शिक्षकांची शाळाबाह्य कामे निम्म्यावर आणणार मंत्री दादा भुसे;इगतपुरीत शैक्षणिक विकास कार्यशाळेत दिली माहिती teachers decrease unnecessary work
नाशिक येणाऱ्या काळात शिक्षकांची शाळाबाह्य कामे निम्म्यावर आणली जाणार असून, सर्व शालेय समिती एकत्रित करून एकच समिती कार्यरत ठेवण्याच्या विचाराधीन असल्याचे राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी इगतपुरी येथे शनिवारी (दि.८) राज्यभरातील आदर्श शिक्षकांच्या उपस्थितीत आयोजित एकदिवसीय शैक्षणिक विकास कार्यशाळेत सांगितले. येणाऱ्या काळात इंग्रजी शाळेतील विद्यार्थ्यांची रांग मराठी शाळेत लागेल असे काम करा, असे आवाहनही मंत्री भुसे यांनी उपस्थित शिक्षकांना केले.
दिवसभर चाललेल्या या कार्यशाळेत शिक्षणक्षेत्रातील विविध बदलांवर विविधांगी चर्चा झाली. पूर्णवेळ उपस्थिती दाखवत शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी शिक्षकांच्या प्रयोगशील उपक्रमांची माहिती जाणून घेतली. उपस्थित आदर्श शिक्षकांच्या हस्ते दीपप्रज्वलन करत कार्यशाळेची सुरुवात करण्यात आली. कार्यशाळेसाठी राज्यभरातील आदर्श शिक्षकांचे ६ गट करण्यात आले होते. प्रत्येक गटात ६ शिक्षक सहभागी होते. या शिक्षकांनी आपल्या शाळेत काय बदल केले, कुठले नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले, याची माहिती दिली. यावेळी आदर्श शिक्षकांनी देखील संशोधन व विचारविनिमय करून शिक्षणक्षेत्रात काय केले व येणाऱ्या काळात काय बदल अपेक्षित आहेत, याबाबत
आपली भूमिका मांडली.
यावेळी भुसे यांनी सांगितले, शिक्षक हे शिक्षणव्यवस्थेचे खरे शिलेदार आहेत. यापुढे शाळाभेटी राज्यभर होणार असून या भेटी चूक काढण्यासाठी नव्हे, तर सुधारणा करण्यासाठी असतील. आगामी काळात राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाबाबतही त्यांनी अपेक्षा व्यक्त केल्या. चांगले काम करणाऱ्या शिक्षकांच्या पाठीशी शिक्षण विभाग ठामपणे उभे राहील, असे यावेळी भुसे म्हणाले.
शिक्षणमंत्र्यांकडून गौरवोद्गार
कार्यशाळेत मुख्यत्वे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीत शैक्षणिकसह भौतिक सुविधा महत्त्वाची भूमिका पार पाडत असून त्यामध्ये शाळेत विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात आकर्षक वर्गखोल्या, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, मुला-मुलींसाठी त्यांच्या प्रमाणात स्वतंत्र स्वच्छतागृह, आकर्षक शालेय परिसर, प्रयोगशाळा इत्यादींचा समावेश होता. अनेक शाळा या लोकसहभागातून चांगल्या स्थितीत आहेत. तर बौद्धिकदृष्ट्या शिक्षकांनी जबाबदारी घेत पिढी घडविण्याचे काम केले असल्याचे गौरवोदगार मंत्री भुसे यांनी काढले.