“भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर” व्यक्तीपरिचय/भाषण/निबंध personal introduction vyaktiparichay

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

“भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर” व्यक्तीपरिचय/भाषण/निबंध personal introduction vyaktiparichay

‘सूर्य जसा मध्यान्ही प्रखर तेजाने तळपत असतो, तसा हा तरुण आपल्या जीवनाच्या मध्यावर आपल्या तेजस्वी कर्तृत्वाने जगात तळपल्याशिवाय राहणार नाही.’ २० मार्च १९२० रोजी माणगाव येथे भरलेल्या परिषदेत एका तरुणाविषयी हे उद्‌गार काढले, कोल्हापूरच्या राजर्षी शाहूमहाराजांनी. त्या तरुणाचं नाव होतं भीमराव रामजी आंबेडकर.

डॉ. आंबेडकर यांचा परिचय त्यांच्याच प्रत्ययकारी शब्दांत असा : ‘बुद्धीला जे पटेल, त्याच मार्गाने जायला पाहिजे’, असे सांगणारे भगवान बुद्ध, ‘मानस होना कठीन है, तो साधू कैसा होत’, असे सांगणारे संत कबीर आणि ‘सत्य तोचि धर्म’, असे सांगणारे महात्मा जोतीराव फुले हे माझे गुरू. विट्या, विनयशीलता व शीलसंवर्धन ही माझी तीन उपास्य दैवते.

‘या तीन गुरूंची आणि उपास्य दैवतांची भेट कुणी घडवली ? माझ्या आईवडलांनी. माझी आई भीमाबाई…. पण तिच्या सहवासाचे सुख मला फारसे लाभले नाही. जेमतेम पाच-सहा वर्षांचा असेन. तिला मी कायमचा अंतरलो. मोठेपणी साताऱ्याला गेलो तेव्हा तिच्या आठवणीने रडूच कोसळले. तिने आमच्यासाठी फार खस्ता खाल्ल्या… माझा जन्म महूचा. माझी जन्मतारीख १४ एप्रिल १८९१.

‘माझे वडील विक्ष्येचे घोक्ते होते. मी बी.ए. व्हावे, असे त्यांना वाटे. आमचे कुटुंब गरीब, पण विद्येची उपासना करावी व आमचे चारित्र्य चांगले असावे, यासाठी वडील अतिशय दक्ष. त्यांचे संतांच्या वचनांचे पाठांतर फार चांगले. पलटणीत माझे वडील नव्याने भरती झालेल्या शिपायांना शिकवत व नॉर्मल स्कूलचे काम करीत… दापोलीहून आमचे कुटुंब साताऱ्याला आले. १८९६ च्या नोव्हेंबरमध्ये कॅपमधील ‘अॅग्रिकल्चर स्कूल, सातारा मध्ये माझे नाव दाखल केले. ‘भिवा रामजी आंबेडकर’, असे शाळेच्या रजिस्टरमध्ये नाव आहे… वस्तुतः आमचे आडनाव आंबेडकर नव्हते, ते होते आंबावडेकर… आम्हांला आंबेडकर नावाचे मास्तर होते… त्यांनीच आंबावडेकर ऐवजी माझे आडनाव आंबेडकर करून टाकले.

‘वडलांची नोकरी सुटली. पेन्शनीत भागायचे कसे ? म्हणून त्यांनी ठरवले, की मुंबईला जायचे. तिथे नोकरी लागेल व मुलांचे शिक्षणही होईल. मुंबईत माझे नाव सरकारी हायस्कुलात एल्फिन्स्टन हायस्कुलात घातले… बालपणी आणि शाळेत असताना अस्पृश्य म्हणून अनेक वेळा मला अपमानित व्हावे लागले.’

अडचणींना निर्धारानं तोंड देत आणि हालअपेष्टा सहन करत बाबासाहेबांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. अमेरिका आणि इंग्लंडमध्ये जाऊन एम.ए., पीएच.डी., एम.एस्सी., डी.एस्सी., बार-अॅट-लॉ अशा उच्च श्रेणीच्या पदव्या त्यांनी संपादन केल्या.

विद्यार्थिदशेपासूनच त्यांना वाचनाचा छंद होता. पुस्तकं त्यांना जिवलग मित्रांपेक्षा मोलाची वाटत. रात्रंदिवस पुस्तकं वाचण्यात, टिपणं करण्यात, मनन व चिंतन करण्यात आणि लेखन करण्यात ते गढून जात. सिद्धार्थ कॉलेजला आपला ग्रंथसंग्रह देताना ते म्हणाले,

‘माझ्या जीवनातील स्नेहीसोबती तुम्हांला देत आहे. समाजाने बहिष्कृत केलेल्या माझ्यासारख्याला या थोर ग्रंथांनीच जवळ केले. माझे ग्रंथालय म्हणजे माझा प्राण. पुस्तकांच्या सहवासात शांत आयुष्य वेचण्यासारखा दुसरा आनंद नाही. पुस्तके मला नवी वाट दाखवतात. ती मला खूप आनंद देतात.’

शिक्षणावर बाबासाहेबांचं विलक्षण प्रेम. शिक्षण हे केवळ नोकरी मिळवण्यासाठी घ्यायचं, हे त्यांना मान्य नव्हतं. शिक्षणाचा उपयोग सामान्य माणसाच्या सुखासाठी केला पाहिजे, असं त्यांना वाटत असे. शिक्षणाचं हे महत्त्व लक्षात घेऊन डॉ. आंबेडकरांनी ‘पीपल्स एज्युकेशन सोसायटी’ ही शैक्षणिक संस्था स्थापन केली.

दलितांवरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी त्यांनी ‘मूकनायक’ नावाचं पाक्षिक सुरू केलं. दलित समाजाचं दैन्य, दारिद्र्य, दुःख आणि अपमानास्पद जिणं दूर करण्यासाठी त्यांनी ‘बहिष्कृत हितकारिणी सभा’ या नावाची संस्था स्थापन केली.

बहिष्कृत हितकारिणी सभेचं ब्रीदवाक्य होतं, “शिकवा, चेतवा आणि संघटित करा.’

हे करण्यासाठी पुढे डॉ. आंबेडकरांनी ‘बहिष्कृत भारत’ नावाचं साप्ताहिक सुरू केलं. स्वाभिमान, स्वावलंबन आणि आत्मोद्धार ही आंबेडकरांची तीन तत्त्वं होती, ते म्हणत, ‘गुलामाला त्याच्या गुलामगिरीची जाणीव करून दधा, म्हणजे तो आपोआपच बंड करील.’

परंतु केवळ भाषणं देऊन आणि लेख लिहून कार्य होणार नाही, याची बाबासाहेबांना जाणीव होती. दलितांना बंधनातून मुक्त करण्यासाठी आंदोलन केलं पाहिजे, समाजाच्या रूड समजुतींना एक्के दिले पाहिजेत, याची त्यांना खात्री पटली.

१९२७ च्या मे महिन्यात त्यांनी महाड येथील चवदार तळ्याचा सत्याग्रह केला. अस्पृश्यांना प्रवेशबंदी असलेल्या या तळ्यावर बाबासाहेब आपल्या हजारो सहकाऱ्यांबरोबर गेले आणि त्या तळ्याचं पाणी प्याले. सामाजिक समतेच्या लढ्याचं रणशिंग फुंकलं.

जी गोष्ट निसर्गाची, तीच परमेश्वराची. परमेश्वर हा कोण्या एका विशिष्ट जातीचा मक्ता नाही, तो सगळ्यांचा आहे. अस्पृश्यांना असलेली मंदिरप्रवेशबंदी हा अन्याय होता. परंपरेने अस्पृश्यांना मंदिरात प्रवेश नव्हता. या अन्यायाविरुद्धही बाबासाहेब आंबेडकरांनी आवाज उठवला, त्यांनी नाशिकच्या काळाराम मंदिरात सत्याग्रह करून प्रवेश केला. माणसामाणसांत भेदभाव करणारी ‘मनुस्मृती’ जाहीरपणं जाळली. या आंदोलनामुळं संपूर्ण समाज खडबडून जागा झाला. दलितांची अस्मिता वाढीस लागली.

भारतीय समाजातील अस्पृश्यतेची कीड ही केवळ मंदिर प्रवेशासारख्या आंदोलनांनी दूर होणार नाही, तर त्यासाठी दलितांना राजकारणात स्वतंत्र स्थान प्राप्त झालं पाहिजे, असं बाबासाहेबांचं ठाम मत होतं. विधिमंडळात आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये अस्पृश्यांसाठी राखीव जागा असल्या पाहिजेत, अशी मागणी त्यांनी केली. स्वतः मुंबईच्या विधिमंडळावर सदस्य म्हणून काम करत असताना त्यांनी शेतकरी, कामगार आणि दलित यांच्या हिताची अनेक विधेयक मांडली आणि पास करून घेतली. समाजातील सरंजामी वृत्तीला पोषक असणारी वतनं सरकारनं रद्द करावी आणि सरकारनंच गावकामगारांच्या वेतनाची सर्व जबाबदारी घ्यावी, असा त्यांनी आग्रह धरला.

जातिव्यवस्थेमुळं समाज दुभंगतो आणि त्याची नैतिक अधोगती होते. भारतीय

समाजाच्या दुबळेपणाची व ऐतिहासिक पराभवाची कारणं जातिव्यवस्थेत सापडतात, असं त्यांचं मत होतं.

१९३१ साली इंग्लंडमध्ये भरलेल्या गोलमेज परिषदेस डॉ. आंबेडकर भारतीय दलितांचे प्रतिनिधी म्हणून गेले होते. अस्पृश्यांसाठी त्यांनी खास सवलतींची मागणी केली. ब्रिटिश सरकारनं ‘जातीय निवाडा’ जाहीर केला. अस्पृश्यांना राखीव जागा आणि वेगळे मतदारसंघ अशा दोन्ही गोष्टी या निवाड्यात मान्य केल्या होत्या.

अस्पृश्यांसाठी राखीव जागांना कोणाचा विरोध नव्हता; पण विभक्त मतदारसंघामुळं मात्र अस्पृश्य समाज इतर हिंदूंपासून कायमचा तोडला जाणार असल्यानं, त्या निर्णयाच्या विरोधात गांधीजींनी येरवडा तुरुंगात आमरण उपोषण सुरू केलं. डॉ. आंबेडकरांनी गांधीजींशी तुरुंगात वाटाघाटी केल्या. यातूनच १९३२ चा ‘पुणे करार’ झाला. अस्पृश्यांसाठी विभक्त मतदारसंघाचा आग्रह बाबासाहेब आंबेडकरांनी राष्ट्रहित लक्षात घेऊन सोडला.

स्वतंत्र भारताच्या घटना समितीवर बाबासाहेबांची निवड झाली. घटनेच्या मसुदा समितीचे ते अध्यक्ष होते. भारतीय प्रजासत्ताकाच्या घटनेचा मसुदा तयार करण्याचं महत्त्वाचं आणि मोलाचं कार्य त्यांनी पार पाडलं, म्हणूनच त्यांना ‘भारतीय घटनेचे शिल्पकार’ म्हटलं जातं. ही राज्यघटना २६ नोव्हेंबर १९४९ रोजी मंजूर करण्यात आली. त्या दिवशी घटना समितीसमोर केलेल्या भाषणात डॉ. आंबेडकर यांनी जे विचार मांडले, ते फार उ‌द्बोधक आहेत. ते म्हणाले,

‘२६ जानेवारी १९५० पासून ही घटना अमलात येऊन प्रजासत्ताक भारत अस्तित्वात येईल. तेव्हापासून आपण राजकीय लोकशाहीचा शुभारंभ करणार आहोत; पण आपल्या समाज-जीवनात एक दुःखदायक आणि विसंगत चित्र आपणांस पाहावे लागणार आहे. आपल्या राजकीय जीवनात स्वातंत्र्य व समता निर्माण होईल; परंतु आपल्या सामाजिक व आर्थिक जीवनात कमालीची विषमता दिसेल. ही विषमता कायम असेपर्यंत राजकीय स्वातंत्र्य व राजकीय समतेला काही अर्थ राहणार नाही. राजकीय लोकशाहीबरोबरच स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यांची सांगड घातल्याशिवाय सामाजिक व आर्थिक लोकशाही निर्माण होणार नाही. आपण वरील दोन्ही विसंगती जर लवकर दूर करू शकलो नाही, तर मोठ्या प्रयासानं उभारलेलं आपल्या लोकशाहीचं यशोमंदिर उध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही !’

डॉ. आंबेडकर हे थोर विचारवंत होते. त्यांनी विविध विषयांवर मौलिक आणि विपुल लेखन केलं आहे. ‘शूद्र कोण होते ?’, ‘पाकिस्तानसंबंधी विचार’ असे त्यांचे अनेक ग्रंथ मान्यता पावले आहेत.