यूपीएससीच्या परीक्षेत बीडचा ऋषिकेश जोगदंड देशात अव्वल जिल्हाभरातून कौतुकाचा वर्षाव; तरुणांसाठी ठरले आदर्श upsc topper all india rank
लोकमत न्यूज नेटवर्क बीड :- जिद्द, चिकाटी व सातत्याने प्रयत्न करतात त्यांना हमखास यश मिळते, त्याचे मूर्तिमंत उदाहरण समोर आले आहे. बीड तालुक्यातील वानगाव येथील ऋषिकेश जोगदंड या तरुणाने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या अंमलबजावणी अधिकारी, लेखाधिकारी या पदासाठीच्या परीक्षेत देशातून पहिला येण्याचा बहुमान मिळवला आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी ऋषिकेश आदर्श ठरले आहेत.
ऋषिकेश यांचे वडील रामकिसन जोगदंड व आई मीरा जोगदंड हे शेती करतात. मोठा अधिकारी बनायचे अशी जिद्द ऋषिकेश यांची
लहानपणापासूनच होती. आई वडिलांनीही त्यांना नेहमी प्रोत्साहन दिले.
चौथीपर्यंतचे शिक्षण मामाकडे चन्हाटा येथे जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, चन्हाटा येथे पूर्ण केले. पुढे बीड येथील संस्कार विद्यालयात माध्यमिकपर्यंतचे शिक्षण घेतले. त्यानंतर गोवा राज्यातील बिट्स पिलानी कॅम्पस महाविद्यालयात इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले.
दहावी बोर्ड परीक्षेत बीड जिल्ह्यातून तिसरा क्रमांक मिळविण्याचा बहुमान मिळविला होता.
एनटीएस परीक्षेत महाराष्ट्रातून चौथा क्रमांक मिळवला होता. आर्थिक अडचण निर्माण झाल्याने सारथी संस्थेची शिष्यवृत्ती घेऊन त्यांनी हलाखीच्या परिस्थितीत परीक्षेची तयारी करत महत्त्वपूर्ण यश मिळवत आई-वडिलांच्या कष्टाचे तर चीज केलेच.
जिल्ह्याचे नाव देशपातळीवर चमकले
दरम्यान, केंद्रीय लोकसेवा आयोगाने भविष्य निर्वाह निधी संस्था, कामगार व रोजगार मंत्रालय या विभागातील अंमलबजावणी अधिकारी, लेखाधिकारी या पदासाठी २ जुलै २०२३ रोजी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेत ऋषिकेश यांनी देशातून पहिला क्रमांक मिळवला. त्यांच्य या यशामुळे बीड जिल्ह्याचे नाव देशपातळीवर चमकले आहे. त्यांचे वानगावचे सरपंच संतोष जोगदंड, बबन जोगदंड, चहाटा गावचे सरपंच तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष विनेश उबाळे, ग्रामपंचायत सदस्य संदीप बाबूराव उबाळे, मुकेश रसाळ आदींनी ऋषिकेश यांचे स्वागत केले आहे.