लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४, आदर्श आचारसंहितेबाबत loksabha election acharsanhita
Loksabha election acharsanhita लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४, आदर्श आचारसंहिता कालावधीतील प्रस्ताव तपासणीकरीता छाननी समिती गठीत करण्याबाबत….
शासनपरिपत्रक :-आगामी काळात सन-२०२४ मध्ये लोकसभा व विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने लागु होणाऱ्या आदर्श आचार संहितेच्या कालावधीत “काय करावे व काय करु नये” याबाबतच्या सविस्तर मार्गदर्शक सूचना भारत निवडणूक आयोगाव्दारे दि.०२/०१/२०२४ च्या पत्रान्वये निर्गमित केल्या आहेत. सदर सूचना विचारात घेतल्यानंतर आदर्श आचार संहितेच्या कालावधीत एकाद्या प्रस्तावास मान्यता देणे वा कार्यवाही करण्याबाबत संबंधित कार्यालय/विभाग आग्रही असल्यास असे प्रस्ताव भारत निवडणूक आयोगास सादर करण्याकरीता मा. मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांस शिफरस करण्याकरीता मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली पुढीलप्रमाणे छाननी समिती गठीत करण्यात येत आहे.
२. छाननी समितीची कार्यपध्दती खालीलप्रमाणे :-
(१) छाननी समिती आदर्श आचारसंहितेच्या भारत निवडणूक आयोगाच्या पोर्टलवर उपलब्ध असलेल्या मार्गदर्शक सूचना विचारात घेऊन प्रस्तावांची छाननी करेल.
(२) छाननी समिती छाननी करुन प्रस्तावाबाबत शिफारस करेल.
(३) छाननी समिती शिफारस केलेले प्रस्ताव संपूर्ण तपशील आणि तातडीबाबतच्या टिप्पणीसह मुख्य निवडणूक अधिकारी यांचेकडे सादर करण्यात येतील.
(४) मुख्य निवडणूक अधिकारी छाननी समितीने शिफारस केलेले प्रस्ताव त्यांच्या अभिप्रायासह भारत निवडणूक आयोगाकडे पाठवतील.
३. आदर्श आचारसंहिता कालावधीत प्रस्ताव सादर करताना विभागांनी पुढीलप्रमाणे दक्षता घ्यावी :-
(अ) राज्यातील सर्व विभागांनी कोणत्याही परिस्थितीत कोणताही प्रस्ताव किंवा संदर्भ थेट भारत निवडणूक आयोगास अथवा राज्य मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडे सादर करु नये.
(ब) शासनाच्या सर्व संबंधित विभागांनी प्राप्त प्रस्तावाबाबत भारत निवडणूक आयोगाने वेळोवेळी दिलेल्या सूचना व निदेशानुसार प्रस्तावाची प्रथमतः प्रशासकीय विभागस्तरावर तपासणी करुन संबंधित विभागाने आपली स्वयंस्पष्ट धारणा पक्की करावी व तद्नंतर आपल्या स्वयंस्पष्ट अभिप्रायासह प्रस्ताव छाननी समितीमार्फतच सादर करण्यात यावा. याकरीता सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभाग प्रमुखांनी त्यांच्याकडील प्राप्त प्रस्ताव उक्त कार्यपध्दतीनुसारच राज्य मुख्य निवडणूक आयोगाकडे सादर केले जातील, याची दक्षता घ्यावी.
(क) भारत निवडणूक आयोगास संदर्भ निकाली काढण्यास काही कालावधी आवश्यक असल्याने अंतिम क्षणी प्रस्ताव पाठविणे टाळावे.
४. उपरोक्त सूचना लक्षात घेऊन सर्व प्रशासकीय विभागांनी उचित कार्यवाही करावी व सदरच्या सर्व सूचना आपल्या अधिनस्त कार्यालयाच्या निदर्शनास आणून देण्याबाबत कार्यवाही करण्याबाबत या परिपत्रकान्वये सूचना देण्यात येत आहेत.
५. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२४०२२८१४५८५२८९०७ असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने सांक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्र राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावांने