“सरोजिनी नायडू” व्यक्तीपरिचय/भाषण/निबंध personal introduction vyaktiparichay

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

“सरोजिनी नायडू” व्यक्तीपरिचय/भाषण/निबंध personal introduction vyaktiparichay

सरोजिनी नायडू अगदी लहानपणापासूनच विलक्षण बुद्धिमान होत्या. वयाच्या बाराव्या वर्षी त्या मॅट्रिक पास झाल्या. तेराव्या वर्षीच त्यांनी एक दीर्घ काव्य लिहिलं. त्यांची कुशाग्र बुद्धी, विद्या-प्रेम आणि काव्यप्रतिभा पाहून हैदराबादच्या निजामानं त्यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देऊन इंग्लंडला पाठवलं. इंग्लंडमधील किंग्ज कॉलेजमध्ये जेव्हा त्या दाखल झाल्या, तेव्हा त्या होत्या फक्त सोळा वर्षांच्या !

तो काळ मुलींच्या शिक्षणाच्या दृष्टीनं अत्यंत मागासलेला होता. स्त्री-शिक्षणाची नुकतीच कुठंकुठं सुरुवात झाली होती, अशा त्या काळात सरोजिनीदेवींनी लंडन आणि केंब्रिज विदयापीठांत उच्च शिक्षण घेतलं. इंग्रजी भाषेवर असाधारण प्रभुत्व मिळवलं.

इंग्रजी काव्याच्या वाचनानं त्यांच्या काव्यप्रतिभेला बहर आला. भारतात परतल्यावर तर त्या काव्यसाधनेत रममाण होऊन गेल्या. त्यांच्या इंग्रजी कवितांचे तीन संग्रह प्रसिद्ध आहेत. ‘गोल्डन थेश्होल्ड’, ‘ब्रोकन विंग’ आणि ‘बर्ड ऑफ टाइम’, देशातल्या आणि परदेशांतल्या रसिकांनी व विद्वानांनी या संग्रहांची प्रशंसा केली आहे. या कवयित्रीच्या काही कवितांचा अनुवाद फ्रेंच भाषेतही प्रसिद्ध झाला.

सरोजिनी नायडू कवयित्री होत्या, तशाच थोर देशभक्तही होत्या. त्यांच्या तरुणपणी भारत देश स्वातंत्र्यासाठी परक्या इंग्रज सत्तेशी झगडत होता. अशा वेळी कवितेचं सुंदर जग त्यांना फार काळ आपल्यात गुंतवू शकलं नाही. त्यांनी स्वातंत्र्यसंग्रामात उडी घेतली.

सरोजिनी नायडूंचा जन्म १३ फेब्रुवारी १८७९ रोजी हैदराबाद शहरात झाला. वडील डॉक्टर अघोरनाथ चटोपाध्याय हे मूळचे बंगालचे; पण निजामाच्या राज्यात शिक्षण विभागाचे एक मोठे अधिकारी म्हणून ते हैदराबादला येऊन राहिले होते. सरोजिनींचे वडील विद्वान होते आणि आई वरदसुंदरी कवयित्री असून त्यांनी बंगालीत पुष्कळ कविता लिहिल्या होत्या. सरोजिनींना विद्वत्तेचा आणि कवित्वाचा वारसा आईवडिलांकडूनच मिळालेला होता. हे दोघंही सुधारक विचारसरणीचे होते. सरोजिनींनी लिहिलं आहे,

‘हिंदू संस्कृतीचं उत्कट प्रतीक ठरणाऱ्या आईवडिलांच्या पोटी माझा जन्म झाला आणि इस्लामचे सर्वोत्तम गुण जिथं विपुल होते, अशा वातावरणात माझं लालनपालन झालं. अशा प्रकारे या दोन्ही धर्माचा बालवयापासूनच माझ्यावर खोल प्रभाव पडला आणि माझं जीवन उन्नत झालं.’

सरोजिनींचा विवाह १८९८ साली डॉ. गोविंदराजुलू नायडू यांच्याशी झाला. त्या काळात आंतरजातीय विवाह करून सरोजिनीनं रूढी तोडण्याचं धैर्य दाखवलं.

नामदार गोखले आजारी असताना त्यांना भेटण्यासाठी सरोजिनीदेवी पुण्यात आल्या होत्या. त्या वेळी गोखल्यांनी आपलं जीवन, आपली बुद्धी, संगीत, वक्तृत्व, कवित्व, आपले विचार आणि आपली स्वप्नं मातृभूमीच्या सेवेसाठी वाहण्याची शपथ घेण्यास सरोजिनीदेवींना सांगितलं.

