विधानसभा निवडणूक ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यात ?सर्वच राजकीय पक्षांकडून विधानसभेची तयारी सुरु ! Vidhansabha election
मुंबई : प्रतिनिधी लोकसभा निवडणूक मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर निकालाची अद्याप प्रतीक्षा असतानाच राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. महाराष्ट्रात विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबर रोजी संपणार असून हरियाणाची मुदत 3 नोव्हेंबरपर्यंत आहे. दोन्ही राज्यांमध्ये एकाच वेळी निवडणुका होण्याची शक्यता असून त्यामुळे दिवाळीपूर्वी ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यात मतदान होण्याची दाट शक्यता आहे.
21 ते आठ होऊ
विधानसभेची मुदत संपण्यापूर्वी किंवा त्या तारखेच्या दुसऱ्या दिवशी नवीन विधानसभा अस्तित्वात येणे आवश्यक असते. यानुसार हरियाणा विधानसभा उशिरात उशिरा चार नोव्हेंबरला अस्तित्वात येणे आवश्यक आहे. महाराष्ट्र आणि हरियाणाची विधानसभा निवडणूक 2009 पासून एकाच वेळी होत आहे. दोन्ही विधानसभांची मुदत 23 दिवसांच्या अंतराने संपत असल्यामुळे नियमानुसार एकत्र निवडणूक घेणे आवश्यक आहे. यंदा दिवाळी 29 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर या कालावधीत आहे. सणासुदीच्या काळात निवडणुका घेतल्या जात नाहीत. वास्तविक दिवाळीनंतर राज्यात विधानसभेचे निवडणूक घेण्यास बराच कालावधी मिळतो. मात्र, हरियाणामुळे महाराष्ट्रातही आधी निवडणूक घ्यावी लागणार आहे. 2019 मध्ये महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये 21 ऑक्टोबरला मतदान झाले होते. यंदाही याच तारखेच्या आसपास 21 ते 26 ऑक्टोबरच्या आठवड्यात मतदान होऊ शकते.
राज्यात दिवाळीपूर्वी विधानसभा निवडणुकीचे मतदान होण्याची शक्यता बळवल्यानंतर त्या दिशेने राजकीय पक्षांनी ही तयारी सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकीचे मतदान पार पडताच प्रचाराबरोबरच युती-आघाडी, जागावाटप याचीही चर्चा सुरू झाली आहे.
महायुतीमध्ये कोणत्या पक्षाला किती आणि कोणत्या जागा सोडता येतील यावर भाजपमध्ये खल सुरू झाला आहे. दरम्यान एका वृत्तपत्राच्या मुलाखतीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप हाच मोठा भाऊ असेल असे स्पष्ट करीत भाजप अधिक जाग लढणार हे स्पष्ट केले होते.
अजित पवार गटाने विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने सोमवारी मुंबईत पाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन केले आहे. गेल्या वर्षी फुटी नंतर झालेल्या पहिल्याच सभेत अजित पवार यांनी विधानसभेला 90 जागा लढणार असल्याचे जाहीर केले होते.
लोकसभेत राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) वाट्याला फक्त चार जागा आल्याने विधानसभेला भाजप किती जागा सोडते याबाबत उत्सुकता आहे. लोकसभेची भरपाई विधानसभेला करू असे अजित पवार गटाचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी एका कार्यक्रमात बोलून दाखविले होते. महाविकास आघाडीत शरद पवार यांनी विधानसभेच्या दृष्टीने चाचणी सुरू केली आहे.