर या ठिकाणी प्रशासकीय बदली झाली. त्या लोकांना सोडताना मला खूप वाईट वाटले. बदली मिळाल्यानंतर ही त्या ठिकाणच्या आठवणी मला स्वस्थ बसू देत नव्हत्या आजही तेथील पालक, माझे विद्यार्थी अवरजून फोन करतात खुशाली विचारतात. अनेक जन मला भेटायलाही आलेले आहेत.

      

       

2 thoughts on “मेळघाटातील अविस्मरणीय क्षण”

  1. Now i am live experiyance from 2006 to at this time 18 year ,, stragul in forest to develope the live and nature

Leave a Comment