विहित मुदतीत संगणक अहर्ता प्राप्त न केलेने त्यांचे उपदानातून वसूल करण्यात आलेली अतिप्रदान रक्कम परत करणेबाबत mscit course
संदर्भ :- शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद पुणे यांचे पत्र जा.क्र. जिप/शिक्षण/लेखा/१८/२०२३/७५९० दिनांक २२/१२/२०२३
उपरोक्त विषयाबाबत संदर्भिय पत्रान्वये आपल्या कार्यालयास पंचायत समिती हवेली यांचे दिनांक १४/१२/२०२३ रोजीच्या पत्र प्राप्त झाले आहे. सदर पत्रामध्ये संगणक अहर्ता प्रमाणपत्र विहित मुदतीत सादर न केलेने चालू असलेल्या वसुलीस शासनाने दिनांक २०/११/२०१८ रोजीच्या पत्रान्वये स्थगिती देण्यात आली होती. त्यानंतर शासनाचे दिनांक २६/११/२०२० रोजीच्या पत्रान्वये दिनांक २०/११/२०१८ रोजीचे पत्र अधिक्रमित करण्यात येवून अतिप्रदान वेतनाची वसुली करणेबाबत शासनाने सूचित केले होते. परंतू लगेचच शासनाचे दिनांक २७/११/२०२० रोजीच्या पत्रान्वये शासनाचे दिनांक २६/११/२०२० रोजीच्या शासन पत्रास स्थगिती देण्यात येवून शिक्षकांच्या वेतनाची वसुली करण्यास स्थगिती देण्यात आली आहे व स्थगिती कालावधीत शिक्षकांच्या वेतनाची वसुली झालेली रक्कम त्या शिक्षकांना परत करणेबाबत गट शिक्षणाधिकारी, पंचायत समिती हवेली यांनी असे नमूद केले आहे.
गट शिक्षणाधिकारी, पंचायत समिती हवेली यांनी दिलेल्या पत्राच्या अनुषंगाने आपण संचालनालयाचे दिनांक १५/०९/२०२३ अन्वये जिल्हयांना वितरीत केलेल्या उपदान व अशंराशीकरणाच्या अनुदानातून सेवानिवृत्ती वेतनधारकांना विहित मुदतीत संगणक अहर्ता प्राप्त न केलेले त्यांचे उपदानातून वसूल करण्यात आलेली अतिप्रदान रक्कम देणेबाबत या कार्यालयास मार्गदर्शन मिळण्याबाबत विनंती केली आहे.
तरी आपणांस कळविण्यात येते की, पंचायत समिती हवेली तालुक्यातील २४ सेवानिवृत्त वेतन धारकांना विहित मुदतीत संगणक अहर्ता प्राप्त न केलेल्या त्यांचे उपदानातून वसूल करण्यात आलेली अतिप्रदान रक्कम रु. १८४८३३४/- (अक्षरी रक्कम रु. अठरा लाख अड्ठेचाळीस हजार तीनशे चौतीस फक्त) आपल्या जिल्हयाकडील सन २०२३-२४ मध्ये लेखाशिर्ष २२०२०१७३-०४ मधील उपलब्ध असलेल्या तरतुदीमधून अदा करण्यास मान्यता देण्यात येत आहे.