शासकीय कर्मचारी वैद्यकीय प्रमाणपत्राशिवाय असाधारण रजेवर असताना वार्षिक वेतनवाढ विनियमित करणेबाबत general leave increment shasan nirnay
म. ना. से. (सुधारित वेतन) नियम, २००९ च्या अनुषंगाने शासकीय कर्मचारी वैद्यकीय प्रमाणपत्राशिवाय असाधारण रजेवर असताना वार्षिक वेतनवाढीचा पुढील दिनांक विनियमित करणेबाबत.
शासन निर्णयः- महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ मधील नियम ३९ नुसार समयश्रेणीतील वेतनवाढीसाठी १२ महिन्याचा कालावधी विचारात घेण्यात येतो. समयश्रेणीतील वेतनवाढीसाठी हिशेबात घ्यावयाचा कालावधी वरील नियमातील पोटनियम २ (बी) मध्ये नमूद करण्यात आला आहे. त्यानुसार वैद्यकीय कारणाव्यतिरिक्त अन्य असाधारण रजा वार्षिक वेतनवाढीसाठी जमेस धरावयाच्या सेवेमध्ये हिशेबात घेण्यात येत नाही.
२. सहाव्या वेतन आयोगाच्या अनुषंगाने सुधारित वेतन नियम, २००९ मधील नियम १० नुसार सर्व राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना दरवर्षी १ जुलै या एकाच दिनांकास वार्षिक वेतनवाढ मंजूर करण्याची तरतुद आहे. त्यासाठी दि.१ जुलै रोजी ज्या कर्मचाऱ्यांची सुधारित वेतनसंरचनेमध्ये ६ महिने किंवा त्यापेक्षा अधिक सेवा पूर्ण होईल ते कर्मचारी दि.१ जुलै रोजी वेतनवाढ मिळण्यास पात्र राहतील. या सुधारित तरतुदीच्या अनुषंगाने वैद्यकीय प्रमाणपत्राशिवाय अन्य असाधारण रजेवर असलेल्या कर्मचाऱ्यांची वार्षिक वेतनवाढ कशाप्रकारे विनियमित करावी याबाबत प्रश्न उपस्थित झाला होता. यानुषंगाने केंद्र शासकीय कर्मचाऱ्यांकरीता संदर्भाधीन दि. २.७.२०१० च्या कार्यालयीन ज्ञापनान्वये स्पष्टीकरण करण्यात आले आहे. त्याच धर्तीवर राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय कारणाव्यतिरिक्त अन्य असाधारण रजेच्या अनुषंगाने वार्षिक वेतनवाढ खालीलप्रमाणे विनियमित करण्यात यावी :-
अ) शासकीय कर्मचारी मागील वर्षाच्या १ जुलैपासून चालू वर्षाच्या ३० जूनपर्यंत सहा महिने किंवा त्यापेक्षा कमी कालावधीसाठी वैद्यकीय प्रमाणपत्राशिवाय असाधारण रजेवर असल्यास, त्याला चालू वर्षाच्या १ जुलै रोजी वार्षिक वेतनवाढ अनुज्ञेय होईल.
ब) शासकीय कर्मचारी मागील वर्षाच्या १ जुलैपासून चालू वर्षाच्या ३० जूनपर्यंत सहा महिन्यापेक्षा अधिक कालावधीसाठी वैद्यकीय प्रमाणपत्राशिवाय असाधारण रजेवर असल्यास, त्याला चालू वर्षाच्या १ जुलै रोजी वार्षिक वेतनवाढ देय न होता, ती पुढील वर्षाच्या दिनांक १ जुलै रोजी अनुज्ञेय होईल.
क) वरील अटी दि.१/७/२००६ रोजी व तनंतर वेतनवाढ देय होणाऱ्या प्रकरणी लागू राहतील.
महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ मधील नियम ३९ (१) अपवाद (१) (ए) (एक) नुसार परिविक्षाधीन
३.
म्हणून एखादया पदावर थेट नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्याची पहिली वेतनवाढ, त्याचा एक वर्षाचा परिविक्षेचा कालावधी पूर्ण
झाल्यावर देण्यात यावी अशी तरतूद आहे. सहाव्या वेतन आयोगाच्या अनुषंगाने सर्व कर्मचाऱ्यांना १ जुलै रोजी वार्षिक वेतनवाढ देण्याची तरतूद असल्याने, अशा कर्मचाऱ्यांच्या बाबतीत नियुक्तीनंतर एक वर्षाच्या कालावधीऐवजी दि.१ जुलै रोजी सहा महिने किंवा त्यापेक्षा जास्त सेवा पूर्ण झाल्यानंतर पहिली वेतनवाढ अनुज्ञेय राहील.
४. महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ च्या नियम ३९ व त्यामधील (१) अपवाद (१) (ए) (एक) मधील याबाबतच्या विद्यमान तरतुदी या शासन निर्णयातील तरतुदीपुरत्या सुधारण्यात आल्या आहेत, असे मानण्यात यावे, या नियमात यथावकाश सुधारणा करण्यात येतील.
५. सदर शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागाच्या सहमतीने व त्यांच्या अनौपचारिक संदर्भ क्र.१२६/११/का.८, दि.१६/०७/२०११ नुसार निर्गमित करण्यात येत आहे.
६. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध
करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक २०१११२२६१०३७४२१२४२००१ असा आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने