शैक्षणिक सहलीसाठी एसटी महामंडळाची 50% सवलत, विद्यार्थ्यांना शै.सहलीचा आनंद आता निम्या भाड्यातच educational trip fifty percent discount
विद्यार्थ्यांनो, शैक्षणिक सहलीचा आनंद आता निम्या भाड्यातच ! लालपरीद्वारे सहलीसाठी 50% सवलत
लालपरीद्वारे सर्व आगारांतील बस देणार शैक्षणिक संस्थांना सुविधा
लोकमत न्यूज नेटवर्क बीड : दिवाळीच्या सुट्यांनंतर आता
शाळा सुरू झाल्या असून, सहलीचे नियोजन करण्यात येत आहे. यासाठी निम्मे भाडे आकारले जाणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना कमी पैशात जास्त प्रवास करून अधिक प्रेक्षणीय स्थळांना भेटी देता येणार आहे. शैक्षणिक संस्थांकडून बस बुक करणे सुरू असल्याचे रापमकडून सांगण्यात आले.
शालेय शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना भौगोलिक परिस्थितीचा आढावा घेता यावा, त्यांना प्रेक्षणीय स्थळांची पाहणी करता यावी, याकरिता विविध स्थळांना भेटी देण्याचे किंवा निसर्ग सहलीचे आयोजन केले जाते.
दरम्यान, दिवाळीनंतर फेब्रुवारीपर्यंत शाळांकडून शैक्षणिक सहलीचे नियोजन केले जाते. विद्यार्थ्यांना कमी पैशात जास्त प्रेक्षणीय स्थळांना भेटी देता याव्यात याकरिता प्रवास तिकिटात ५० टक्के सूट देण्यात येत आहे.
दरम्यान, ४५ व्यक्तींची आसन क्षमता असणाऱ्या एसटीसाठी शाळांकडून २७ रुपये प्रतिकिलोमीटर याप्रमाणे पैसे घेण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यातील आठही आगारांतील बसेस मागणीनुसार उपलब्ध करून देणार असल्याचे राज्य परिवहन महामंडळाच्या विभागीय
कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. गेल्यावर्षी छत्रपती संभाजीनगर, रायगड, महाबळेश्वर, पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक येथील प्रेक्षणीय स्थळांना प्राधान्य देण्यात आले होते. तसेच गडकिल्ले, धार्मिक स्थळांचाही सहलीत होता.
जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना राज्य परिवहन महामंडळाच्या ५० टक्के सवलतीचा लाभ घेता यावा, यासाठी पूर्ण प्रयत्न करीत आहोत. कमी पैशामध्ये विद्यार्थ्यांना प्रवास करता येणार आहे. जास्तीत जास्त शिक्षण संस्थांनी सहलीचे आयोजन करावे.
-संदीप पडवळ, विभागीय वाहतूक अधिकारी, रापम, बीड