सरोजिनीदेवींनी ती आनंदानं घेतली.

देशाच्या सेवेपुढं त्यांनी स्वतःच्या सुखाची किंवा परिवाराचीदेखील पर्वा बाळगली नाही. देश हाच त्यांचा परिवार बनला होता. गांधीजींनी पुकारलेल्या प्रत्येक चळवळीत त्यांनी भाग घेतला आणि कितीतरी वेळा तुरुंगवास भोगला. त्यांचे नेहमी देशभर दौरे चालत असत. ठिकठिकाणी त्या व्याख्यानं देत. लोकजागृती करत. देशाच्या स्वातंत्र्याची महती पटवत असत. बंगाली, उर्दू, हिंदी, गुजराती आणि इंग्रजी या भाषा त्यांना अस्खलित बोलता येत होत्या. त्यांच्या व्याख्यानाला हजारोंच्या संख्येनं लोक जमत. त्यांचं भाषण काव्यमय असे. लोक त्यांना ‘भारत-कोकिळा’ असं म्हणत.

१९३० साली गांधीजींनी दांडीयात्रेनं मिठाचा सत्याग्रह सुरू केला. धारासना येथील मिठाच्या सत्याग्रहाच्या वेळी गांधीजींना अटक झाल्यानंतर त्या सत्याग्रहाचं नेतृत्व सरोजिनी नायडू यांनी केलं. त्या वेळी सत्याग्रहींपुढं भाषण करताना त्या म्हणाल्या,

गांधीजी देहानं तुरुंगात आहेत, परंतु मनानं तुमच्या-आमच्या बरोबर आहेत. भारताची सर्व प्रतिष्ठा तुमच्या हाती आहे. कोणत्याही परिस्थितीत तुम्ही हिंसा करता कामा नये.’

सत्याग्रहींनी सरोजिनीदेवींचा आदेश तंतोतंत पाळला. पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीहल्ल्याला न जुमानता सत्याग्रहींचे जथ्यामागून जथे पुढं जात होते. अनेक लोक घायाळ होऊन पडत होते, तरी सत्याग्रह थांबला नाही.

पोलिसांनी सरोजिनीदेवींना अटक केली. तेव्हा त्या म्हणाल्या,

‘हा संघर्ष अशाच तीव्रतेने पुढे चालू राहील. जर तुम्ही मला सोडलेत, तर मिठागराभोवतीचे तारेचे कुंपण तोडून मी आत जाईन आणि मीठ तयार करीन.’

‘अटक होईपर्यंत सत्याग्रह करत रहा’, असा सर्व सत्याग्रहींना आदेश देऊनच त्या पोलिसांच्या गाडीत चढल्या.

गांधीजींच्या प्रेरणेनं भारतीय स्त्रिया राष्ट्रीय चळवळीत मोठ्या संख्येनं सहभागी होत होत्या. सरोजिनीदेवी हे त्याचं उत्तम उदाहरण होतं. महिलांची अनेक संमेलनं सरोजिनीदेवींच्या मार्गदर्शनाखाली पार पडत. या महिला परिषदांमधून, तसंच इतर भाषणांमधून सरोजिनीदेवींनी विधवा-विवाह बंदी, बालविवाह, बहुपत्नीकत्व यांसारख्या अनिष्ट सामाजिक प्रथांविरुद्ध स्त्रियांना जागृत केलं. स्त्रीशक्ती संघटित करण्यामध्ये सरोजिनीदेवींनी महत्त्वाचा वाटा उचलला, आंतरराष्ट्रीय परिषदांमधून स्त्रियांच्या प्रश्नांना त्यांनी वाचा फोडली.

राष्ट्रीय आंदोलन अधिक सामर्थ्यशाली व्हावं, म्हणून हिंदू-मुस्लिम ऐक्यासाठी त्या आयुष्यभर झटल्या.

१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. स्वातंत्र्यानंतर उत्तर प्रदेशच्या राज्यपाल म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. भारतातील त्या पहिल्या स्त्री राज्यपाल होत्या.

२ मार्च १९४९ रोजी त्यांचं निधन झालं.

भारताची काव्यकोकिळा निःशब्द झाली.