जि.प.शिक्षक पुरस्कार सुधारित मूल्यमापनानुसार कार्तिकेयन : ऑक्टोबरमध्ये घोषणा ideal teacher awards
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जिल्हा परिषदेचे आदर्श शिक्षक पुरस्कार सुधारित मूल्यमापनानुसार जिल्हा स्तरावर मुलाखती घेऊन ऑक्टोबरमध्ये जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी दिली. दरवर्षी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून ४ सप्टेंबर रोजी या पुरस्कारांची घोषणा करण्यात येते. परंतु, यावर्षी हे पुरस्कार घोषित न झाल्याने शिक्षकवर्गातून याबाबत चौकशी सुरू होती. या पार्श्वभूमीवर कार्तिकेयन यांनी ही माहिती दिली.
दरम्यान, प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांनीही याबाबत पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. त्यात म्हटले आहे, पुरस्कारासाठी पात्र शिक्षकांकडून स्वयमूल्यमापन प्रपत्रानुसार उच्च गुण प्राप्त शिक्षकांच्या शाळेमध्ये प्रत्यक्ष भेट देऊन बिटस्तर, तालुकास्तर तसेच तालुक्यांची अदलाबदल करून त्रयस्थ बाह्यमूल्यमापन समितीच्या शिफारशीनुसार तालुकास्तरावरून मूल्यमापन प्रक्रिया अंतिम झाली आहे. तथापि, राष्ट्रपतींच्या दौऱ्यामुळे जिल्हा परिषद निवड समिती सभा रद्द करण्यात आली. हे पुरस्कार वस्तुनिष्ठ होण्यासाठी जिल्हा स्तरावरील मुलाखतीसाठी पात्र शिक्षकांकरिता सुधारित मूल्यमापन प्रपत्र तयार करून पाठवण्यात येणार आहे.